भारत देशाचा लोकसंख्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांक आहे. एवढ्या एवढ्या मोठ्या देशाला अन्नधान्य पुरवठा करण्यसाठी कडधान्याचे उत्पादन व उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. कडधान्य पिकामध्ये तूर हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. कडधान्य पिकाचे लागवडीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे.. देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात व झारखंड हि महत्वाची तूर उत्पादक राज्ये आहेत असून य मध्ये महाराष्ट्र उत्पादनात पहिला व क्षेत्रानुसार दुसऱ्या क्रमांकवर आहे.
देशामध्ये तूरü पिकाखाली ४९.०० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ४२.२२. लाख टन एवढे उत्पादन झाले व देशाची उत्पादकता ८६१ किलो/हेक्टर आहे. सन २०२२-२३ साली महाराष्ट्र राज्यात तूर या पिकाखाली ११.७५ लाख हेक्टर क्षेत्र होते तर ८.४८ लाख टन एवढे उत्पादन झाले व राज्याची उत्पादकता ७२२ किलो/हेक्टर. तूर पिकाचे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब खालील प्रमाणे केल्यास निश्चित उत्पादन वाढण्यास मदत होईल.
जमिनीची निवड :
तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ व सेंद्रिय कर्ब ०.५ टक्के पेक्षा जास्त असावा. चोपण क्षारयुक्त जमीन मानवत नाही. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळावरील गाठीची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात.
पेरणीची वेळ :
तुरीची पेरणी ३० जुन पर्यंत करणे आवश्यक आहे. मान्सूनचा समाधनकारक पाऊस (७५ ते १०० मि.मी) पडल्यानंतर वाफसा येताच कुळवणी करावी. त्यानंतर योग्य ओल असताना तुरीची पेरणी करावी. पेरणी जशी जशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त उशिरा ७ जुलै पूर्वी पेरणी करता येइल.
बीज प्रक्रिया:
पेरणीपूर्वी टायकोडर्मा ५ ग्रम किवा थायमर २ ग्रम अधिक काबेन्डीन्झीम २ ग्रम प्रति किलो बीयाणांस चोळावे. मुळावरील कार्याक्षम गाठीच्या संख्येत वाढ व हवेतील नत्राच्या स्थिरीकारणासाठी- रायझोबियम २५ ग्रम प्रति किलो बियाणे. जमिनीत स्थिर झालेले’ स्फुरद उपलब्धत होण्यासाठी पीएसबी २५ ग्रम प्रती किलो बियाणे.
वाणाची निवड:
विपुला, फुले राजेश्वरी, बी.एस.एम.आर.-७३६, बी.डी.एन-७११, बी.डी.एन-७१६, बी.डी.एन-१३-४१ (गोदावरी), पी.के.व्ही. तारा, फुले तृप्ती
तुरीची पेरणी पद्धत व अंतर:
तुरीचे सलग पीक घ्यावयाचे असल्यास-
- लवकर तयार होणाऱ्या वाणाची पेरणी ४५ x १० से.मी. अंतरावर करावी.
- मध्यम कालावधीच्या वाणाची पेरणी ६० x २० से.मी. किंवा ९० x २० से.मी. अंतरावर करावी.
- अलीकडे घेण्यात आलेल्या प्रयोगामध्ये अधिक अंतरावर (१८० x ३० से.मी. किंवा ९० x ६० से.मी.) पेरलेल्या तूर पिकाचे आशादायक उत्पादन मिळालेले आहे.
बियाण्याचे प्रमाण:
मध्यम मुदतीच्या विपुला, फुले राजेश्वरी, पी.के.व्ही. तारा, बी.डी.एन-७११ या वाणासाठी हेक्टरी १२ ते १५ किलो.
उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लागवड करावयाच्या वाणासाठी हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे वापरावे
खत व्यवस्थापन:
सलग तुरीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी पेरणी वेळी द्यावे.
आंतरपीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस
केलीली खतमात्रा द्यावी.
आंतरमशागत:
तुरीचे पिक सुरवातीच्या काळात अतिशय सावकाश वाढते. त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. पीक४५ दिवसाचे होईपर्यंत कोळपण्या कराव्या व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेरणी नंतर लगेच वाफशावर (पुरेशा ओलावा) पेंडीमिथलीन २.५ ली. प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून जमिनीवर फवारावे.
आंतरपिके :
तूर पिकामध्ये आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते. यासाठी विविध आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे.
तूर पिकाची उत्पादक वाढ सुरु होईपर्यंत लवकर पक्व होणारी इतर पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास प्रती हेक्टरी उत्पादन वाढून आर्थिक नफा जास्त होतो.
आंतरपीकाचा प्रकार- ओळीचे प्रमाण:
तूर + बाजरी : १:२
तूर + सोयबीन : १:३
तूर + कापूस : १:६ किंवा १:८
तूर + मुग : १:२
तूर + उडीद : २:४
तूर + ज्वारी : २:४
शेंडा खुडणे:
तूर जर १८० x ३० सें.मी किंवा ९० x ६० सें.मी अंतरावर टोकण पद्धतीने लागवड केली असेल तर पेरणीनंतर एकदाच ४५ दिवसांनी झाडाच्या वरचा ५ सें.मी शेंडा खुडावा. त्यामुळे झाडाची उंची मर्यादित राहून प्राथमिक व दुय्यम फांद्यची संख्या वाढते त्यामुळे उत्पादनात १२ ते १५% वाढ होते असे प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे.
तुरीचे पुनर्लागवड तंत्रज्ञान (बिदर तंत्रज्ञान)
प्लास्टिक च्या बग (९” x ४”) साईज मध्ये घ्याव्यात व त्या मध्ये माती, खत आणि वाळू (७:२:१) या प्रमाणात घ्यावी.प्लास्टिक बग मध्ये दोन बिया तुरीच्या लावाव्यात. लावण्याचा कालावधी १५ मे ते ३० मे दरम्यान लागवड करावी.रोपांची वाढ झाली कि ३० दिवसांनी पुनर्लागवड शेतात करावी. लागवड करताना दोन रोपे व सरया मधील अंतर १८० x ३० सेमी इतक असाव. एक एकर जमिनी साठी ७४०४ एवढी रोपे लागतात
तुरी मध्ये शेंडा हा ४५ दिवस पेरल्यापासून व रोपांचीपुनर्लागवड केल्या पासून १५ दिवसांनी शेंडा खुडावा.
रोग व्यवस्थापन:
तूर पिकावर प्रामुख्याने मर व वांझ रोग येतात.
मर रोग:
लक्षणे:
रोगाची सुरुवात रोपावस्थेपासून होत असली तरी रोपे, फुले व शेंगा येईपर्यंत रोगाशी झगडत असतात हा रोग प्युजेरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची सुरवात जमिनीत होवून त्यांचे कवकतंतू मुळावाटे झाडात शिरून अन्ननलिकेत वाढत जातात त्यामुळे अन्ननलिकेतून पाणी आणि अन्नद्रव्ये घेणे बंद होते. रोगग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून ती जमिनीकडे झुकतात. सुरवातीस काही फांद्या आणि नंतर संपूर्ण झाडच वाळून जाते. खोडाचा व मुळाचा आतील भाग काळा पडतो आणि मर झालेल्या खोडावर तांबूस रंगाचे पट्टे दिसतात नंतर फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात. मर रोग फुले येण्यापूर्वीच आला तर १००% नुकसान होते, तसेच शेंगा झाडावर पक्व होत असताना रोग आल्यास उत्पादनात ३०% घट होत असे.
उपाय:
मर आणि वांझ हे तुरीवरील रोग आहेत. मर आणि वांझ या रोगांचा रोगग्रस्त नियंत्रणाचा उत्तम उपाय म्हणजे या रोगांना प्रतिकारक्षम असणारया वाणाची निवड करणे. उ.दा. बीएसएमआर-७३६, बीएसएमआर-८५३, विपुला पिकाची फेरपालट करणे. पेरणीपूर्वी बियाण्यास टायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. उन्हाळयात जमीन खोल नागरून चांगली तापू द्यावी. त्यामुळे मातीतील हि बुरशी जास्त उष्ण तापमानामुळे मरून जाईल.
उपाय: वांझ रोग
खोडवा तुर घेऊ नये. एरियोफाईड कोळीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता कोळी नाशकाची फवारणी
(उदा: डायकोफोल अथवा गंधक २० मि. ली १० लिटर पाण्यात टाकून फवारणी) वेळेत करावी. वांझ रोगग्रस्त झाडे समूळ नष्ट करावेत.
अशा पद्धतीने आपण जर सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर निशितचआपणास तुरीचे चांगले उत्पादन प्राप्त होईल.
संपर्कासाठी पत्ता: डॉ. अरविंद तोत्रे, वरिष्ठ संशोधन सहकारी, कडधान्य सुधार प्रकल्प मफुकृवि राहुरी ४१३ ७२२. ७७०९०२०१०१
लेखन - डॉ. अरविंद तोत्रे, डॉ. अमृता जंगले आणि सुयोग ठोंबरे
१,३: कडधान्य सुधार प्रकल्प मफुकृवि राहुरी ४१३ ७२२.
२: अर्थशास्त्र विभाग, मफुकृवि राहुरी ४१३ ७२२
Published on: 15 August 2023, 01:15 IST