समाजातील समस्त आया-बहिणींना विषमता आणि गुलामीच्या बेड्यातून मुक्त करणार्या सावीत्रीमाई आजच्या दिनी जन्मल्या, म्हणून मला या दिवसाचे सर्वाधिक अप्रुप आहे !
समस्त स्त्री वर्गावर आणि अप्रत्यक्षरित्या संपूर्ण समाजावर उपकार करणार्या सावीत्रीमाईच्या जन्मदिनानिनित्ताने समस्त आया-बहिणी आणि त्यांचे सुपुत्र यांना मला कांही प्रश्न विचारावेशे वाटतात ! १. मुळात समाजाचा प्रखर रोष पत्करून अंगावर पडणार्या चिखलमाती आणि शेणाचा मारा सहन करुन सावीत्रीमाईंनी स्त्रीशिक्षणाचा ध्यास का घेतला होता ? त्यापाठीमागाचा उद्देश फक्त स्त्री साक्षरता इतकाच होता काय ? स्त्रियांनी शिक्षण घेऊन नोकरी कामधंदा हाती येणारा पैसा नवर्याच्या ताब्यात द्यावा,
स्वत:च्या गरजांसाठी पुन्हा त्याच्यासमोर दिनवाणेपणे हात पसरावा, हाच माईचा स्त्री शिक्षणाचा उद्देश होता काय ? साक्षर होऊन व्रतवैकल्ये करतांना स्त्रीगुलामीचे समर्थन करणार्या पोथीपुरांणांची पारायणे स्त्रियांना करता यावीत याचा पण त्या उद्देशात समावेश होता काय ? मुलांनी विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरे देण्याऐवजी, मला माहीत नाही, ' जा तुझ्या पपाला विचार ' असं तुम्हाला सांगता यावं, हे सावीत्रीबाईंना अपेक्षित होत काय ? अजून अशी असंख्य प्रश्न उपस्थित होतात, त्याची यादी तुम्हाला पण माहित असेलच !
मला सातत्याने हे जाणवत आलेले अाहे की, माझ्या असंख्य आया-बहिणींना सर्व प्रकारच्या व्रतवैकल्यदिनाचे स्मरण असते पण ज्या माऊलीने आपल्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली, त्या माऊलीने कोणत्या साली आणि कोणत्या दिनी पहिली शाळा काढली, त्या माऊलीचा जन्मदिवस कोणता, अन स्मृतीदिन कोणता याचा मात्र विसर पडलेला असतो ! जिथ एवढ्या साध्या बाबी माहित नाहीत, तिथे माईंचे सुमग्र जीवन कार्य आणि विचारधारा माहीत असणे तर दूरच ! किमान आजच्या दिवसाच्या निमित्ताने समस्त आया-बहिणी आणि बांधवांनी "
सावीत्रीमाईंचा स्त्रीशिक्षणाबाबतचा नक्की काय उद्देश होता ? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा, हे अपेक्षित आहे
- मच्छींद्र गोजमे
Published on: 03 January 2022, 03:51 IST