Agripedia

तिळाच्या अधिक उत्पादन करता खालील प्रमुख सूत्राचा गरजेनुसार अभ्यास करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अंगीकार करावा.

Updated on 11 February, 2022 2:38 PM IST

तिळाच्या अधिक उत्पादन करता खालील प्रमुख सूत्राचा गरजेनुसार अभ्यास करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अंगीकार करावा.

(1) उन्हाळी तिळाचे अधिक उत्पादन घेण्याकरिता चांगली निचरा होणारी जमीन लागते. पाणी साचून राहणाऱ्या जमिनी उन्हाळी तिळाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन तयार करताना भुसभुशीत पण टाळूवर थोडीशी टणक राहील अशा पद्धतीने पूर्वमशागत करून जमीन तयार करावी. तीळ पिकासाठी जमिनीची मशागत करताना नागरट करणे टाळावे. नागरणी ऐवजी उन्हाळ्यात उभी-आडवी वखरणी करावी व शेवटच्या व शेवटच्या वखरणी च्या वेळेस एकरी साधारणता सहा ते आठ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकूनजमिनीत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे व पठाल फिरवून पेरणी करावी.

(2) शेतकरी बंधूंनो तीळ हे 25 ते 27 अंश से या पोषक वातावरणात वाढणारे पीक आहे. उन्हाळी तिळाची पेरणी फेब्रुवारी च्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. अतिशय लवकर थंडीत पेरणी करणे योग्य नाही तसेच पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेस मान्सून पूर्व पावसात उन्हाळी तिळाचे पीक सापडून नुकसान होणार नाही या अनुषंगाने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाळी तिळाची पेरणी पूर्ण करावी.

(3) शेतकरी बंधूंनो उन्हाळी तीळ लागवडीसाठी विदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी खालील दोन वानांची शिफारस केली आहे. या उन्हाळी तीळ वाणाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे नमूद केली आहेत.

(A) उन्हाळी-एकेटी -101: हे उन्हाळी तिळाचे वान साधारणता अठ्ठेचाळीस दिवसात फुलोऱ्यात येणारे व साधारणता 90 ते 95 दिवसात परिपक्व होणारे उन्हाळी तिळाचे वान आहे. या वाणाचे 1000 दाण्याचे वजन तीन ते साडेतीन ग्रॅम असून दाण्याचा रंग पांढरा मळकट आहे. या वानात तेलाचा उतारा साधारणता 48 ते 49 टक्के एवढा आहे. या उन्हाळी तीळ वाणाची हेक्टरी उत्पादकता 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्‍टर म्हणजेच साधारणतः तीन ते साडेतीन क्विंटल प्रति एकर एवढी नमूद केली आहे.

(B) उन्हाळी पीकेव्ही एनटी - 11: हे उन्हाळी तिळाचे वान साधारणता त्रेचाळीस दिवसात फुलोऱ्यात येणारे असून हेवान साधारणतः 98 ते 105 दिवसांत परिपक्व होते. या उन्हाळी तिळाच्या 1000 दाण्याचे वजन 3.4 ग्रॅम असून दाण्याचा रंग पांढरा आहे. या वानाचा तेलाचा उतारा साधारणता 48 ते 49 टक्के एवढा आहे. या उन्हाळी तिळाच्या वाणाची हेक्टरी उत्पादकता सात ते दहा क्विंटल प्रति प्रति हेक्टर म्हणजे साधारणत तीन ते चार क्विंटल प्रति एकर एवढी नमूद केली आहे.

   शेतकरी बंधूंनो वर निर्देशित वाणाची ची वैशिष्ट्ये वरील प्रमाणे नमूद केली असली तरी आपले गरजेनुसार गुणवैशिष्ट व इतर बाबी लक्षात घेऊन स्थानिक कृषी विद्यापीठाचे तज्ञ व शिफारशी लक्षात घेऊन प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उन्हाळी तिळाच्या वानाची प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन वाणाची निवड करावी. वर निर्देशित वानाचे उपलब्धते संदर्भात महाबीज, संबंधित कृषी विद्यापीठ, नामांकित शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच शासन मान्यताप्राप्त इतर बीजोत्पादन कंपन्या यांचेकडे विचारणा करावी तसेच पेरणी करता दर्जेदार, प्रमाणित, योग्य उगवण क्षमता असणारे तसेच आदर्श बियाण्याचे मानके पूर्ण करणारे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे.

(4) शेतकरी बंधूंनो पेरणीपूर्वी उन्हाळी तीळ पिकात खोड व मुळकुजव्या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी.

(5) शेतकरी बंधूंनो उन्हाळी तिळाचे बी फार बारीक असल्यामुळे पेरणी करताना तिळाच्या बियाण्यात समप्रमाणात वाळू किंवा गाळून घेतलेले शेणखत किंवा राख किंवा माती मिसळून पेरणी करावी म्हणजे तिळाचे बियाणे दाट न पडता सारख्या अंतरावर पडेल. सलग उन्हाळी तिळाचे पीक घेताना पाभरीने किंवा तिफणीने दोन ओळीतील अंतर 30 सेंटिमीटर व दोन झाडांतील अंतर 15 सेंटिमीटर राहील या प्रमाणे पेरणी करावी. उन्हाळी हंगामाकरिता तिळाचे बियाणे पेरताना हेक्टरी तीन ते चार किलो बियाणे प्रति हेक्‍टर म्हणजेच साधारणता 1.5 किलो बियाणे प्रति एकर याप्रमाणे वर निर्देशित अंतर राखून बियाणे पेरणी करावी.

(6) शेतकरी बंधूंनो उन्हाळी तिळाचे पिकास खताचे व्यवस्थापन करताना साधारणता 25 किलो नत्र अधिक 25 किलो स्फुरद प्रति हेक्टर अशी शिफारस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचेकडून करण्यात आली आहे.नत्राच्या शिफारशीत मात्रेत पैकी अर्धा नत्र म्हणजे साधारणता 12.5 किलो नत्र प्रति हेक्‍टर तसेच संपुर्ण स्फुरद म्हणजे 25 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी हा पेरणीच्या वेळेस व उर्वरित 12.5 किलो नत्र प्रति हेक्‍टर पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावयाची शिफारस आहे. सर्वसाधारणपणे ह्या शिफारसी गृहीत धरून माती परीक्षणाच्या आधारावर उन्हाळी तीळ पिकास झिंक व सल्फर या अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास पूर्वमशागतीच्या वेळेस एकरी सहा ते आठ गाड्या चांगले कुजलेले शेणखत व त्याबरोबर एकरी सहा ते आठ किलो झिंक सल्फेट व एकरी सहा ते आठ किलो सल्फर जमिनीत टाकून चांगले मिसळून घ्यावे. नंतर पेरणीच्या वेळेस प्रती एकर 25 किलो अमोनियम सल्फेट किंवा दहा ते अकरा किलो युरिया तसेच त्या बरोबर 62.50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रती एकर पेरणीच्या वेळेस द्यावे व नंतर पेरणीनंतर 30 दिवसांनी प्रती एकर दहा किलो युरिया द्यावा. या अन्नद्रव्याच्या मात्रे सोबत उन्हाळी तीळ पिकात पीक फुलावर असताना व बोंडे धरतांना दोन टक्के डी.ए.पी. ची फवारणी करावी.

(7) शेतकरी बंधूंनो उन्हाळी तिळाच्या पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नागे भरून घ्यावेत. उन्हाळी तीळ पेरणीनंतर साधारणता पंधरा ते वीस दिवसांनी पहिली व त्यानंतर आठ दिवसानंतर दुसरी विरळणी करून दोन तिळाच्या रोपात दहा ते पंधरा सेंटिमीटर अंतर राहील व एकरी जवळपास एक लाख तिळाच्या झाडाची संख्या राहील या दृष्टीने काळजी घ्यावी. उन्हाळी तीळ पिकात आवश्‍यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या किंवा खुरपण्या देऊन व निंदण करून शेत तणविरहित ठेवावे. सुरुवातीच्या एक महिन्याच्या काळात उन्हाळी तिळाचे पीक तणविरहित राहील याची काळजी घ्यावी.

(8) उन्हाळी तिळाच्या पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्वी व पेरणीनंतर ताबडतोब पाणी द्यावे व त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार साधारणता 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. उन्हाळी तीळ पिकात फुलोरा अवस्थेत व तिळाचे बोंडे भरतांना पिकास पाण्याचा ताण पडणार नाही व संरक्षित ओलीत दिले जाईल त्याची विशेष काळजी घ्यावी. उन्हाळी तीळ पिकात पाणी देताना जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

(9) शेतकरी बंधूंनो उन्हाळी तीळ पिकात तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, बोंडी पोखरणारी अळी, यासारख्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास योग्य निदान करून नुकसानीची पातळी लक्षात घेऊन वर निर्देशित किडी करता क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 ते 40 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

(10) याशिवाय उन्हाळी तीळ पिकावर गाद माशी ही कीड तसेच अनुजीवि करपा, खोडकुज मूळकूज, भुरी तसेच पर्णगुच्छ यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून तज्ञांच्या शिफारशीप्रमाणे योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

(11) शेतकरी बंधूंनो तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास तिळाच्या बोंडे फुटून बी सांडते व नुकसान होते. त्यामुळे तिळाचे पीक परिपक्व झाले याचे योग्य निदान करून योग्य वेळी तिळाच्या पिकाची कापणी करून कापणी केल्याबरोबर तिळाच्या पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. साधारणता तीन ते चार दिवसांनी तिळाच्या बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावे. काही तिळाच्या बोंडे तडकले नसल्यास साधारणता चार ते पाच दिवसांनी परत तिळाच्या पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून वाळवून साठवावे.

टीप : (१) वर निर्देशित बाबी ह्या उन्हाळी तीळ संदर्भातील काही मूलभूत बाबी आहेत त्याचा वापर करण्यापूर्वी स्थानिक कृषी विद्यापीठाचे तज्ञ तसेच संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशी तसेच प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच त्याचा गरजेनुसार अंगीकार करावा.

(२) कोणत्याही रसायनाची फवारणी करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे रसायने वापरावी तसेच अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे व सुरक्षित फवारणी तंत्राचा अंगीकार करावा.

राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Sasamum summer season more some formulas
Published on: 11 February 2022, 02:38 IST