दोडका ही वेलवर्गीय भाजीपाला पीक असून भारतामध्ये अनेक ठिकाणी दोडक्याची लागवड केली जाते. दोडका हा प्रकृतीने थंड असून क जीवनसत्वे, कर्बोदके आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. त्यासोबतच दोडक्यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम आणि अ जीवनसत्व देखील मोठ्या प्रमाणात असते.
दोडक्याचा आणि त्याच्या बी चा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये केला जातो. दोडक्याची वेल गाईच्या दुधामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये उठून तीन दिवस घेतल्याने किडनी स्टोन वीरघळू शकतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्यांना दोडक्याची नियमित सेवन करावे. या अशा औषधी गुणांनी युक्तदोडक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.या लेखामध्ये आपण दोडक्याची लागवड पद्धत जाणून घेणार आहोत.
दोडके ची लागवड पद्धत
- हवामान-दोडका पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोरडे समशीतोष्ण हवामान चांगले असते. कमी तापमानामध्ये आणि जास्त आर्द्रता असल्यास या पिकाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे रोग आणि कीड यांचे प्रमाण वाढू शकते. 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान दोडक्याच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. तसेच सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असणे देखील महत्त्वाचे असते.
- जमीन- दोडका पिकासाठी अर्धा ते एक मीटर खोलीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम काळी कसदार जमीन निवडावी.शार युक्त जमिनीत या पिकाची लागवड करणे टाळावे. हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची जमीन चांगली असते.काळ्या जमिनीमध्ये जर पाणी धारण करण्याची क्षमता 50 टक्क्यांच्या वर असेल तर अशा जमिनीमध्ये दोडक्याची उत्पादन घेणे टाळावे.
- लागवड कालावधी- या पिकाची लागवड खरीप हंगामात जून-जुलैमध्ये तर उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान करावी. जास्त पावसाच्या भागात लागवड करायची असेल तर हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात लागवड करणे महत्त्वाचे असते.
- दोडक्याच्या उत्पादनक्षम जाती-अ)- पुसा नसदार: या दोडक्याच्या जातीची लागवड केल्यापासून 60 दिवसानंतर वेलींना फुले यायला सुरुवात होते. या जातीची फळे 30 ते 40 सेंटीमीटर लांब व फिक्कट हिरव्या रंगाची व कोवळी शिरा असलेली असतात. या जातीच्या एका वेलीवर 15 ते 20 फळे लागतात. ही जात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी चांगली आहे.
आ)- को.1- या जातीची फळे 60 ते 75 सेंटिमीटर लांब असून या जातीच्या एका वेलास दहा ते पंधरा फळे लागतात.
5- पूर्वमशागत- दोडका लागवड करण्याआधी जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून तणांचे व गवतांचे अवशेष वेचून शेतामध्ये कंपोस्ट खत टाकावे. वखरणी करून खत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. दोडक्या साठी दोन ओळीत अडीच ते साडेतीन मीटर अंतर व दोन वेलीत ऐंशी ते शंभर सेंटिमीटर अंतर ठेवावे. प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन बिया लावावे.लागवड केल्यानंतर उगवण होईपर्यंत पाणी देताना विशेष काळजी घ्यावी.
- लागवड पद्धत- दोडक्याची लागवड केल्यानंतर चांगली मशागत करावी व त्यानंतर एकशे वीस ते दीडशे सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. दोडक्याची बी पाण्यामध्ये सहा तास भिजत ठेवावे.हे वरंब्याच्या एका बाजूवर 90 सेंटिमीटर अंतरावर तीन चार बिया टाकून पेरावे. खरीप हंगाम मध्ये लागवड करायची असेल तर दोडक्याची बी गादी वाफ्यावर पेरावे. पेरणी केल्यानंतर तीन आठवड्यांनी रोपांची विरळणी करून एका जागेवर फक्त दोन निरोगी आणि सशक्त रोप ठेवावे.
- खत व्यवस्थापन- लागवड करण्याअगोदर शेताची चांगली मशागत करून एकरी पाच ते सात टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. माती परीक्षण करून घेतले असेल तर माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. सर्वसाधारणपणे एका एकर मधील दोडक्याला 30 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावे.
- आंतर मशागत- उगवण झाल्यानंतर आंतरमशागत करताना वेली भोवतीचे तण काढून स्वच्छता ठेवावी. जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी. या पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अथवा झाडाच्या वाळलेल्या फांद्यांचा आधारासाठी वापर करावा. तसेच तारांचा वापर करून तारांवर वेली पसरवून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो.
- पाणी व्यवस्थापन- ठिबक सिंचनामुळे दोडके हे मोठे व चविष्ट होते. आजूबाजूची पाने कोरडी राहिल्याने झपाट्याने वाढ होते. पाणी देताना खोडा ची डेट भिजणार नाही नाही याची काळजी घ्यावी.अनियमित भिज पाणी न देता नियमित पोच पाणी द्यावे. थंडीमध्ये सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत पाणी द्यावे.फुलोरा लागल्यानंतर चौथ्या दिवशी पाणी द्यावे. पाण्याचा ताण जर बसला तर दोडका वाढतो परंतु आतून पोकळ राहिल्याने बाजारपेठ अशा फळांना चांगला भाव मिळत नाही.
- काढणी- दोडका या पिकाला लागवडीपासून 60 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. पुणे उमलल्या नंतर 12 ते 15 दिवसांत फळे तयार होतात. फळांची काढणी करताना कोवळ्या फळांची तोडणी करावी. दोन ते चार दिवसांच्या अंतराने दोडक्याच्या फळांची तोडणी करावी.
- उत्पादन- दोडका या पिकाचे उत्तम नियोजन केले तर प्रति हेक्टरी सात ते दहा टन फळांचे उत्पादन मिळू शकते.
Published on: 08 February 2022, 12:54 IST