अनेक ठिकाणी पारंपरीक पद्धतीने शेती केली जाते. आता मात्र, यामध्ये हळूहळू बदल होऊ लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. आता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे.
महाराष्ट्रातील प्रगतशील जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. कोल्हापूरात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली आहे. कागल तालुक्यात पहिल्यांदाच शेतामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत औषध फवारणी करण्यात आली आहे. हा अभिनव प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने केला आहे.
ड्रोनद्वारे औषध फवारणीचे फायदे
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो. परिणामी जिल्ह्यात मुबलक पाणी असते. त्यामुळे इथे नेहमीच विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतात. राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा वेळ तर वाचणार आहेच, त्याचबरोबर औषध, पैसे, पाणी आणि श्रमाचीही बचत होणार आहे. पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी इथला शेतकरी नेहमीच आपल्या शेतीत अत्याधुनिकतेची जोड देत विविध बदल करत आला आहे.
जिल्ह्यात प्रथमच ड्रोन द्वारे औषध फवारणीचा प्रयोग
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच ड्रोन द्वारे औषध फवारणीचा प्रयोग झाला आहे. सध्या मजुरांची उपलब्धता नसल्याने फवारणीसाठी होणाऱ्या अडचणीवर ड्रोन द्वारे औषध फवारणी हे अतिशय उपयुक्त ठरत आहे. परदेशात कृषी क्षेत्रात होणारा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आता कोल्हापूर जिल्ह्याच्या साखर पट्ट्यात होऊ लागला आहे. त्यामुळे नक्कीच इथल्या शेतकऱ्यांना याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
ड्रोन द्वारे औषध फवारणीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा
श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि चातक इनोव्हेशन यांच्या माध्यमातून औषध फवारणी ऊस पिकावर सुरू केली आहे. शाहू साखर कारखाना कार्यक्षेत्रात सोबतच गेटकेन अशा 11 हजार हेक्टर क्षेत्रावर ही औषध फवारणी ड्रोनद्वारे केली जाणार आहे. पारंपरिक औषध फवारणीने वाढ झालेल्या उसाला फवारणी करण्यास अडचण येते तर शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे ड्रोनद्वारे औषध फवारणी हा राज्यातील पहिला प्रयोग शाहू कारखान्यामार्फत राबवण्यात येतोय. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Published on: 17 January 2022, 04:47 IST