अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची लागवड होत आहे. त्यादृष्टीने राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारा व गवतवर्गीय पीक संशोधन विभागाने गुणवत्तापूर्ण १६ वाण संशोधित केले आहेत. खरीप, रब्बी अशा हंगामानुसार त्यांची वैशिष्ट्ये व गुणधर्म असून शेतकऱ्यांसाठी ती उपलब्धही करण्यात येत आहेत.राज्यात शेतीसोबत पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७० ते ८० टक्के आहे.
पूर्वी चारा उत्पादनासाठी पारंपरिक वाणांचा वापर व्हायचा. अलीकडील काळात सुधारित व संशोधित वाणांवर भर दिला जात आहे. राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात चारा पिके व गवतवर्गीय पिके संशोधन विभाग आहे. त्यामार्फत या पिकांच्या १६ जाती संशोधित झाल्या केल्या आहेत. त्यात राज्य व अखिल भारतीय स्तरावर प्रत्येकी आठ वाणांचा समावेश आहे.
हेही वाचा : सकस चाऱ्यासाठी लसूण घासची करा लागवड, पशुंसाठी आहे उपयुक्त
*विभागातील पिकांची विविधता*
खरीप- ज्वारी (रुचिरा, अमृता, गोधन), बाजरी (जायंट बाजरा), मका (आफ्रिकन स्टॉल), चवळी
रब्बी- ओट, बरसीम, लसूणघास
गवतवर्गीय- मारवेल गवत (फुले मारवेल, ०६४०, बागायतीसाठी फुले गोवर्धन), संकरित नेपियर,
(फुले जयवंत, फुले गुणवंत), मद्रास अंजन, स्टायलो (फुले क्रांती), ओट (फुले हरिता, फुले सुमती)
झाडे- अंजन
झुडूप वर्गीय- शेवरी, दशरथ घास
लसूण घास (आरएल ८८)
बहुवार्षिक संकरित नेपियर, मारवेल, लसूण घास व स्टायलो यांच्या सुधारित वाणांना अधिक मागणी असते. दर तीन आठवड्याने लसूणघासाची तर नेपियरची दर सहा आठवड्याने कापणी करता येते. नेपियर व लसूणघासाचे प्रत्येकी तीन वर्षांपर्यंत उत्पादन घेता येते.
अलीकडे बहुतांश भागात हिरव्या चाऱ्यासोबत मुरघास तयार करण्यासाठीही मक्याची लागवड केली जात आहे.
प्रती वर्षी मिळणारे चारा उत्पादन प्रति हेक्टर (नेपियर व्यतिरिक्त सर्व क्विंटल) नेपियर गवत- १२० ते १५० टन,मका- ५०० ते ६००,बाजरी- ४०० ते ५००,ज्वारी- ५०० ते ५५०,दशरथ गवत- ६०० ते ८००,स्टायलो- २५० ते ३००,लसूण घास- एकहजार ते बाराशे.,मारवेल गवत- ६०० ते ८००,ओट- ५०० ते ६००,दशरथ गवत- ६०० ते ८००
उत्पादन
अखिल भारतीय चारा पिके संशोधन योजनेतून तसेच राज्य शासनाच्या गवत संशोधन योजनेतून निधी उपलब्ध करून संशोधन केले जाते. लसूण घासावर मार्चमध्ये मावा, तुडतुडे तर एप्रिल-मे मध्ये शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाकडून मार्गदर्शन केले जाते.अलीकडील वर्षांत मक्यावर अमेरिकन लष्करी अळीची समस्या दिसून येत आहे. त्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. विद्यापीठ कार्यक्षेत्रासह विदर्भ, मराठवाडा विभागातूनही ठोंबांची खरेदी केली जाते. नेपियर गवत प्रति ठोंब एक रुपये, अन्य गवत ३०० रुपयांना एक हजार ठोंबे तर लसूणघासाचे बियाणे ८०० रुपये प्रति किलो दराने विकले जाते. विद्यापीठात सुमारे तीस हेक्टर क्षेत्रावर बियाण्याचे उत्पादन केले जाते. दरवर्षी सुमारे वीस लाख ठोंबांची विक्री होते.
बियाणे उत्पादन ( क्विंटल व वर्षभरातील)
मका- ६० ते ७०,ज्वारी- ३० ते ४०,ओट- २५,लसूण घास- २ ते ४,बाजरी- ८ ते १०
स्टायलो (फुले क्रांती)- २ ते ३,ओट (फुले हरिता, फुले सुरभी)- २० ते २५,मारवेल गवत ठोंबे- चार ते साडेचार लाख,मद्रास अंजन ठोंबे- ३ ते ४ लाख, संकरित नेपियर ठोंबे (फुले जयवंत, फुले गुणवंत)- २० लाख
उपलब्धता
विद्यापाठीचे बियाणे विक्री केंद्र आहे. तेथे खरीप व रब्बी हंगाम काळात लागणारे चारा बियाणे उपलब्ध होते.
वाणांची वैशिष्ट्ये
अलीकडे शेळीपालनाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्या दृष्टीने दशरथ व स्टायलो गवत हे पाण्याचा ताण सहन करणारे बहुवार्षिक वाण आहेत. शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रथिने महत्त्वाचे असतात. स्टायलोमध्ये १३.५ ० टक्के तर दशरथ गवतात १८ टक्के प्रथिने असतात.
कोरडवाहू, खडकाळ भागासाठी सुधारित काटे विरहित निवडुंग वाण संशोधित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात पाण्याचे प्रमाण ८० टक्के आहे.
हे पीक शेळ्या-मेंढ्यांसाठी फायदेशीर आहे
- खरिपात बाजरी, ज्वारी, मका, चवळी पेरणी आणि गवतवर्गीय पिकांची लागवड करून चारा उपलब्ध करता येतो.
- ज्वारीच्या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण ८ ते १० टक्के.
- ज्वारी हिरवा व वाळलेला अशा दोन्ही प्रकारात वापरता येते.
- बाजरीत ७ ते ९ टक्के प्रथिनांचे प्रमाण. अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीत तग धरते.
- मका पौष्टिक व भरपूर शर्करायुक्त. प्रथिनांचे प्रमाण ९ ते ११ टक्के.
- चवळी द्विदल वर्गीय असून प्रथिनांचे प्रमाण १३ ते १५ टक्के असते.
- लसूणघास बहुवार्षिक व द्विदल वर्गीय असून प्रथिनांचे प्रमाण १८ ते २० टक्के.
- ओट रब्बी हंगामासाठी योग्य. प्रथिनांचे प्रमाण ८ ते १० टक्के,गवतवर्गीयात संकरित नेपियरमध्ये हिरव्या चाऱ्याची अधिक उपलब्धता. ऑक्झॅलिक आम्लाचे प्रमाण दोन ते अडीच टक्के. प्रथिनांचे प्रमाण ९ ते १० टक्के.
- बागायती मारवेल गवत बहुवार्षिक. रुचकर, गोड असून साखरेचे प्रमाण ४.५० टक्के. पचनियता ६१.३० टक्के.
- जिरायती मारवेल गवत बहुवार्षिक. पूरक चाऱ्यासाठी उपयुक्त.अंजन गवत बहुवार्षिक. क्षारपड जमिनींसाठी कुरण विकासासाठी योग्यण
- स्टायलो गवत बहुवार्षिक, द्विदल वर्गीय, प्रथिनांचे प्रमाण १२ ते १४ टक्के. पेरणी केल्यावर हे बियाणे मातीआड न करता तसेच ठेवावे लागते.
दशरथ घास पाण्याचा ताण सहन करणारे. प्रथिनांचे प्रमाण १८ टक्के.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 22 May 2021, 05:57 IST