शेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून घेतल्यास त्यांना खांदेसूज हा आजार होतो. खांदेसूजी ही प्रामुख्याने मानेवरील जू मानेस सतत घासल्यामुळे होते शेतकाम करताना मानेची कातडी जू व जुवाला असणारी खीळ यामध्ये चेंगरते आणि खांदेसूज होते काहीवेळा जुवाचा मानेवर टेकणारा पृष्ठभाग हा अत्यंत खडबडीत असतो. त्याची मानेस सारखी इजा होते खांदेसुजी होते. आपल्याकडे असणारी बैलजोडी ही अनेकदा कमी जास्त उंचीची असते. यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जू हे समांतर राहत नाहीत. परिणामी, जू हे तिरकस ओढण्यात येते. दोन्ही बैलांना खांदेसुजीचा आजार होतो.
१)तरुण वयातील जनावरे आणि सतत कामाचा ताण असणाऱ्या जनावरांना हा आजार जास्त होतो.
२)जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेत कामास जुंपल्याने हा आजार होतो.
३)बलगाडीत जास्त वजन भरून ओढायला लावल्यासही हा आजार होऊ शकतो.
४) कच्चे व खराब रस्त्यावर जास्त वजन असणारी बैलगाडी ओढायला लावल्यासही हा आजार होऊ शकतो.
लक्षणे
१ खांद्यावरील भागावर भयंकर सूज येते.
२.सूज ही खांद्याची कातडी व त्याखालील त्वचेच्या भागावर येते.
३.जू ओढताना खांद्याची कातडी ही मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्यामुळे कातडीखालील पडदा वेगळा होऊन त्वचेखाली रक्त साचते.
४.खांद्यावरील सूज गरम व अत्यंत वेदनादायी असते.
५. सुजेचा आकार हा लिंबू ते फुटबॉल एवढा असतो.
६.सूज मऊ, पाणी असणारी ते कडक लागणारी असू शकते.
७ सुजेतून फुटून पाणी येऊ शकते.
८. खांद्यावर अशी सूज आल्यामुळे बैल काम करू शकत नाही.
९. खांदेसुजी झालेल्या बैलास आराम दिल्यास सूज कमी होते. कामास जुंपल्यास पुन्हा वाढते
१०. खांदेसूज झालेला बैल विनाउपचार कामास जुंपल्यास कातडीवर लहान जखम होऊन बेंड येतात.
११.खांद्यावर मोठी जखम झाल्यास त्यात रोगजंतूंचा शिरकाव होऊन आसडी पडते.
१२. अनेकदा प्रथम खांद्यावर लहान आकाराच्या गाठी येतात. त्या वाढून खांद्याचा कर्करोगसुद्धा होतो.
१३.मानेवर कातडी गुंडाळली जाते.
१४. जनावरास कामास जुंपल्यास प्रचंड वेदना होतात.
उपचार
१. खांदेसुजीची लक्षणे जनावरांत दिसल्यास पशुवैद्यकाकडून उपचार करावा.
२.नुकत्याच झालेल्या खांदेसुजीत सुजलेल्या भागावर ४ ते ५ दिवस खांदेसूज कमी करणारे मलम लावावे.
३. ताज्या सुजेत बर्फाने ३ ते ४ दिवस शेकावे.
४. मॅग्नेशिअम सल्फेट ग्लिसरीनमध्ये मिसळून खांद्यावर लावल्यास नुकतीच आलेली सूज कमी होते.
५.जुन्या सुजेत गरम वाळू कपड्यात गुंडाळून खांद्यास ४ ते ५ दिवस शेक द्यावा, गरम पाण्यानेसुद्धा शेक दिला तरी चालतो.
६.शेक देताना जनावरास पोळणार नाही याची खात्री करून घ्यावी अन्यथा त्वचा भाजण्याची शक्यता असते गरम पाणी किंवा भुस्सा याचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानाच्या पेक्षा थोडे जास्त असावे. यासाठी गरम पाणी, वाळू किंवा भुश्शास प्रथम आपण स्पर्श करून पाहावे म्हणजे त्याचे तापमान कमी आहे याची खात्री होईल.
७.खांद्यावर आलेल्या गाठी या माऊ पू असणाऱ्या असतील, तर पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून घेऊन त्यातील पू काढून टाकावा. त्याचे रोज ड्रेसिंग करावे.
८.उपचार करत असणाऱ्या जनावरास कामास जुंपू नये, पूर्णपणे आराम द्यावा.
९.औषधोपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत नसतील तर खांद्यावर पशुवैद्यकाकडून छोटीशी शस्त्रक्रिया करून या काढून टाकाव्यात. त्यानंतर योग्य औषधोपचार व काळजी घ्यावी
आजार टाळण्यासाठी उपाययोजना
१.खडबडीत पृष्ठभाग असणारे जू बदलावे.
2.समान उंचीची बैलजोडी कामास जुंपावी दोन्ही बैलांच्या खांद्यावर पडणारे वजन हे समान असावे.
३.बैलांना भरपूर काम न देता थोड्या थोड्या विश्रांतीने काम द्यावे.
४. जनावरांना व सतत कामाचा ताण देवू नये
६. जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेत कामास जुंपू नये.
७. बैलगाडीत जास्त वजन भरून ओढायला लावू नये.
८.खराब रस्त्यावर जास्त वजन असणारी गाडी ओढायला लावू नये.
संकलन - प्रवीण सरवदे, कराड
Published on: 20 November 2021, 09:11 IST