जर आपण भाजीपाला पिकांचा विचार केला तर कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि नफा देणारे पिक म्हणून यांना ओळखले जाते. परंतु जर रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार केला तर या भाजीपाला पिकांवर विविध प्रकारची किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
त्यामुळे एकात्मिक व्यवस्थापना सारख्या पद्धतींचा अवलंब करून किडींचे नियंत्रण करणे खूप गरजेचे असते. ज्यामुळे संबंधित पिकाचे नुकसान टळते आणि उत्पादन देखील चांगले येते. या पार्श्वभूमीवर आपण गुलाब तसेच टोमॅटो, भेंडी, वांगी तसेच ढोबळी मिरची सह बऱ्याच भाजीपाला पिकावर येणाऱ्या लाल कोळी या किडीच्या एकात्मिक नियंत्रणाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.
अशा पद्धतीने करा लाल कोळीचे एकात्मिक व्यवस्थापन
1- लाल कोळीच्या नियंत्रणासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंतरमशागत खूप महत्त्वाचे असून वेळोवेळी खूरपणी करून पिक तनमुक्त ठेवणे खूप गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बांधावरील रानभेंडी व अंबाडी सारखे तण नष्ट करणे गरजेचे आहे.
2- तसेच या पिकांना खताचा पुरवठा करताना अतिरिक्त नत्र खतांचा वापर टाळणे गरजेचे आहे.
3- तसेच पिकाच्या ज्या भागावर या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे अशा पिकाचे प्रादुर्भावग्रस्त अवशेष जमा करून ते किडींसह शेतावर जाळून टाकणे अथवा जमिनीमध्ये गाढणे महत्त्वाचे आहे.
सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे पाण्याचे फवारणी होय
लाल कोळीचे एक प्रामुख्याने वैशिष्ट्य असते की ती तिच्या वसाहतीच्या भोवती जाळी विणते. त्यामुळे तुम्ही एका एकरला 400 ते 500 लिटर कीडनाशकाचे द्रावणाचे फवारणी केली तरीसुद्धा ते लाल कोळी या किडी पर्यंत पोहोचू शकत नाही.
त्यामुळे या किडीचे प्रभावी नियंत्रण होत नाही. यासाठी एका एकरला 1000 ते 2000 लिटर पाणी जोरदार प्रेशरने जर फवारले तर विणलेले जाळे तुटते व काही प्रमाणामध्ये अंडी पाण्याने धुऊन जमिनीवर पडतात व किडींची संख्या कमी होते. आदल्या दिवशी पाणी फवारल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही कीडनाशकाची फवारणी घेतली तर किडीचे यशस्वी नियंत्रण होण्यास मदत होते.
सल्फरचा वापर देखील ठरतो महत्वपूर्ण
जेव्हा पिकांवर बुरशीचा अटॅक होतो तेव्हा सल्फर चा वापर फवारणी करता जर केला तर भुरी रोग तसेच लाल कोळीचे देखील नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळते. विविध प्रकारच्या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी सल्फरचा उपयोग काही अंशी उपयोगाचा ठरतो.
किडींच्या सुरुवातीच्या अवस्थांचे सल्फर चा वापर केल्यामुळे 30 ते 40 टक्क्यांपर्यंत नियंत्रण मिळणे शक्य आहे.
निंबोळी अर्काचा वापर देखील आहे परिणामकारक
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही निंबोळी अर्क चार टक्के म्हणजेच चार किलो निंबोळी पावडर प्रति 100 लिटर पाणी याप्रमाणे प्रति दहा लिटर पाण्यातून फवारले तरी लाल कोळीचे नियंत्रण चांगले होते.
Published on: 04 November 2022, 09:37 IST