Agripedia

एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते. कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे,

Updated on 18 March, 2022 3:13 PM IST

एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते. कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे, तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई, तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.

एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले, ''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल, इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल, पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो, तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या, मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.''देव हसला आणि म्‍हणाला, ''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज, 

आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला.

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते, तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की, आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. 

पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये दाणेच नव्‍हते मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते. त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते, तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात वाढण्याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही, तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही. जो पर्यंत पिकांचे मूळ जमिनीत घट्ट होत नाही, तो पर्यंत त्यात बिजतत्व ऊतरणार तरी कसे? सगळे जर मनाप्रमाणे घडले, तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.

आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून आपली मुळे घट्ट करण्‍याचा प्रयत्‍न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही, म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते, तेव्‍हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.''आता मात्र शेतक-याला जीवनाचे सार उमगले आणि आयुष्यात वादळ वार्यांना सामोरे जाऊनच जीवन खर्‍या अर्थाने जगायचे असते हे त्याच्या लक्षात आले.

तात्पर्य :-

जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील, तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे, हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल, तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाहीत.

 

नाथ भक्त श्री अरुण भाऊ पगार

English Summary: Read this one time Farming agriculture and God
Published on: 18 March 2022, 03:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)