मागच्या वर्षीपासून हळदीचे क्षेत्र हे थोड्या प्रमाणात वाढले असून हळद उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे पिकावर येणारे रोग व किडी याचे व्यवस्थापन कसे करावे शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन झाले पाहिजे यावर आज आपण चर्चा करणार आहोत.पानांवरील ठिपकेहा रोग दोन प्रकारच्या बुरशींमुळे होतो.१. कोलॅटोट्रीकम कॅपसीसी व २.टॅफरीन मॅक्युलन्स.1)पहिल्या प्रकारच्या बुरशीमुळे ठिपक्यांचे आकार लंब गोलाकार असून वेगवेगळ्या आकाराचे दिसून येतात. ठिपक्यांचा मध्यभाग पांढरट जांभळ्या रंगाचा असून कडेने विटकरी रंगाचे ठिपके दिसून येतात. हे ठिपके एकमेकांत मिसळून वाढत जावून संपूर्ण पान वाळून जाते. 2)दुस-या प्रकारात पानांच्या वरच्या पृष्ठभागावर असंख्य लहान, गोलाकार किंवा ता-यांसारखे लाल ठिपके तयार होतात. ठिपक्यांच्या मध्यभागी बुरशीची काळी वर्तुळाकार फळे रचल्यासारखी दिसतात. नंतरच्या काळात ठिपक्यांच्या सभोवताली पिवळी कडा तयार होते. असंख्य ठिपके तयार होत असल्यामुळे संपूर्ण पान लाल रंगाचे होवून वाळून जाते.या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट पाने, फुले याद्वारे होत असल्यामुळे रोगट पाने व फुले नष्ट करावीत.
लावणीपूर्वी व साठवणुकीपूर्वी डायथेन एम-४५ या बुरशीनाशकाचे ०.३% किंवा कार्बेन्डॅझीम ०.१% यांचे द्रावणात बेणे कमीत कमी २५ ते ३० मिनिटे बुडवावीत. पीकावर रोग आढळताच ०.२५% कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा १% बोर्डोमिश्रण फवारावे.हळदीचे कंद नासणे-मुळकुजव्या व खोडकुजव्या ह्या नावांनी हा रोग ओळखला जातो. या रोगामुळे हळदीचे जमिनीतील कंद मऊ बनतात. त्यांना पाणी सुटून ते कुजतात व झाडांची पाने पिवळी पडून ती वाळू लागतात. शेवटी संपूर्ण झाड वाळून जाते. यासाठी हळदीचे कंद लागवडीपूर्वी कीटकनाशकांचे द्रावणांत व नंतर ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून नंतरच लागवड करावी. रोगट झाडे मुळांसकट उपटून जाळावीत. तसेच शेतात पाणी साचू देवू नये. खोडावर मातीची भर द्यावी व जमिनीत चांगली हवा खेळती ठेवावी. हा रोग ऑगष्ट-सप्टेंबर मध्ये हमखास दिसतो.हळदीचे कंद नासणे हा रोग बुरशीजन्य असून बुरशीची बीजे जमिनीत राहतात व वाढतात.हा रोग प्रामुख्याने १.बुरशी पिथियम व फ्युजॅरियम,२.सुत्रकृमी, किंवा ३.कंदमाशी यांच्यामुळे होतो. कधी कधी प्रतिकुल परिस्थितीत वरील रोगांची कारण जमिनीत किंवा बेण्यात सुप्तावस्थेत राहतात. या रोगात पानांचे शेंडे वरून व कडेने पिवळी पडून खालपर्यंत वाळत जातात. खोडांचा जमिनीलगतचा बुंधा काळपट राखी रंगाचा पडतो. गड्डा व हळकुंडे काळी व निस्तेज पडतात. हाताने दाबल्यास त्यातून घाण पाणी बाहेर येते. झाडाचे खोड थोड्याशा झटक्याने चटकन हातात येते.
रोगावरील नियंत्रण पद्धत याचे नियंत्रणासाठी लागवडीचे बेणे निरोगी वापरावे. रोगट कीडग्रस्त बेणे काढून टाकावेत. जमीन शक्यतो हलकी ते मध्यम पण उत्तम निच-याची निवडावी. जरूर भासल्यास पावसाळ्यात ३५ ते ४० फूट अंतरावर ३० ते ४० सेंमी खोलीचे उतारास समांतर चर घ्यावेत म्हणजे पाणी साचणार नाही.लावणीपूर्वी बेण्यास प्रक्रिया करूनच लागवड करावी.यासाठी कंदमाळीच्या नियंत्रणासाठी सुचविल्याप्रमाणे कीटकनाशके व कंद कुजवणा-या रोगाचे नियंत्रणासाठी बुरशीनाशके वापरावीत. त्यासाठी ट्रायकोडर्मा 1 लीटर 200 लिटर पाण्यासाठी बेणेप्रक्रिया करून नंतर रासायनिक औषधांची बेणेप्रक्रिया करावी पुढीलप्रमाणे क्विनॉलफॉस किंवा डायमिथोएट २० मिली + कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ हे बुरशीनाशक ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात घेवून या द्रावणात बेणे १५ ते २० मिनिटे बुडवावे. हे द्रावण १५० ते २०० किलो बेण्यास पुरते. या प्रमाणे बेणे प्रक्रिया करूनच बेणे साठवावे. पीक फेरपालट केल्यानेही रोग कमी येतो.हळद पिकातील कंदमाशी: कंदमाशीच्या आळ्या जमिनीतील हळदीच्या कंदात शिरून ते नासवतात. साधारणपणे पहिल्या अवस्थेतील लहान अळ्या ज्या ठिकाणी आभासमय खोड कंदास चिकटलेले असते अशा कोवळ्या भागातून हळदीच्या कंदात शिरतात. अशा कंदास नंतर फ्युजॅरियम, पिथियमसारखे बुरशीजन्य रोग तसेच मेलाडोगायनी,
हेलीकॉटीलेकस इ. सुत्रकृमींचा शिरकाव होतो व त्यामुळे कंद मऊ पडतात. कंदाना पाणी सुटून ते कुजतात. पाने पिवळी पडतात व शेवटी पूर्ण झाड वाळून जाते. शेतात ज्या ठिकाणी कंदमाशीने अंडी घातली असतील अशाच वाफ्यांमध्ये साधारणपणे ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात ठिकठिकाणी प्रादुर्भावग्रस्त झालेली झाडे दिसून येतात. कंद कुजण्याचे प्रमाण पाण्याचा निचरा न होणा-या मध्यम ते भारी जमिनीत जास्त दिसून येतो. याचे मुख्य कारण म्हणजे या जीवाणूंची वाढ अशा ठिकाणी व या वातावरणात झपाट्याने होत असते. एका कुजक्या कंदात ५० पेक्षाही जास्त कंदमाशीच्या अळ्या आढळून येतात.ह्या कीडीच्या नियंत्रणासाठी निरोगी व अत्यंत शुद्ध कंदाचाच वापर लागवडीसाठी करावा. ज्या शेतातील हळदीचे बेणे वापरावयाचे असेल त्या शेतातील पीक पक्व होण्या अगोदरच रोगमुक्त असल्याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. रोगट झाडांची पाने कंद पक्व होण्या आधी पिवळी पडतात किंवा वाळतात. म्हणून शक्यतो संशोधन केंद्रावरील बेणे वापरावे. तेथे शक्यतो निरोगी बेणे मिळते. बेणे म्हणून कीडलेल्या कंदाचा लागवडीसाठी उपयोग करू नये व त्याचा लागवडीपूर्वी नाश करावा.कदमाशी व कंदकुजव्या रोग हळद पीकात होवू नये म्हणून बेण्याला कीटकनाशकाची प्रक्रिया करावी.
परंपरागत पद्धतीत शेतकरी शेणकाल्याच्या द्रावणात कंद बुडवून लावतात. त्यात ६% पारायुक्त औषध व कोणतेही एक कीटकनाशक पाण्यात मिसळून त्यात बेणे १० ते ३० मिनिटे बेणे बुडवून ठेवतात व नंतर सावलीत सुकवून लागवड करतात. काही शेतकरी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डॅझीम व २५० मिली मोनोक्रोटोफॉस टाकून द्रावण तयार करतात व त्यात ५ मिनिटे बेणे बुडवून बेण्याची लागवड करतात. कंदमाळीच्या आळ्या कंदामध्ये छिद्राकडून आत असतील तर बेणे प्रक्रियेमुळे कीटकनाशकाचे द्रावण छिद्रातून कंदाचे आत जाते व आतील अळी किंवा कोष मरतात. या प्रक्रियेनंतर बेणे सुकवून त्याला ट्रायकोडर्मा लावून ठेवल्यास कंद सडण्याची क्रिया करणा-या बुरशीचाही बंदोबस्त होतो.अनेक कीडी, पतंग व कंदमाशी इ. चा एक नैसर्गिक स्वभाव आहे. रात्री ते पेटत्या दिव्यांकडे किंवा प्रकाशाकडे आकर्षित होतात व धाव घेवून त्यात उडी घेतात व मरतात. म्हणून त्यांच्या या गुणाचा उपयोग हळद पीकातील कंदमाशी मारण्यासाठी करता येतो. त्यासाठी एक पसरट भांड्यात पाणी घेवून त्यावर बल्ब लावून ठेवतात. ह्या प्रकाश सापळ्यात रात्री पिकांतील कीडी, कंदमाशा बल्बावर उड्या घेतात व पसरट भांड्यातील द्रावणात पडून मरतात.
रासायनिक पद्धतींमध्ये कार्बारील ४% किंवा क्विनॉलफॉस १०% किंवा फोरेट १०% एकरी १० किलो झाडांच्या बुंध्याजवळ टाकल्यास कंदमाशी कीडीचा प्रादुर्भव आढळून येत नाही. ही कीटकनाशके लागवडीनंतर दीड महिन्यांनंतर तीन वेळा प्रत्येक महिन्याचे अंतराने खोडाभोवती जमिनीत मातीत मिसळून देणे अत्यंत आवश्यक आहे. (जुलै, ऑगष्ट व सप्टेंबरचा पहिला आठवडा) ऑक्टोबर नंतर कंदमाशीचा प्रादुर्भाव आढळत नसल्यामुळे त्यानंतर कीटकनाशकांचा वापर करण्याची गरज नाही.इतर उपायांमध्ये पावसाळ्यात जुलै-ऑगष्ट ते ऑक्टोबर या काळात शेतातील निचरा न झालेले जास्तीचे पाणी निचरा करून लवकरात लवकर काढून द्यावे म्हणजे रोगाची वाढ करणा-या जंतूंची वाढ होणार नाही. मर आलेली हळदीची झाडे सुरूवातीलाच कंदासहीत लगेच काढून घ्यावीत व जाळून टाकावीत. त्यामुळे रोगाचा प्रसार होणार नाही. पीक काढल्यानंतर कुजलेले कंद शेतात फेकून देवू नयेत. ते जमा करून जाळावेत, तसेच शेताची नांगरणी व वखरणी करून जमीन तापू द्यावी. आंतरमशागत, खुरपणी, निंदणी इ. कामे करतेवेळी झाडांना व कंदाना दुखापत किंवा इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क
संतोष पवार, नृसिंह कृषी सुविधा केंद्र परभणी,
९५४५३८२२७७
Published on: 07 June 2022, 02:25 IST