त्यात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण विशेषतः कोलेस्टेरॉलचे प्रमाण तुलनेने खूपच कमी असते, म्हणून टर्की पक्ष्यांच्या मांसाला लीन मीट म्हणूनही संबोधले जाते. व्यावसायिक टर्कीपालनासाठी ब्रॉड ब्रेस्टेड ब्रॉंझ, ब्रॉड ब्रेस्टेड व्हाइट आणि बेल्ट्सव्हील स्मॉल व्हाइट या जाती उपलब्ध आहेत. यांपैकी भारतातील हवामानाच्या दृष्टीने ब्रॉड ब्रेस्टेड व्हाइट आणि बेल्ट्सहील स्मॉल व्हाइट प्रजाती या जास्त उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.
एक दिवसाच्या टर्कीच्या पिल्लांची एक ते सहा आठवड्यांपर्यंत ब्रुडिंगची व्यवस्था करावी लागते. त्याकरिता गादी पद्धतीचा अवलंब करावा.कोंबड्यांप्रमाणेच गादी पद्धतीचे घर बांधून पहिल्या चार आठवड्यांपर्यंत प्रतिपक्षी दीड चौ.फू. एवढ्या जागेत दोन इंचांचे गादीमाध्यम पसरून घ्यावे.
त्याच्यासभोवती एक फूट उंचीचे कुंपण तयार करावे, की ज्यामुळे छोटी पिल्ले इतस्ततः फिरणार नाहीत. पहिल्या चार आठवड्यांपर्यंत टर्कीच्या पिल्लांना कृत्रिम उष्णता देण्याची गरज असते. त्यासाठी ब्रुडर अथवा बल्ब आदीचा उपयोग करावा लागतो.
टर्की पक्षी हे आकाराने मोठे असल्यामुळे, त्यांना लागणाऱ्या जागेची गरजही कोंबड्यांच्या तुलनेने जास्त असते. खुराडे व कुंपण पद्धतीची घरे या प्रकारामध्ये मोकळ्या जागेभोवती कुंपण घालून पक्ष्यांना सांभाळले जाते. रात्रीच्या वेळी पक्ष्यांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांना एक छोटे घर किंवा खुराडे बांधून दिले जाते. दिवसभर पक्षी मोकळ्या जागेत फिरत असल्यामुळे या भागात सावलीसाठी काही झाडे लावणे फायद्याचे ठरते. रात्रीच्या निवाऱ्यासाठी आवश्यक असणाऱ्या घरांसाठी मात्र प्रत्येक पक्ष्यासाठी तीन ते चार चौ.फू. एवढी जागा ठेवणे आवश्यक असते. या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे घरबांधणीचा खर्च अतिशय कमी होतो.
याशिवाय टर्की ज्या जागेत मोकळे फिरणार आहेत, तिथे जर लुर्सन गवतासारख्या पिकांची लागवड केली, तर हे हिरवे गवत पक्ष्यांना खाण्यासाठी वापरता येते. अशा पद्धतीने नीट वाढ झालेल्या हिरवळीवर टर्की पक्षी चक्राकार पद्धतीने वाढविल्यास पक्ष्यांच्या खाद्यावरील खर्चही जवळ जवळ निम्म्याने कमी होतो.
टर्की पक्षी वयाच्या 24 ते 30 आठवड्यांमध्ये विक्रीयोग्य वजनाचे होतात. या वयात नर पक्षी साधारणतः दहा ते बारा किलो व मादी पाच ते सहा किलो वजनाचे भरतात. टर्की पक्षी हे मुख्यत्वे मांसासाठी विकले जात असल्यामुळे,
त्यांनी जास्तीत जास्त वजन कमीत कमी वयात कमविणे फायद्याचे ठरते.
टर्की पक्ष्यांना नाताळ, नववर्ष व "थॅंक्स गिव्हिंग' या ख्रिश्चन बांधवांच्या सणांना खूपच जास्त मागणी असते.
संकलन - राम कवले & तुषार शिरगीरे
Published on: 30 September 2021, 08:30 IST