भीमा रेड (लाल), भीमा राज (गडद लाल), भीमा शक्ती (लाल) आणि भीमा शुभ्र (पांढरा) या जाती कांदा व लसूण संशोधन संचालनालयातर्फे प्रसारित. फुले समर्थ (गडद लाल) आणि बसवंत ७८० (लाल) या जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे प्रसारित. अॅग्रीफाउंड व्हाईट (पांढरा) ही जात राष्ट्रीय उद्यानविद्या संशोधन व विकास प्रतिष्ठातर्फे प्रसारित. जानेवारी ते मार्च या काळात उशिरा खरिपातील म्हणजेच रांगडा कांदा बाजारात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो. रांगडा कांदा लागवडीपासून कमी वेळात अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळते. रांगडा कांद्याची उत्पादकता (३५ ते ४० टन/हे.) ही खरिपातील उत्पादकतेपेक्षा (८ ते १० टन/हे.) पेक्षा जास्त आहे.
बियाणे:-
प्रतिहेक्टरी दहा किलो बियाणे लागते. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी नसावी. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाणास थायरम किंवा कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
रोपे निर्मिती
रोपवाटिकेत गादीवाफ्यावर बियाणे हे साधारणतः अर्धा ते एक सेंटिमीटर खोलीवर पेरावे. मातीमिश्रित बारीक शेणखत किंवा गांडूळ खताने झाकून त्यावर हलकेसे पाणी द्यावे. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी गादीवाफ्यात शेणखत मिसळावे. तसेच, प्रतिचौरस मिटर क्षेत्राला दोन ग्रॅम नत्र, १ ग्रॅम स्फुरद आणि १ ग्रॅम पालाश ही खत मात्रा द्यावी.
- एक हेक्टर कांदा लागवडीसाठी सुमारे पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी होती. रोपवाटिकेची जागा सूर्यप्रकाशाची व विहिरीजवळ असावी. लव्हाळा किंवा हरळीसारखी गवते त्यात नसावीत.
- रोपवाटिकेच्या जागेत लोखंडी नांगराने खोल नांगरणी करावी. नंतर दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे बनविण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे आणि दगड गोटे काढून टाकावेत. तणाची शक्यता असल्यास किंवा शेणखतातून तण होण्याची शक्यता असल्यास वाफे बी पेरण्यापूर्वी भिजवून, त्यातील तण उगवून आल्यानंतर खुरपणी करून घ्यावी. त्यावर कांद्याचे बी पेरावे.
गादी वाफ्यावर रोप तयार करण्याचे फायदे ः
- रोपांची वाढ एकसारखी होते.
- मुळांच्या भोवती पाणी साचून राहत नसल्याने रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही.
- लागवडीसाठी रोपे सहज उपटून काढता येतात.
- रोपांच्या गाठी जाड आणि लवकर तयार होतात.
गादी वाफ्यावर पेरणी ः
- रोपवाटिकेसाठी गादी वाफे एक मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब करावेत. वाफ्याची उंची १५ सें.मी. ठेवावी. गादी वाफे नेहमी जमिनीच्या उताराला आडवे करावेत. पेरणीपूर्वी ५०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत १.२५ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी टाकून जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळावे. रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघ पाडाव्यात. त्यात बी पातळ पेरून मातीने किंवा कुजलेल्या शेणखत, कंपोस्ट खताने झाकून टाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे.
- दोन ओळीत अंतर राखल्यामुळे खुरपणी किंवा माती हलवणे ही कामे सुलभ होतात.
- पुनर्लागवडीवेळी रोपे वाफ्यामधून सहज उपटून काढता येतात.
बी फोकून रोपे करण्यातील तोटे ः
- यात दोन ओळी आणि रोपे यामध्ये समान अंतर राखता येत नाही.
- बी काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी एकदम पातळ पडते.
- खुरप्याने हलवले तरी अपेक्षित खोलीपर्यंत जात नाही. परिणामी दिलेल्या पाण्यासोबत वाहून ते वाफ्याच्या बाजूला जमा होते व रुजते. तिथे रोपांची दाटी होते.
- दाटीमुळे रोपे नुसतीच उंच वाढतात, पिवळी पडतात आणि गाठ धरण्यास उशीर होतो. खुरपणी किंवा विरळणी ही कामे करणे अवघड होते. लागवडीलायक रोपे कमी मिळतात.
- केवळ रेघा पाडायचा कंटाळा केल्यामुळे रोपांचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत रोपांचे नुकसान होऊ शकते.
- गादी वाफे करता न आले तरी सपाट वाफ्यामध्ये रेघा पाडून पेरणी करावी.
रोपे प्रक्रिया:-
रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान (२ मि.लि. प्रतिलिटर पाणी) आणि कार्बेन्डाझिम (१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या द्रावणात दोन तास बुडवून ठेवल्याने फुलकिडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. रूंद सरी वरंबा पद्धत ही कांदा लागवडीसाठी सपाट जमिनीपेक्षा पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने योग्य ठरते. लागवडीसाठी १२० सें.मी. रुंदीचा गादीवाफा करावा. गादीवाफ्यावर १० सें.मी. बाय१० सें.मी. अंतराने लागवड करावी.
खत व्यवस्थापन
हेक्टरी ८ ते १० टन कुजलेले शेणखत किंवा ४ ते ५ टन गांडूळ खत मिसळावे.
रासायनिक खताची मात्रा - १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश आणि ३० किलो सल्फर प्रतिहेक्टरी द्यावे. नत्राची मात्रा तीनवेळा विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीच्या वेळी (५० किलो/हे.), दुसरी मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी (५० किलो/हे.) व तिसरी मात्रा लागवडीनंतर ४५ दिवसांनी (५० किलो/हे.) द्यावी.
ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. विद्राव्य खतमात्रासुद्धा पीकवाढीसाठी फायदेशीर ठरते. लागवडीनंतरच्या नत्राच्या २/३ मात्रा ही आपण रोप स्थलांतरानंतर ६० दिवसापर्यंत आठवड्याच्या अंतराने देऊ शकतो.
पाणी व्यवस्थापनः
१) पाटाने पाणी देताना
- बी पेरल्यानंतर शक्यतो पहिले पाणी झारीने द्यावे.
- वाफ्यांचे प्रमाण जास्त असल्यास, झारीने पाणी देणे जिकिरीचे असल्यास पाटाने पाणी द्यावे. मात्र, पाण्याचा प्रवाह वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवून कमी करावा.
- पहिल्या पाण्यानंतर रोप उगवत असताना लगेच हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण सुलभ होते.
- त्यानंतर पाणी बेताने आणि हवामानानुसार ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे.
२) ठिबक सिंचन - पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. प्रत्येक वाफ्यामध्ये ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणाऱ्या १६ मिमी व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सेंमी असावे. त्यांची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी.
३) तुषार सिंचन -
- पद्धतीसाठी दोन लॅटरलमध्ये ६ मीटर इतके अंतर ठेवून, ताशी १३५ लिटर पाणी फेकण्याची क्षमता असलेले नोझल वापरावेत.
- बियाण्यास कोंब येईपर्यंत मातीच्या वरच्या थरात ओलावा राहील याची खबरदारी बाळगावी. रोपवाटिकेतील वाफ्यांमध्ये बियाण्यास कोंब येईपर्यंत सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावे. पुनर्लागणीच्या अगोदर पाणी कमी- मी करावे, दोन पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढवावे, त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे उपटण्यापूर्वी २४ तास अगोदर पाणी द्यावे. त्यामुळे रोप काढणे सोपे होते.
- गवत असल्यास खुरपणी करावी. तसेच रोपांच्या ओळींमधील माती हलवून घ्यावी, म्हणजे रोपांच्या मुळांभोवती हवा खेळती राहील.
तणनियंत्रण
- कांद्यासोबतच तणही उगवते. वाफ्यात शेणखताचा वापर केला असल्यास तणांचे प्रमाण जास्त आढळते. निंदणी करणे अवघड व खर्चिक होते. अशा वेळी शेतकरी रोपांवर तणनाशकाचा वापर करतात. त्यामुळे तण कमी होते, जळते, पण त्याच बरोबर रोपांचे शेंडेसुद्धा जळतात.
- बी पेरणीनंतर वाफ्यावर पेंडीमिथॅलिन २ मिलि प्रति १ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तणनाशक मारल्यानंतर लगेच पाणी देण्याची काळजी घ्यावी. तणनाशकाच्या वापरामुळे तणाचे बी रुजत नाही, मात्र कांद्याचे बी चांगले उगवून येते. लव्हाळा किंवा हरळी नियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिनचा काहीही उपयोग होत नाही.
- पेरणीनंतर २० दिवसांनी एकदा हाताने खुरपणी करण्याची शिफारस केली आहे.
रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण ः
फूलकिडे - फवारणी प्रति लिटर पाणी
फिफ्रोनिल १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा कार्बोसल्फान २ मिलि
मर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांसाठी -
मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात रोपांच्या ओळीत द्रावण ओतावे.
- करपा रोग -पानांवर फवारणी प्रति लिटर
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम.
फवारणीवेळी ०.५ मिलि प्रति लिटर या दराने चिकट द्रव्य वापरावे.
गजानन तुपकर
विषय विशेषज्ञ(उद्यानविद्या)
कृषि विज्ञान केंद्र, अकोला
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 06 September 2021, 08:53 IST