Agripedia

भारतात नागली पिकाखाली ११.१० लाख हेक्टर इतके क्षेत्र लागवडीखाली असून त्यापासून १५.९० लाख टन उत्पादन मिळते. भारताच्या एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक (६५.९३ टक्के) वाटा हा कर्नाटक राज्याचा आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आणि उत्तराखंड राज्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशाची एकूण उत्पादकता हेक्टरी १४३२ किलो इतकी आहे. महाराष्ट्रात नागली पिकाखाली १.१२ लाख हेक्टर क्षेत्र असून एकूण उत्पादन १.१९ लाख टन आहे. राज्याची उत्पादकता ही सरासरी १०६७ किलो प्रति हेक्टरी आहे.

Updated on 16 June, 2020 8:02 AM IST


भारतात नागली पिकाखाली ११.१० लाख हेक्टर इतके क्षेत्र लागवडीखाली असून त्यापासून १५.९० लाख टन उत्पादन मिळते. भारताच्या एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक (६५.९३ टक्के) वाटा हा कर्नाटक राज्याचा आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आणि उत्तराखंड राज्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशाची एकूण उत्पादकता हेक्टरी १,४३२ किलो इतकी आहे. महाराष्ट्रात नागली पिकाखाली १.१२ लाख हेक्टर क्षेत्र असून एकूण उत्पादन १.१९ लाख टन आहे. राज्याची उत्पादकता ही सरासरी १,०६७ किलो प्रति हेक्टरी आहे.

महाराष्ट्रात हे पीक प्रामुख्याने कोकण, कोल्हापूर आणि नाशिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या तीन विभागात प्रामुख्याने रायगड, ठाणे सिंधुदुर्ग तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो. एकूण क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील नागली नागली पिकाचे क्षेत्र (२५,८०० हे.) सर्वात जास्त आहे. तसेच उत्पादन आणि उत्पादकता यांचा विचार केला असता कोल्हापूर जिल्ह्याची उत्पादकता ही १,४६२ किलो प्रति हेक्टर आहे. नाशिक जिल्ह्याची उत्पादकता ही ६६७ किलो प्रति हेक्टर इतकी आहे.

हवामान व जमीन:

नागली हे पीक उष्ण कटिबंधीय प्रकारातील असून १२ ते २८ अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य आहे. १६ ते २१ अंश सेल्सिअस या तापमानात बी उगवण लवकर होते व लोंब्या तयार होण्याच्या काळात १९ ते २५ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच ५० ते १०० से. मी. पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी चांगले पीक येते.

नागली पीक काळया, रेताड लाल जमिनीत तसेच हलक्या व डोंगर उताराच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येते. या पिकासाठी हलक्या ते मध्यम प्रतीची अधिक सेंद्रिय पदार्थ असणारी व ५.५ ते ८.५ सामू असणारी योग्य निचरायुक्त सुपीक जमीन नागली पिकास योग्य असते. नागली हे पीक सर्व राज्यात विशेष करून खरिप हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात या पिकाची पेरणी जून ते जुलै महिन्यात केली जाते. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी ते फेब्रवारी मध्ये पेरणी केली जाते.

पूर्व मशागत:

नागली पिकाची लागवड करण्यापूर्वी उन्हाळी हंगामात रोप लावणीच्या ३ आठवडे अगोदर लाकडी नांगर, लोखंडी नांगर किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने कोरड्या शेत जमिनीची उभी आडवी नांगरट करावी. जमिनीच्या उतरानुसार ठराविक अंतरावर समपातळी बांध अथवा समतल चर काढावेत. लाकडी फळी फिरवून ढेकळे फोडून घ्यावे. व कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. उपलब्धतेनुसार एकरी २ ते २.५ टन शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर जमिनीत मिसळावे. जमीन भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीतील धसकटे, पालापाचोळा गोळा करून जाळून टाकावा जेणे करून खोडकिडीचा बंदोबस्त करता येतो.

सुधारित वाण:

वाणाचे नाव

कालावधी (दिवस)

उत्पादन (क्विं./हे)

विशेष गुणधर्म

हळवे वाण

व्ही. आर ७०८

९० ते १००

१२ ते १५

हलक्या जमिनीस योग्य

व्ही. एल १४९

९० ते १००

१५ ते २०

करपा रोग प्रतिकारक्षम

पी. . एस. ४००

९८ ते १०२

१८ ते २०

करपा रोग प्रतिकारक्षम

निमगरवे वाण

दापोली १

१०० ते ११०

२० ते २५

मध्यम खोल जमिनीस योग्य

दापोली सफेद

११० ते १२०

१५ ते २०

महाराष्ट्रासाठी प्रसारित

एच. आर. ३७४

११० ते १२०

१५ ते २०

करपा रोग प्रतिकारक्षम

गरवे वाण

पी. . एस. ११०

११५ ते १२५

२० ते २५

जास्त पाऊस क्षेत्रास योग्य

पी. आर. २०२

१२० ते १३०

२० ते २५

जास्त पाऊस क्षेत्रास योग्य

फुले नाचणी

११५ ते १२०

२५ ते ३०

लोह प्रणाम अधिक, करपा रोगास प्रतिकारक्षम


लागवड
पद्धत:

नागली पिकाची लागवड बी पेरणी, टोकण किंवा रोप लागवड पद्धतीने केली जाते. अती उताराच्या जमिनीत व जास्त पावसाच्या प्रदेशात नागली पिकाची लागवड पेरणी किंवा टोकण पद्धतीपेक्षा रोपलागण पद्धत फायदेशीर आहे. पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. तर दोन रोपांमधील अंतर १० सें.मी. राहील याची दक्षता घ्यावी. पेरणी पद्धतीने लागवड करण्यासाठीं एकरी ४ किलो बियाणे लागते. पेरा दाट होऊ नये या करिता बियाणे वाळू किंवा मातीत मिसळून पेरणी किंवा टोकण करावी. पेरणी करतांना बी जास्त खोल (३ ते ४ सें.मी.पेक्षा जास्त) जाणार नाही याची दक्षता बाळगावी.

पुनर्लागवड पद्धतीने पेरणी केल्यास १ ते १.५ किलो प्रति एकर बियाणे वापरावे. सुरुवातीला बियाणे पेरणीसाठी जमिनीच्या उतारानुसार गादी वाफे तयार करावेत. बियाणे जूनच्या मध्यावर गादीवाफ्यावर सरळ रेषेत पेरावे. गादीवाफ्यावर बियाणे ७ ते ८ सें.मी. अंतराच्या ओळीने आणि १ ते २ सें.मी. खोल पेरून मातीने झाकून द्यावे. बियाणे पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी ५०० ग्रॅम युरीया  प्रती गुंठा या प्रमाणे खताचा हप्ता द्यावा. एक एकर क्षेत्र लागवडीसाठी २ ते २.५ गुंठ्याची रोपवाटिका तयार करावी. रोपांच्या पुनर्लावणीसाठी हळव्या जातीमध्ये २० ते २१ दिवसांची, गरव्या व नीमगरव्या जातींमध्ये २५ ते ३० दिवसांची रोप निवडावीत. सर्वसाधारण बियांपासून रोपे तयार करून नंतर त्यांची पुनर्लावणी करतांना दोन ओळींतील अंतर २२.५ सें.मी. आणि दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून प्रत्येक ठिकाणी दोन रोपे लावावीत. नागलीची रोपे ओळीत अंगठ्याच्या साहाय्याने दाबून लावली म्हणजे झाडांची वाढ समान होते व आंतरमशागत करण्यासाठी सोपे  जाते.

बीजप्रक्रिया:

बियाणे पेरणीपूर्वी बुरशीजन्य रोगांपासून बचाव होण्यासाठी प्रती किलो बियाण्यास ३ ते ४ ग्रॅम थायरम चोळावे तसेच २५ ग्रॅम अझोस्पिरीलम ब्रासिलेंस व २५ ग्रॅम अस्पर्जिलस अवामोरी या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

पाणी व्यवस्थापन:

नागलिची रोपे २५ ते ३० दिवसांची तयार होण्याच्या कालावधीत असताना रोपांना गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे. लागवड केलेली रोपे मुळे धरेपर्यंत पाणी मिळणे आवश्यक असते. त्यानंतर नागलीच्या दाण्याची चि्क किंवा दुधाळ दाणा अवस्थेपर्यंत आणि लोंब्या आल्यानंतर ८ ते १० दिवसापर्यंत नागलीच्या पिकास गरजेप्रमाणे पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन:

नागली या पिकास सर्वसाधारणपणे एकरी २ टन शेणखतासोबत २४ किलो नत्र, १२ किलो स्पुरद आणि १२ किलो पालाश या अन्नद्रव्याची शिफारस करण्यात आली आहे. खत व्यवस्थापन करत असताना १२ किलो नत्र, संपूर्ण स्पूरद व पालाश पुनर्लागवडीच्या वेळीं द्यावा आणि उरलेला १२ कीलों नत्र पुनर्लागवडीनंतर एक महिन्यांनी द्यावा.

पीक संरक्षण:

नागली या पिकावर मावा, लष्करी अळी, पाने खाणारी अळी, लोंबितील दने खाणारी अळी व खोडकीडा इत्यादी किडी दिसून येतात. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास डायमिथोयेट ३० इ.सी.१९ मी.ली. अथवा मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. लष्करी अळी किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी  शेतातील व बांधावरील गवत कापून टाकावे. या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास सायपरमेथरिन किंवा फिनवलरेट २० इ. सी ४ मी.ली. प्रती १० लीटर पाण्यातून फवारावे.

नागली पिकावर मुख्यत्वे पानावरील करपा, मानेवरील करपा आणि कणसा वरील करपा हे रोग येतात पानावरील करप्या मुळे पान जळल्या सारखे दिसते. तसेच मानेवरिल करपा हा रोग बुरशीमुळे दाणे भरण्याच्या वेळी कणासाच्या मानेवर येतो. त्यामुळे दाने न भरता कणीस वांझ राहते व मानेतून मोडून पडते. कणसा वरील करपा कणसाच्या टोकापासून ते खालपर्यंत जाऊन संपूर्ण कणीस काळे होते. या सर्व करप्यांच्या नियंत्रणासाठी करपा प्रतिबंधक वाणांचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ते ४ ग्रॅम थायरम बीजप्रक्रिया करावी. प्रादुर्भाव दिसून येताच डायथेन एम.४५ या बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लेखक:
कु. पूजा अनिल मुळे
(वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा)
श्री. सागर छगन पाटील
(पी. एच डी. स्कॉलर, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
श्री. शरद केशव आटोळे
(सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, दोंडाईचा)
7744089250

English Summary: Ragi Finger Millet Cultivation through Improved Method
Published on: 16 June 2020, 07:21 IST