शेतकरी बंधुनो, रब्बी हंगाम अगदी उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. त्या दृष्टीने कोणती पिके घ्यावीत? त्यासाठी जमिन कशी असावी? पेरणीचे केव्हा? कशाप्रकारे? किती अंतरावर करावी? पेरणीकरिता बियाणे किती आणि कोणते वापरावे? बीजप्रक्रिया कशी करावी? या पिकांचे खत व्यवस्थापन व्यवस्थापन कसे करावे? आंतरमशागत, केव्हा कशाप्रकारे करावी? पाणी व्यवस्थापन/पाण्याचे नियोजन कसे करावे? असे एक ना अनेक प्रश्नाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
शेतकरी बंधुनो आपल्या राज्यांत प्रामुख्याने रब्बी हंगामात हरभरा, गहू, कांदा, ज्वारी आणि सूर्यफुल या पिकांची मोठया प्रमाणात लागवड/पेरणी होते. सर्वसाधारणपणे सप्टेबर ते फेब्रुवारी हा रब्बी हंगामाचा कालवधी समजला जातो. त्या अनुषंगाने या महत्वाच्या पिकांविषयी.
राज्यातील रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची उत्पादकता फारच कमी आहे याची प्रमुख कारणे
१.बहुतेक रबी पिकांची लागवड ही कोरडवाहू क्षेत्रात केली जाते.
२.वेळेवर पेरणी न करणे
३.सुधारीत वाणांचा वापर न करणे
४.पीक अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन न करणे.
५.पीक सरंक्षणाचा अभाव.
६.मशागत तंत्राचा अभाव.
७.पिकांची फेरपालट न करणे
८. सेंद्रिय आणि जैविक खत वापराचा अभाव
९.रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर न करणे.
१०. नियोजनाचा अभाव
हेही वाचा : वनस्पतींसाठी आवश्यक असतात पोषक तत्व
या विविध कारणांमुळे जवळजवळ ४० ते ८० टक्के उत्पादनात घट झालेली दिसून येते
हरभरा:
-
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी, काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.
-
हलक्या अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये.
-
कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत करावी.
-
बागायती हरभऱ्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत करावी.
-
उशिरात उशिरा १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करावी.
-
देशी वाणाच्या पेरणीसाठी ३० X १० से.मी. तर
-
काबुली वाणासाठी ४५ X १० से.मी. अंतरावर पेरणी करावी.
-
बियाणाच्या आकारमानानुसार जातीपरत्वे ७० ते १०० किलो आणि
-
काबुली वाणा साठी १२५ किलो बियाणे वापरावे.
-
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.
वाण
-
देशी हरभरा – विजय, विशाल, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण जिरायत-बागायत तसेच व उशिरा पेरणीसाठी योग्य
-
काबुली वाण- विराट, कृपा, पीकेंव्ही -२, पीकेंव्ही -४ या वाणाची पेरणी करावी
-
बियाणाच्या आकारमानानुसार जातीपरत्वे ७० ते १०० किलो आणि काबुली वाणा साठी १२५ किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम कार्बाडेण्झीमची बीजप्रक्रिया करावी त्यानंतर
१ किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम व २५ ग्रॅम पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जीवाणू) या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करताना गुळाचं थंड द्रावणाचा (१०० ग्रॅम गुळ/लिटर पाणी) आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा.बियाणे सावलीत सुकवावे आणि पेरणी करावी.
खत व्यवस्थापन
-
खरिपात जमिनीस शेणखत दिले नसल्यास हेक्टरी ५ टन शेणखत पेरणीपूर्वी दयावे.
-
हरभऱ्याच्या पिकास पेरणी करतांना २५ किलो नत्र, ५० किलो स्फूरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टरी दयावे. किंवा
-
हेक्टरी १२५ किलो डीएपी आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे.खत विस्कटून देऊ नये.
-
पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये असताना किंवा या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास २ % युरियाची किंवा २% डीएपी फवारणी करावी.
-
पेरणीनंतर ३० व ४५ दिवसांनी १% पोटॅशियम नायट्रेट व २% डी ए पी ची स्वतंत्ररित्या फवारणी करावी.
गहू :
-
गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिन निवडावी.मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल.शक्यतो हलक्या जमिनीत गव्हू घेण्याचे टाळावे.
-
गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमिन भुसभुशीत असणे जरुरीचे असते.कारण अशा जमिनीमध्ये गव्हाच्या मुळांची वाढ, विस्तार व कार्यक्षमता वाढून जमिनीतील अन्नद्रव्यांचे,पाण्याचे व्यवस्थित शोषण होते.
पेरणी.
- जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. जिरायत गव्हाच्या पेरणीसाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे जिरायत पेरणीसाठी २० से.मी अंतर ठेवावे
- बागायती गव्हाची(वेळेवर) पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. बागायत गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे बागायत वेळेवर पेरणीसाठी २० से.मी अंतर ठेवावे.
- बागायत गव्हाची उशिरा पेरणी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत करावी.उशिरा पेरणीसाठी १८ से.मी. अंतरावर पेरणी करावी.उशिरा पेरणीसाठी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया :
पेरणी पूर्वी बियाण्यास थायरम (७५% WS) ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर १ किलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅकटर व २५ ग्रॅम पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जीवाणू) यांची बीजप्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करताना गुळाच्या थंड द्रावणाचा (१०० ग्रम गुळ/लिटर पाणी) आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे पेरणीपूर्वी काही वेळ सावलीत वाळवावे.
वाण :
-
पाण्याची उपलब्धता कमी असल्यास NIAW-1415(नेत्रावती),HD-2987 (पुसा बहार) या वाणांची निवड करावी.
-
बागायती वेळेवर पेरणीकरिता NIAW-301(त्र्यंबक),NIAW-917(तपोवन), एमएसीएस ६२२२, NIDW-295 (गोदावरी), NIAW-1994 (फुले समाधान) हे वाण वापरावेत.
-
बागायती वेळेवर व उशिरा पेरणीसाठी फुले समाधान हा वाण वापरावा.
-
उशिरा पेरणीसाठी NIDW-34 (निफाड ३४),AKAW4627, NIAW-1994 (फुले समाधान) हा वाण वापरावा
-
पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा वापर केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल.
खत व्यवस्थापन:
-
बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दयावे
-
बागायत गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी १२० किलो नत्र,६० किलो स्फूरद व ४० किलो पालाश दयावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश पेरणीच्या वेळेस व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे.
-
उशिरा पेरणीसाठी ९० किलो नत्र, ६० किलो स्फूरद व ४० किलो पालाश दयावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश पेरणीच्या वेळेस व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे.
-
जमिनीमध्ये लोहाची अथवा झिंक ची कमतरता असल्यास २० किलो फेरस सल्फेट /झिंक सल्फेट ची मात्रा शेणखतातून द्यावी.( १०० किलो खतात १५ दिवस मुरवून)
-
गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्याची मात्र देऊन २%, १९:१९:१९ नत्र: स्फुरद :पालाश या विद्राव्य खतांची किंवा २% डीएपी या खताची पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसानंतर फवारणी करावी .
-
विद्राव्य खत फवारणीसाठी २% द्रावणकरीता २०० ग्रॅम १९:१९:१९ किंवा डीएपी खते १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
-
तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे.तसेच फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा.पॉवर स्प्रे वापरू नये.
कांदा:
-
लागवडीची वेळ – १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर
-
उशिरात उशिरा (उन्हाळी कांदा)- डिसेंबर अखेरपर्यंत १५ जानेवारी पर्यंत
-
लागवडीचे अंतर -१५ X १० से.मी. (सपाट वाफे/ सरी वरंबा/रुंद सरी वरंबा )
-
हेक्टरी बियाणाचे प्रमाण- ८ ते १० किलो
-
१० लिटर पाण्यात २० मी.ली कार्बोसल्फान व १० ग्रॅम कार्बोडेण्झीम मिसळून त्यात रोपांची मुळे दीड ते दोन तास बुडवून ठेवावी. त्यानंतर अॅझोस्पिरीलम च्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
वाण
-
N-2 4 1, भीमा किरण, भीमा श्वेता, अॅग्रीफाऊंड लाईट रेड, अर्क निकेतन, फुले सफेद,पुसा रेड
-
कांदा आंतर मशागत : १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करणे.लागवडीपासून १ महिन्याने खताच्या मात्रा द्याव्यात
-
कांद्याच्या अधिक उत्पादन व तण नियंत्रणासाठी oxyiflorifen 23.5 % EC 0.088 क्रियाशील घटक 7.5 ml व Quzolfof ethyl 5% 0.02 क्रियाशील घटक 10 ml या तण नाशकाची १० लिटर पाण्यात लागवडीनंतर २५ दिवसांनी फवारणी करून ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
खत व्यवस्थापन:
-
लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर २५ ते ३० टन शेणखत प्रति हेक्टरी दयावे.
-
गंधक -४५ किलो प्रति हेक्टरी १५ दिवस अगोदर शेणखतासोबत दयावे.
-
लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र ,५० किलो स्फूरद व ५० किलो पालाश दयावे
-
उर्वरित ५० किलो नत्र ,दोन समान हफ्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी दयावे.
-
सुर्यफुल :
-
पाण्याचा चागला निचर होणारी ,मध्यम ते भारी, आम्लयुक्त अमी पाणथळ जमिनीत लागवड करू नये
-
रब्बी – पेरणी ऑक्टोबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा
-
पेरणी अंतर – मध्यम ते खोल जमिनीत – ४५ x ३० से. मी.
भारी जमिनीत – ६० X ३० से.मी.
-
तसेच संकरित वाण आणि जास्त काल्वाधीच्या वाणांची लागवड -६० X ३० से.मी.
-
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी, म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते
-
बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये
-
बागायती पिकांची लागवड सरी वरंब्यावर टोकन पद्धतीने करावी.
-
पेरणीसाठी –सुधारित वाणाचे ८ ते १० किलो/हेक्टरी आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो /हेक्टरी
बीजप्रक्रिया
-
मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रॅम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रती किलो बियाण्यास चोळावे.
-
केवड रोग टाळण्यासाठी ६ ग्रॅम अॅप्रान ३५ एस डी. किलो बियाण्यास चोळावे.
-
तसेच विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमीडॅक्लोप्रीड़ ७० डब्लू ए गाऊचा ५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे.
-
त्यानंतर २५ ग्रम अझोटोबॅक्टर २५ ग्रम प्रती किलो बियाण्यास चोळावे.
वाण :
फुले भास्कर ,एस एस ५६,ई सी.६८४१४ ,भानू , संकरीत वाण- के बी एस एच -४४, फुले रविराज
रासायनिक खते :
-
कोरडवाहू: २.५ टन शेणखत प्रती हेक्टरी ,
५०:२५:२५ नत्र :स्फुरद: पालाश प्रती हेक्टरी
-
बागायती -६०:६० :६० नत्र :स्फुरद: पालाश प्रती हेक्टरी, यापैकी नत्राची अर्धी मात्र २५- ३० दिवसांनी,खुरपणी नंतर
-
गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रती हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी शेणखतातून द्यावे.
लेखक –
डॉ. आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ मो. ९४०४०३२३८९
एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प
डॉ.अंबादास मेहेत्रे ,कृषि विद्या वेत्ता
महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी
Published on: 03 December 2021, 07:20 IST