Agripedia

पिक उत्पादनामध्ये जैविक खतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण पी.एस.बी. या जिवाणू खता विषयी थोडी माहिती जाणून घेऊ या. (१) नेमकं पी.एस.बी. काय आहे? प्रयोगशाळेत कृत्रिमरीतीने स्फुरद विरघळणार्‍या जिवाणूची वाढ करून योग्य माध्यमात मिसळून तयार केल्या जाणाऱ्या खताला पी.एस.बी. म्हणजे स्फुरद विरघळणारे जिवाणूखत असे म्हणतात.

Updated on 21 September, 2021 3:15 PM IST

(२) नेमकं जमिनीत अद्राव्य स्पुरदाच विघटन करण्यासाठी कोणते सूक्ष्मजीव कार्य करतात?

जमिनीमधील स्फुरद विरघळवून  पिकांना मिळवून देण्यासाठी बॅसिलस मेघ्याथेरियम सारखे अनुजीव, ॲस्परजील्लस सारख्या बुरशी, स्ट्रेप्टोमायसीन सारख्या ॲक्टीनोमाइसिट्स व व्ही ए मायकोरायझा यासारखे व इतर काही सूक्ष्मजीव कार्य करत असतात.

 

(३) नेमके पी.एस.बी. या जिवाणू खताच्या वापरामुळे पीक उत्पादनामध्ये काय फायदा होतो?

शेतकरी बंधूभगिनींनो स्फुरद म्हणजे फॉस्परस हे महत्त्वाचे प्राथमिक अन्नद्रव्य म्हणून पिकाला आवश्‍यक असते व बहुतांश पिकात विविध खताच्या रूपात आपण ते पिकांना पुरवठा करत असतो परंतु डीएपी सिंगल सुपर फॉस्फेट किंवा इतर कोणत्याही मिश्रखतामध्ये किंवा संयुक्त खतातून दिलेला फॉस्फरस हा पूर्णपणे पिकाला मिळत नाही व जमिनीत त्याचे फिक्सेशन किंवा स्थिरीकरण होते किंवा झालेले असते. परंतु पी.एस.बी. या जिवाणू खताच्या वापरामुळे या खतातील मित्र सूक्ष्मजीव जमिनीत फिक्स झालेला स्फुरद  बऱ्याच प्रमाणात विरघळून पिकाला मिळवून देण्याचे कार्य करतात, त्यामुळे स्फुरदयुक्त खताच्या कार्यक्षमतेत वृद्धि होते व सहाजिकच पीक उत्पादनात सुद्धा वाढ होते.

 

(४) पी.एस.बी. हे जिवाणू खत कोणत्या पिकात वापरले  जाऊ शकते?

पी.एस.बी. या जिवाणू खताचा वापर सोयाबीन, तूर, उडीद, मुग, कपाशी, ज्वारी, हळद, हरभरा, गहू, मका याशिवाय शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध भाजीपाला पिके व फळपिके यामध्ये शास्त्रीय शिफारशीनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाऊ शकतो.

 

(५) पी.एस.बी. हे जिवाणू खत विविध पिकांमध्ये कोणकोणत्या पद्धतीने वापरता येते?

शेतकरी बंधुभगिनींनो पी.एस.बी. या जिवाणू खताचा वापर बीज प्रक्रियेद्वारे, शेणखतामध्ये एकत्र मिसळून जमिनीत किंवा योग्य प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध असणाऱ्या जमिनीत द्रवरूप पी.एस.बी. या जिवाणू खताचा वापर फळ भाजीपाला व हळदीसारख्या पिकात ठिबक सिंचनाद्वारे, तसेच रोपाच्या मुळावर अंतरक्षिकरण पद्धतीने गरजेनुसार शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जाऊ शकतो.

 

(६) सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, कापूस, मका या सारख्या महत्त्वाच्या पिकात पी.एस.बी. या जिवाणू खताचा वापर बीज प्रक्रियेद्वारे कसा करावा?

सोयाबीन व इतर वर निर्देशीत पिकात २५० (अडीचशे) ग्रॅम पी.एस.बी. प्रति १० (दहा) किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. द्रवरूप स्वरूपात पी.एस.बी. उपलब्ध असल्यास २५० मिली पी.एस.बी. प्रति ३० किलो सोयाबीन बियाण्यास म्हणजेच ८ ते १० मिली द्रवरूप पी.एस.बी. प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

बीज प्रक्रिया करताना ३० किलो सोयाबीन पातळ ताडपत्रीवर पसरून त्यावर २५० मिली पी.एस.बी. या द्रवरूप जिवाणू खताचा शिडकावा द्यावा आणि आवश्यक वाटल्यास थोड्याशा गुळाच्या पाण्याचा शिडकावा द्यावा.  सोयाबीन सारखे बियाणे ओलेचिंब करू नये, हाताने बियाणाला चोळू नये, सावलीत १५ ते २० मिनिटे वाळवावे व नंतर पेरावे. फार पूर्वी/वेळ बीजप्रक्रिया करून बियाणे ठेवू नये व बीज प्रक्रिया केल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणी करावी 

(७) पी.एस.बी. या जिवाणू खताचा वापर करताना घ्यावयाची काळजी?

(अ)  पी.एस.बी. किंवा इतर कोणतीही जिवाणूसंवर्धक घरी आल्यानंतर त्याचा वापर शक्य तितक्या लवकर करावा आणि घरी आणल्यानंतर जिवाणू संवर्धके थंड आणि कोरड्या जागी साठवावी.

(ब) पी.एस.बी. किंवा इतर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करताना रायझोबियम या जिवाणूसंवर्धका बरोबर पी.एस.बी. या जिवाणू खताची मिश्रण करून बीजप्रक्रिया करता येते.

(क) कोणत्याही इतर खतांबरोबर पी.एस.बी. किंवा इतर जिवाणूसंवर्धन मिसळू नये.

(ड) पी.एस.बी. किंवा इतर जिवाणूसंवर्धक  घरी आणल्यानंतर शक्य तितक्या लवकर वापरावीत तसेच बीज प्रक्रिया केल्यानंतर सावलीत हे बियाणे वाळवून ताबडतोब पेरणी करावी. 

 

लेख संकलित आहे.

कृषिवाणी

English Summary: PSB biofertilizer important in crop income
Published on: 21 September 2021, 03:15 IST