या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील पैनगंगासह अन्य नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील काही गावे बाधीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार बुलडाणा 88.8 मिली, रायपूर 95.5, पाडळी 89.5, धाड 75.5, साखळी 112.8, देऊळघाट 112, चिखली तालुक्यातील चांधई 65.3, नांदुरा तालुक्यातील निमगांव 67.3, मोताळा तालुक्यातील धा.बढे 70.8 मिली अशाप्रकारे अतिवृष्टी झाली आहे.
तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यास तातडीने पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक, ॲप, संबंधित बँक शाखा, नजीकच्या कृषी विभागाचे कार्यालयाला नुकसानीची माहिती द्यावी.
जेणेकरून पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसानची माहिती घेवून पंचनामे करतील व शेतकऱ्यांना मदत देतील. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीला द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
काही नागरिकांच्या घरांचीही पडझड आली आहे. त्यामुळे संसार उघड्यावर आले आहे. अशा बाधित नागरिकांना तातडीने मदत करावी.
तसेच काही शेतकऱ्यांच्या जनावरे सुद्धा वीज पडून किंवा पुरात वाहून मृत पावली आहे. बाधित शेतकऱ्यांनाही मदत द्यावी लागणार आहे. तरी यंत्रणांनी पंचनामे पूर्ण करावे, असे आदेशही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 29 September 2021, 11:10 IST