जूनच्या आडसाली लागणीने आता वीस महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. कारखान्याची टोळी गावात येईना. इकडे ऊस वाळून चाललाय. उसाला तुरा येऊन तीन महिने झाले,तरीही मुकादमाचे लक्ष उसाकडे जाईना. एरवी आतापर्यंत खोडव्याचे नियोजन सुरू होते पण ऊस अजून शेतातच आहे. जिथे टोळी येते तिथे उसाला काडी लावून उसावर कोयता चालवला जातो. मुकादमाला तोंडी येईल ती किंमत बहाल करावी लागते. दर वर्षी प्रमाणे यंदाही साखर कारखान्यांनी आपल्या व्यावसायिकतेची प्रदर्शन केले आहे. कारखान्यांचे तोडणीचे कोणतेही व्यवस्थापन दिसून येत नाही.आशा या परिस्थितीत सध्याचा ऊस हंगाम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच उस काडी न लावता तोडला जातो तो आमचा दृष्टीने खुप भाग्यवान शेतकरी आहे. त्याचा जवळ सेंद्रिय कर्बाचा भलामोठा साठा आहे. ह्या पाचटाला काडी लावून जमीन नापीक करायची की त्याला कुजवून माती समृद्ध करायची हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
माझा मते पाचट ठेवणे ही खूप मोठी संधी आहे. दोन्ही सरी मधील पाचट हे ऐका सरी मध्ये दाबून घ्यावा आणि त्यावर एक पोत युरिया आणि एक पोत सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. पहिल्या पाण्यामधून पाला कुजवणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा. ट्रायकोडर्मा बुरशीमध्ये पाचट कुजवण्याची प्रचंड क्षमता आहे. प्रत्येक सेंद्रिय पदार्थांचे विघटन होण्यासाठी कर्ब नत्र गुंणोत्तराची आवश्यकता असते. नारळाची साल किंवा नारळाचे झावळ्या ह्या वर्षानुवर्षे कुजत नाहीत त्यामागचे प्रमुख कारण असते ते कर्ब नत्र गुंणोत्तराचे. कर्ब नत्र गुणोत्तर जर जास्त असेल म्हणजे नत्राचा तुलनेने कर्ब जास्त असेल तर कुजण्याची प्रक्रिया खूप संथ गतीने होत असते. त्याच ठिकाणी कर्ब नत्र गुणोत्तर जर कमी असेल म्हणजे कर्बाचे तुलनेने नत्र थोडं जास्त असेल तर तो सेंद्रिय पदार्थ काही दिवसात कुजतो.कर्ब नत्राचे गुंणोत्तर योग्य ठेवण्यासाठी आपण पाचटावर एक पोत युरिया आणि एक पोत सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करतो.
मागचा वर्षी तांबिरा रोगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली. ह्या रोगाचा प्रादुर्भाव प्रत्येक वानावर झाल्याचे जाणवले. मोठ्या उसामध्ये जिथे ऊस दोन वेळा पडला आहे,जिथे दहा वीस फूट आत शेतात जाता ही येत नाही अशा परिस्थितीत तांबीराचा प्रादुर्भाव जाणवला. तांबीरा आला म्हणून शेतकऱ्याला फवारणी ही करता येत नाही. ह्या रोगावर एकच पर्याय आहे. तांबीरा रोगाची बुरशी सक्रिय होण्या आधीच त्याचे बीजाणू नष्ट करणे. तांबीऱ्याचे बीजाणू नष्ट करण्याचा एक पर्याय आहे जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा बुरशीची संख्या वाढवणे. ट्रायकोडर्मा बुरशींचा वापरामुळे तांबीऱ्याचे बीजाणू सुप्तावस्थेतच नियंत्रित होतात. त्यामुळे त्याना सक्रिय होण्या आधीच त्यांच्यावर नियंत्रण मिळवलं जाते. इथे आपल्याकडे एक मोठी संधी आहे. आपल्या शिवारात कित्येक टन पाचट उपलब्ध आहे. ह्या पाचटाचे विघटन होणे महत्त्वाचे आहे. हे विघटन ट्रायकोडर्मा बुरशीमुळे प्रभावीपणे केले जाते. पाचटाचा विघटनानंतर त्यामधून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर ट्रायकोडर्मा बुरशी आपले प्रजनन करण्यासाठी वापरते. ट्रायकोडर्मा बुरशींची संख्या वाढली की तांबीरा रोगाचा सुप्तावस्थेतील बिजाणुंवर आक्रमण होते आणि कालांतराने त्यांची संख्या घटते. ट्रायकोडर्माचा वापरामुळे फक्त तांबीरा रोगावरच नियंत्रण होते असे नाही,ऊस पिकावरील बऱ्याचशा बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
पाचट व्यवस्थपन करणे ही आपली शेती शाश्वत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पाचट विषयी बरेच गैरसमज आहेत. पाचट ठेवल्यामुळे हुमणी आळीचा प्रादुर्भाव वाढतो. हा खूप मोठा गैरसमज आहे.बर्याच शेती तज्ज्ञांशी वार्तालाब केल्यावर असं जाणवलं की पाचट ठेवणे आणि हुमणी अळीचा काही संबंध नाही. आमचा गावातही पाला पेटवण्याची प्रथा आहे. त्यांचाही गैरसमज आहे की पाचट ठेवल्यामुळे हुमणी वाढते. ते गेली कित्येक वर्षे पाला जाळत आहेत. एवढ्या वर्षानंतरही हुमणी दर वर्षी येते. दर वर्षी त्यांचं नुकसान होत राहत. प्रत्येक वर्षी उत्पादन घटत चालले आहे. दुसरीकडे आम्ही वर्षानुवर्षे पाचट कुजवतो. हुमणी गेली पाच वर्ष बघायलाही सापडत नाही. जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.पाचटाचे विघटन करणे ही एक संधी आहे. आपल्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बही वाढवता येते आणि इतर रोगकारक बुरशींवर नियंत्रण ही मिळवता येते. ही संधी घ्यायची की सोडायची हे प्रत्येक शेतकऱ्यांचा सदसद्विवेकबुद्धी वर अवलंबून आहे.
विवेक पाटील, सांगली
०९३२५८९३३१९
Published on: 14 March 2022, 10:01 IST