जगातील पाचव्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश अशी भारताची ओळख असताना उत्पादक शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी होणारी फसवणूक ही दरवर्षीची बाब बनली आहे. त्याला आता आळा बसणार आहे. बियाण्यांवरील खर्च कमी करणे तसेच पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे त्यांच्याच शेतावर तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग घेत कृषी विभागाने योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बियाण्यांतील भेसळ थांबणार आहे.
भारतात १०.८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले जाते. देशातील या पिकाखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी ३३ टक्के क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राचा देशात सोयाबीन उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. गेल्यावर्षी खरीप हंगामात राज्यात ३६.३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे उत्पादन घेण्यात आले. एकूण ३८.३५ लाख मेट्रीक टन सोयाबीनचे उत्पादन झाले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश अशा चार प्रादेशिक विभागांमध्ये सोयाबीनचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. मात्र दरवर्षी भेसळयुक्त बियाण्याच्या शेकडो तक्रारी येतात. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीसह हंगाम वाया जाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. हे थांबविण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
असे राखून ठेवा सोयाबीनचे बियाणे
- ज्या शेतामधील बियाणे आपण राखून ठेवणार आहोत त्या शेतामधील भेसळ झाडे काढून टाकावीत. भेसळ म्हणजे साधारण पिकापेक्षा कमी किंवा जास्त उंचीची, वेगवेगळ्या रंगाची फुले व शेंगा असलेली तसेच रोगट झाडे काढून टाकावीत.
- कीड व रोगाचा योग्य बंदोबस्त करावा. शेंगा भरत असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी. जेणेकरून साठवणुकीच्या काळात बुरशीची वाढ होणार नाही.
- शेताच्या चारही बाजूच्या शेतात जर त्याच वाणाचे सोयाबीन बियाणे असेल तर ठीक. अन्यथा ज्या बाजूस त्या वाणाचे बियाणे नाही, त्या बाजुच्या बांधापासुन ३ मिटर आतपर्यंतची झाडे बियाणासाठी काढणीच्या वेळी घेऊ नये.
- बियाणाची कापणी वेळीच करावी. कापणीनंतर किंवा काढणीनंतर पावसात भिजलेले सोयाबीन बियाणांसाठी राखून ठेऊ नये. उन्हात चांगले वाळवावे व पावसात भिजणार नाही त्यासाठी उपाययोजना कराव्यात.
बियाणे साठवताना घ्यायची काळजी
- कापणीनंतर सोयाबीनच्या शेंगावर बुरशी येईल, अशा पद्धतीने साठवणूक करू नये.
- कापणीनंतर बियाण्यातील आर्द्रता १३-१४% आसपास आणण्यासाठी १ ते २ दिवस उन्हात बियाणे सुकविण्यात यावे आणि त्यानंतर मळणी करावी. उत्पादित बियाण्याची आर्द्रता १४% असेल तर मळणी यंत्राचा वेग ४०० ते ५०० RPM आणि १३% असल्यास वेग ३०० ते ४00 आरपीएमच्या मर्यादेत असावा. बियाणातील आर्द्रता व मळणीचा वेग दिलेल्या मर्यादेत कमी किंवा जास्त झाला तर उत्पादित बियाणामध्ये तांत्रिक नुकसान होऊ शकते.
- साठवणूक करण्यापूर्वी बियाणातील आर्द्रता ९-१२% राहील याची काळजी घ्यावी.
- सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते त्यामुळे भरलेली पोती कोरड्या हवेत ठेवावीत. ती उन्हात व दमट हवेत ठेवू नये.
- बियाणे १०० किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांपेक्षा जास्त व ४० किलो पोत्यांमध्ये असल्यास पोत्यापेक्षा जास्तची थप्पी लावू नये अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणाची उगवण शक्ती कमी होते. तसेच पोत्याची थप्पी जमिनीपासून १० ते १५ सेंमी. च्या वर लाकडी फळ्यावर लावावी.
- पोत्याची रचना उभ्या-आडव्या पध्दतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणवत्ता जास्त काळ टिकण्यास मदत होते.
- पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
मार्गदर्शनासाठी येथे साधा संपर्क
अशा प्रकारे बियाणे निर्मिती काढणी व साठवणकीच्या काळात काळजी घेत उगवणशक्ती असलेले बियाणे निश्चितच आपणं घरच्या घरी निर्माण करू शकतो. अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अमरावती कृषी विभागाने केले आहे.
Published on: 16 September 2020, 12:07 IST