जमीन:-
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.
पूर्वमशागत
खरीपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळया दयाव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. या प्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
पेरणीची वेळ
हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोय अजिबात नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेंबरनंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी.
यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण वापरावेत. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.
सुधारित वाण
देशी हरभ-यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पी.के.व्ही २ (काक -२) पीकेव्ही -४ आणि कृपा हे वाण अधिक - उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय आणि दिग्विजय हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रीक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारीत केला आहे.
पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण
सामान्यत: देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील १० सें.मी. अंतरावर टोकण होईल असे ट्रॅक्टरवर चालणारे पेरणीयंत्र महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केले आहे. त्याचा वापर करणे अधिक चांगले. या प्रकारे पेरणी केल्यास विजय हरभऱ्याचे हेक्टरी ६५ ते ७० किलो तर विशाल,दिग्विजय, विराट किंवा पी.के.व्ही - २ या वाणांचे हेक्टरी १०० किलो बियाणे लागते. पीकेव्ही-४ आणि कृपा वाणाकरिता १२५ १३० किलो/हेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. भारी जमिनीत ९० सें.मी. रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर एक-एक बियाणे टाकावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करुन वापशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.
बीजप्रक्रिया:-
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी, यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते.
खतमात्रा:-
हरभऱ्याला हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश खताची आवश्यकता असते. यासाठी हेक्टरी १२५ किलो डीएपी आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाणालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरुन द्यावे. खत विस्कटून टाकू नये. पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरीयाची फवारणी करावी.
स्रोत:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
-team IPM SCHOOL
Published on: 19 October 2021, 08:29 IST