नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यानंतर पेरण्यांना गती आली. जिल्ह्यात एकूण प्रस्तावित ६ लाख ६५ हजार ५८२ ५८२ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ४ हजार ६९६ हेटक्कर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने ९०. ८५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातही मकाची लागवड झाली आहे, पण मकावर लष्कर अळीचे आक्रमण झाले आहे. या लष्कर अळीमुळे मका पिकाचे अधिक नुकसान होत असते. आपण या लेखात लष्कर अळीवर आळा कसा आणायचा याची माहिती घेणार आहोत.
मका या पिकावर वारंवार लष्करी अळीचा हल्ला होत असतो. या अळीमुळे मक्याचे मोठ्य़ा प्रमाणात होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. २०१५ पर्यंत फक्त अमेरिका खंडात आढळणारी ही अळी लष्करप्रमाणे जोरदार अटॅक करून पिकांचे नुकसान करते. या अळीचा पिकावर केला जाणार प्रहार हा एखादा सैनिका प्रमाणे जोरदार असतो यामुळे या अळीला लष्करी अळी असे नाव पडले. फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) अर्थात स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड आहे. भारतात सर्व प्रथम २०१८ मध्ये दक्षिण कर्नाटकात नोंद झाली व एकाच वर्षात महाराष्ट्रासह इतर राज्यात आढळून आली. या किडीचा पतंग एका रात्रीतून १०० कि.मी. पर्यंत उडत जातो व आयुष्यात २००० कि.मी पर्यंतचा प्रवास करू शकतो. तर एक मादी एका वेळेस १०० ते २०० अंडी घालते व एकूण १५०० ते २००० अंडी घालू शकते.
लष्करी अळी सुरुवातीला पाने खाऊन आपली उपजिविका करते व नंतर मक्याचा कणसात प्रवेश करून संपूर्ण दाणे खाऊन टाकते. तीस ते ८० दिवसात जीवनक्रम पूर्ण होत असल्यामुळे एका पिकात ३ ते ४ पिढ्या सहज पूर्ण होतात. त्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाय वापरले तरच शाश्वत नियंत्रण मिळेल.
नियंत्रणाबाबत महत्त्वाच्या गोष्टी
अळीचे पुढील दोन लक्षणावर आधारित व्यवस्थापन करावे.
१. पिकावर वाढणारी लक्षणे अळीची वाढ दर्शवतात.
२. अळीची वाढीची अवस्था कोणते कीटकनाशक निवडावे अथवा नियंत्रणाचे उपाय योजावेत हे ठरवते.
नुकसानीचा प्रकार
- मका पिकात रोपावस्थेत पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या पाने खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसायला लागतात.
- लहान रोपांवर अशी लक्षणे दिसल्यास प्रादुर्भाव आहे असे समजावे व नियंत्रणाचे उपाय योजावेत.
- अळी तिसऱ्या अवस्थेत पोंग्यामध्ये प्रवेश करून पाने खाण्यास सुरवात करते. या अवस्थेत पानांवर छिद्रे दिसतात.
- पाचव्या अवस्थेत पोंग्यामध्ये राहून पाने खाते. त्यामुळे पानांवर मोठी छिद्रे दिसायला लागतात.
- सहाव्या अवस्थेत अळी आधाशीपणे पाने खाऊन पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. या अवस्थेत मक्याची पाने झडल्यासारखी दिसतात.
- तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत आर्थिक नुकसान अधिक असते.
- अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. आणि मधुमकावर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळतो.
लष्कर अळीवरील एकात्मिक नियंत्रण
- पाऊस पडण्याआधी खोल नांगरट. त्यामुळे किडीची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्षांच्या संपर्कात येऊन मरून जाते.
- फेरपालट. मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल घ्यावे.
- पेरणी पाऊस पडल्यानंतर करावी. उशिरा पेरणी टाळावी.
- एकाच वेळी पेरणी केल्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. किडीला प्रत्येक वाढीच्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.
- आंतरपीक घेऊन पिकांची विविधता साधावी. उदा. मका+ तूर, उडीद, मूग
- मक्याच्या बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. त्याचा उपयोग सापळा पीक म्हणून होतो
- मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षिथांबे उभारावेत.
- पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- किडीच्या सर्वेक्षणासाठी पीक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.
- नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी १५ कामगंध सापळे लावावेत.
- पोंगा व्यवस्थित तयार होईल त्या वेळी माती आणि राख किंवा चुना यांचे ९:१ या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे. त्यामुळे पोंग्यातील अळ्यांवर परिणाम होतो.
- मधु मका किंवा बेबी कॉर्नमध्ये १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन पाच मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणात घेऊन सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी घ्यावी.
- प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटॅऱ्हायझियम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास खालील कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. द्रावण पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.
लष्करी अळीचे रासायनिक नियंत्रण (प्रतिलिटर पाणी )
अळीच्या वाढीच्या पहिल्या अवस्थांमध्ये कडुनिंबावर आधारित कीटकनाशक (१५०० पीपीएम) ५ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (१२.६ टक्के) + लॅम्बडा सायहेलोथ्रीन (९.५ टक्के झेड सी) संयुक्त कीटकनाशकाची ०.५ मि.लि. किंवा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड (४५ एस. सी.) ०.३ मि.लि. किंवा भाताचा भुसा १० किलो आणि गूळ २ किलो पाण्यात एकत्र करून त्याचे गोळे तयार करावेत. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थायोडीकार्ब (७५ डब्ल्यू.पी.) १०० ग्रॅम मिसळावे. या मिश्रणाच्या लहान गोळ्या तयार करून मक्याच्या पोंग्यात टाकाव्यात.
जैविक पद्धतीने लष्करी अळीवर कसे कराल नियंत्रण
मित्र किटकांच्या निवासस्थानाचे व्यवस्थापन नैसर्गिक अवस्थेमध्ये करणे - वनस्पतींची विविधता कडधान्य तसेच फुलांची झाडे आंतरपीक पद्धतीने वापरुन मित्र किटकांचे संवर्धन करणे. ट्राय्कोग्रामा प्रीटीओसम अथवा टीलीनोमस रीमस एकरी ५० हजार या प्रमाणात ३ पंतग प्रती कामगंध सापळा आढळून आल्यास अथवा आठवड्याच्या अंतराने शेतात प्रसारण करावे. जैविक किटकनाशके - रोपावस्था ते लवकर येणारी पोंगावस्थेत ५ टक्के नुकसान आणि १० टक्के कणासाचे नुकसान. पेरणीनंतर १५ -२५ दिवसांनी पोंगावस्थेत मेटा - झीअ.म एॅनीसोप्ली ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. दहा दिवसांच्या अंतराने गरज भासल्यास अथवा प्रादुर्भाव आढळून आल्यास १-२ फवारण्या काराव्यात.
Published on: 02 September 2020, 06:51 IST