Agripedia

पोटॅशियम शोनाईट हे उत्पादन पोटॅशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहे. हे खत पाण्यात १००% विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते.

Updated on 14 November, 2021 8:30 PM IST

यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत. कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात. पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो. पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होते, पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियममुळे अबाधित राहते. गंधकामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती व फळांची टिकाऊ क्षमता वाढते तसेच पिकाची पक्वता लवकर व एकसारखी होते.

मातीतील कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम या धनभारित (कॅटायन्स) अन्नद्रव्यांचे परस्पर प्रमाण त्या मातीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी (धन व ऋण आयन देवाण घेवाण करण्याची क्षमता) ठरवण्यासाठी कारणीभूत ठरते. 

कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी चांगली असल्यास मुळांच्या टप्यातील अन्नद्रव्ये जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतात व शोधून घेतली जातात. पोटॅशियम शोनाईटमध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियम ही अन्नद्रव्ये असल्याने मुळांच्या कक्षेतील कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुधारण्यास व पर्यायाने अन्नद्रव्यांची उपलब्धता व त्यांचे मुळांकडून होणारे शोषण वाढण्यास मदत पिकाच्या पक्वतापूर्व अवस्थेत पोटॅशियम शोनाइट जमिनीतून एकरी २५ किलो किंवा पाण्यात १००% विद्राव्य असल्याने ड्रीपमधून (३-५ किलो प्रति एकर, दर आठवडयाला ४-५ वेळा) किंवा फवारणीतूनही (१ किलो प्रति १०० लीटर पाणी) देता येते.फळपिकांसाठी फळवाढीच्या काळात, भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोडयाच्या काळात, ऊस पिकासाठी डीप असल्यास लागणीनंतर ६ महिन्यांनी, गरव्या कांद्यासाठी रोपे लागणीनंतर २ ते २.५ महिन्यांनी, बटाटयासाठी भर देताना व आले-हळदीसाठी पाचव्या महिन्यानंतर वापरावे किंवा या काळात दर १२ ते १५ दिवसांनी २-३ फवारण्या कराव्यात.

वापरण्याचे प्रमाण :- 

जमिनीतून - फळे व भाजीपाला पिकांसाठी फळांचे सेटिंग झाल्यावर एकरी २५ किलो एकदा द्यावे.

ड्रीपमधून - फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोड्याच्या काळात, कपाशीला फुलपात्या लागल्यावर तसेच ऊसाच्या लागणीनंतर ६ महिन्यांनी एकरी ३ ते ५ किलो दर आठवडयाला ४ ते ५ वेळा सोडावे.

फवारणीतून - ड्रीपची सोय नसल्यास फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोडयाच्या काळात, कपाशीला फुलपात्या लागल्यावर तसेच ऊसाच्या लागणीनंतर ६ महिन्यांनी १ किलो पोटॅशियम शोनाईट १०० लीटर पाण्यात विरघळवून तयार केलेल्या द्रावणाची १२-१५ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारणी करावी.

संकलन - विनोद भोयर

English Summary: Potassium shonite function and method of application in crop
Published on: 14 November 2021, 08:30 IST