Agripedia

डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही.

Updated on 03 March, 2022 3:33 PM IST

डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही. जर कोणी तुम्हाला महागड्या किमतीत अशी औषधे देत असतील तर ते निव्वळ आपल्या या रोगाबद्दलचा अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपला खिसा भरत आहे असे समजावे. अशा लोकांकडून १०० रुपयांचे स्टॅम्पवर लिहून घ्यावे कि तुमची औषधे वापरल्यावर आमच्या तेल्यायुक्त बागेत जुलै-ऑक्टोबर या काळात तेल्याचे एकही फळ आढळणार नाही. नंतरच मग अशी औषधे वापरण्यास सुरुवात करावी.

 

मुखत्वे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो. 

 आतापर्यंतचा अनुभवात असे लक्षात आले कि, तेल्या रोगासाठी लोक अतिरिक्त फवारणी करत जातात. एकामागून एक अँटिबायोटिक, विविध ऍसिड, तेलब्या..तेल्या विनाश इत्यादी बिनबुडाचे फवारणीचा वापर करतात. 

इथे तेल्या रोगामुळे झाड आधीच अशक्त झाले असताना अतिरिक्त फवारणीवर फवारणी करून झाड अजून कोमात घातले जाते. परिणामी रोगाचा प्रसार थांबण्याऐवजी तो वाढतच जातो.

दुसरं असं लोक फवारणीवर जास्तीचा जोर देतात पण ड्रिपवाटे झाडाला अगदी कमी प्रमाणात खते(खुराक) देतात. म्हणजे फवारणीसाठी घेतलेल्या औषधांच्या १०% खर्च सुद्धा आपण ड्रीपवाटे सोडायच्या औषधांवर करत नाही. म्हणजे आपण डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टर सांगतात औषध थोडे स्ट्रॉन्ग आहे, जेवण करा आणि मग घ्या..मग इथे झाडांना ड्रिपवाटे काही न देता सर्रास एकावर एक स्ट्रॉन्ग फवारे मारले जातात.

तिसरं एक मी असेही काही शेतकरी पाहिले आहेत कि ज्यांचं ड्रिपच वेळापत्रक ठरलेले आहे. फवारणी ते परिस्थिती पाहून करतात. पाण्याचं सिंचन अगदी मापात करतात ( म्हणजे रोज किती पाणी द्याच ते ठरलेले आहे ..असं नाही कि आज लाईट होती मग ३ तास चालवल पाणी...किंव्हा मग मोटर चालू राहिली मग रात्रभर चालू राहील पाणी असं नाही ). रोज नियमित वेळेवर सिंचन आणि ड्रीपवाटे कोणते खत कधी द्याचे, किती प्रमाणात द्यायचे याचा सर्व हिशोब धरणाऱ्या अशा काही शेतकऱ्यांच्या बागेत एकही झाड मर रोगाने गेलेले नाही ...किंव्हा आमच्या बागेत तेल्या रोगाचे फळ आणून टाका. आम्हाला आमच्या झाडांवर ग्यारंटी आहे, कि ते तेल्या रोगाला बळीच पडणार नाहीत..स्वतःच्या झाडांवर एवढा विश्वास असणारे पण खूप शेतकरी आहेत. 

म्हणजे एखाद्या अशक्त माणसाला रोगांची लागण लवकर होते पण आठवड्यात काही ना काही पौष्टिक खुराक खाणाऱ्या पहिलवान माणसाला रोगांची लागण लवकर होत नाही. आता आपल्याला आपली झाड पहिलवान करायची कि अशक्त ठेवायची हे आपल्या हातात.

तेल्या रोगाचा खूपदा बाऊ डाळिंब बागायतदार लोकांमध्ये करून दिलेला आहे...याला ज्यांनी नवीन जे नवीन डाळिंब बागायतदार आहेत ते घाबरून जातात...या उलट जवळे कडलग,संगमनेर मधील बरेच शेतकरी ज्यांनी राहुरी डॅम लगत आद्रतेच्या भागात शेती घेतली आहे ते १०-१५ वर्षांपासून तेल्याची लागण असलेल्या ४०-५० एकराच्या बागा सांभाळून त्यातून भरघोस उत्पन्न घेतात. 

तेल्या रोगासाठी आपला सिंचन, ड्रिपवाटे खते, योग्य फवारणी, बागेतील स्वच्छता इत्यादींमधील ढिसाळपणा कारणीभूत ठरतो. तर रोगाची लागण होऊ नये..व झालीच तर योग्य व प्रामाणिक सल्ल्याचा अभाव इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरतात.

तेल्यासाठी पूर्व उपाययोजना:

- तेल्यामुक्त रोपांची लागवड करा. २ रुपयांनी स्वस्त भेटतात म्हणून कुठूनही रोपे घेऊ नका. खात्रीच्या ठिकाणी रोगमुक्त रोपे घ्या. 

- तेल्यायुक्त झाडांसाठी आपण योग्य बाहेर पकडावा. जेणेकरून पावसाळ्याआधी आपली बाग हार्वेस्ट होऊन जाईल.

- डाळिंब बागेत योग्य व मातीच्या प्रकार, वाफसा नुसार योग्य सिंचन करा. 

- डाळिंब बागेत ड्रिपवाटे खतांची योग्य मात्रा द्या. नत्रयुक्त खते, सूक्ष्म अन्नद्रवे, स्टिमुलंट्स चा वापर करा. त्यासाठी योग्य असे वेळापत्रक बनवून घ्या.

- NPK युक्त खते वापरा. फवारणीच्या औषधांच्या खर्चाच्या १०% खर्च तरी ड्रिपसाठीच्या खतांसाठी करा. जेणेकरून झाड एकदम सशक्त राहील. 

ड्रीप साठी खते देताना खर्चात बचत करू नका. योग्य त्या प्रमाणातच डोसेस देत चला. 

- बागेत १००% स्वच्छता ठेवा. हवा खेळती राहील याची काळजी घ्या. 

- फवारणी परिस्थिती पाहून करा. भर उन्हात फवारणी टाळा, तसेच स्ट्रॉन्ग फवारे मारताना बागेला काही वेळ ड्रिपमधून पाणी द्या. 

- खोडाला बोर्डोपेस्ट, छाटणीनंतर बोर्डो इत्यादी गोष्टी पाळत चला. 

- ड्रिपवाटे जीवामृत, घरघुती तयार केलेल्या स्लरी इत्यादी कमी खर्चिक गोष्टी वापरत चला.

- १००% शुद्ध निंबोळी पेंड, उत्तम कुजलेले खत व पॅसिलोमायसिस तसेच ट्रायकोडर्मा बुरशी एकत्र करून ८ ते १० दिवस त्यावर गुळाचे पाणी शिंपडून मग 

असे खत बागेला भरा. याने जमिनीतील जवळपास सर्वच बुरशीजन्य रोगांचा(मररोग,निम्याटोड) नायनाट होईल. 

या सर्व पूर्वउपायांमधील ड्रीपचे वेळापत्रक, सिंचन आणि स्वच्छता या तीन गोष्टींकडे मुख्यत्वे ध्यान द्यावे.

 

तेल्या आल्यानंतर उपाययोजना:

- तेल्या आल्यांनतर कॉपरयुक्त फवारे ( कोसाइड, ब्लायटॉक्स, ब्लू कॉपर ) अधिक स्ट्रॅप्टोसायक्लीन ची योग्य प्रमाणात फवारणी करावी. 

- कॉपर, कॅप्टन, कर्झेट, ताकत, स्कोर+कवच, कस्टोडिया इत्यादी फवारणी आलटूनपालटून घ्यावी. 

- बागेत ४% कॉपर डस्ट ची धुरळणी करावी. 

- बागेला अतिरिक्त सिंचन करणे टाळावे. मोकळे पाणी देणे टाळावे.

- पावसाळ्यात फळछाटणी लवकर करून घ्यावी. व लगेचच १% बोर्डो ची फवारणी करून घ्यावी.

तेल्या साठी मी नेहमी सांगतो ती फवारणी म्हणजे: ..सुडोमोनास + बॅसिलस ...तेल्यासाठी अत्यंत प्रभावशाली अशी हि फवारणी. सुडोमोनास आणि बॅसिलस हे जिवाणू तेल्याच्या व अन्य अपाय करणाऱ्या बुरशींना खातात. पावसाळी आद्र्तायुक्त वातावरणात या जिवाणूंची खूप चांगली अशी वाढ होते. त्यामुळॆ केमिकलयुक्त फवारणीपेक्षा हि फवारणी अत्यन्त फायदेशीर ठरते. 

फक्त हि फवारणी अत्यन्त काळजीपूर्वक पद्धतीने बनवावी. 

फवारणीसाठी किती पाणी लागते या हिशोबात.. सुडोमोनास ५ मिली/लिटर व बॅसिलस २ मिली/लिटर या प्रमाणात वापरावे.

 

फवारणी तयार करायची पद्धत : 

फवारणीचा हिशोबात सुडोमोनास एक १० लिटर पाण्यात टाकावे त्यात १ लिटर ताक व अर्धा किलो गुळ टाकावा. 

तसेच बॅसिलस दुसऱ्या एका १० लिटर पाण्यात टाकावे व त्यात पण १ लिटर ताक व अर्धा किलो गूळ टाकावा. 

(ताक व गूळ जिवाणूंसाठी अन्न म्हणून काम करतात, व त्यांची संख्या झपाट्याने वाढविण्याचे काम करतात) 

वरील दोन्ही द्रावाने सावलीत, हवेशीर ठेवावी.फवारणीची टाकी माती टाकून स्वच्छ धुवून घ्यावी. 

२४ तासांनंतर फवारणीचा टाकीमध्ये दोन्ही १० लिटर जिवाणू द्रावणे टाकावीत. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे व फवारणी करावी. १५ दिवसांच्या अंतराने याच्या दोन फवारणी घेतल्याने तेलासाठी प्रदीर्घ असा परिणाम या फवारणीने मिळते. अगदी वाजवी दरात हि फवारणी होते. फक्त सुडोमोनास व बॅसिलस हे ताजे जिवाणू औषधे घ्या. व वरील पद्दतीने औषध तयार करा.

तेल्यासाठी अनेक प्रकारचे बिनकामी औषधे, पोषक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण योग्य सिंचन, ड्रिपवाटे योग्य खते, बागेतील स्वच्छता या गोष्टींची काळजी आपणच घेतली पाहिजे. विविध महागडी औषधे फवारणी करण्यापेक्षा तेवढ्या किमतीचे योग्य NPK खते, बायोस्टिम्यूलंटस बागेला ड्रीपवाटे देत चला, जेणेकरून आपले झाडे सशक्त राहून, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते अशा रोगांना बळीच पडणार नाहीत.

निराश होऊन तेल्यायुक्त बाग उपटण्यापेक्षा योग्य असा बहार धरून, वरील प्रकारे नियोजन करत चला...अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पन्न तुम्हाला यातून मिळेल यात कुठलीही शंका नाही.

English Summary: Pomogranate telya disease reasons and control
Published on: 03 March 2022, 03:33 IST