शेतकरी पिकाचे किडीपासून रक्षण करण्यासाठी व वाढीसाठी विविध प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यातले बहुतेक कीटकनाशक हे विषारी ते अतिविषारी या गटात मोडतात. आपण जर कीटकनाशक फवारणी करताना व्यवस्थित काळजी घेतली नाही तरी विषबाधा होऊ शकते. यवतमाळ जिल्ह्यात यंदाही ३६ शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. दोन - तीन वर्षापुर्वी पिकांवर कीटकनाशक फवारताना ८८६ शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. तर २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने फवारणी कशी करावी यावर जनजागृती करण्यात आली. परंतु यंदा ही शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. कृषी विभागाच्या मते, शेतमजुर फवारणी करताना हलगर्जीपणा करतात. पुरेशी काळजी घेत नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती आपण खाली दिल्याप्रमाणे घेऊ.
आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा स्प्रेयर पंपाद्वारे निघणारे रासायनिक औषधांचे बारीक कण उडतात व ते श्वासाद्वारे शरीरात जातात. दुसरा महत्त्वाचा धोका म्हणजे फवारणी करत असताना हे कण डोळ्याद्वारे आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. तिसरा धोका म्हणजे बर्याच जणांना तंबाखू, गुटका खाण्याची असते. यामुळे ही रासायनिक द्रव्ये शरीरात जाऊ शकतात.
कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फवारणी पंप हा गळका नसावा असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा.
- फवारणीसाठी वापरलेले साहित्य भरपूर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे
- फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब काठीने ढवळावे.
- शक्यतो उपाशीपोटी फवारणी करू नये.
- तंबाखू हातावर मळल्याने किंवा विडी पिण्याने कीटकनाशक पोटात जाण्याचा धोका जास्त संभवतो.
- फवारणीचे काम झाल्यानंतर हात स्वच्छ पाणी घेऊन साबणाने धुवावेत.
- फवारणी करत असताना लहान मुले, पाळीव प्राणी फवारणी करत असलेल्या जागेपासून शक्यतो दूर ठेवावेत.
- फवारणीसाठी वापरलेले साहित्य जसे स्प्रेयर पंप, ग्लोव्हस वगैरे साहित्य ज्या पाण्याने धुतो त्या पाण्यात कीटकनाशकांचे विषारीकण किंवा अवशेष पाण्यात मिसळतात. त्यामुळे ते पाणी जमिनीत टाकावे अथवा छोटा खड्डा करून त्यात ते पाणी ओतावे. विशेष म्हणजे हे साहित्य नदी, नाले अथवा विहीरीजवळ धुवू नये.
- कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर व्यवस्थित नष्ट कराव्यात.
- कीटकनाशक फवारणीचे काम जास्तीत जास्त सहा ते सात तासच करावे.
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी वार्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये.
कीटकनाशक फवारणी केलेल्या क्षेत्राच्या आजूबाजूला गुरांना चरायला सोडू नये. कमीत कमी आठ ते दहा दिवस त्या क्षेत्रातील बांधाचे गवत कापून जनावरांना चारा म्हणून खाऊ घालू नये.
कीटकनाशकांच्या बाटलीवर विविध रंगांचे विशिष्ट चिन्ह असते. त्यातल्या लाल रंगाचे चिन्ह असलेल्या औषध जास्त विषारी असते. त्याखालोखाल पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ते फवारणी करण्याअगोदर शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाहून घ्यावे व त्याप्रमाणे व्यवस्थित काळजी घ्यावी.
फवारणी करण्यासाठीचे छोटे संरक्षण किड्स बाजारात मिळतात ते घेणे कधीही फायद्याचे होऊ शकते. तोंडाला मास्क किंवा फवारणी हेल्मेट, पूर्ण हात पाय झाकले जातील असा पेहराव करावा. हातामध्ये ग्लोव्हस वापरणे फार महत्त्वाचे असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मद्यपान करून फवारणी कधीच करू नये.
विषबाधेची लक्षणे
- अशक्तपणा चक्कर येतात.
- अंगाला दरदरून घाम येतो तसेच डोळ्यांची जळजळ व्हायला लागते.
- तोंडातून लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी होणे, मळमळणे पोटात दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
- डोकेदुखी, स्नायू दुखीचा त्रास होतो, धाप लागते, छातीत दुखते व खोकला लागू लागू शकतो व काही कालांतराने व्यक्ती बेशुद्ध पडतो.
Published on: 05 September 2020, 06:57 IST