Agripedia

खरीप पिकाच्या कापणीनंतर योग्य ओलावा असतानाच जमीन उभी आडवी नांगरावी. आणि दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. अशा प्रकारे जमीन समपातळीत आल्यानंतर ५० सें.मी. उंचीचे, ६० सें.मी. रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यामधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. गादीवाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार तसेच शेताच्या आकारमानानुसार निश्चित करावी.

Updated on 26 March, 2024 4:36 PM IST

सुनिल सुभाष किनगे, ऐश्वर्या जगदीश राठोड

रब्बी हंगामात डिसेंबर, जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात भुईमूगाची पेरणी फेब्रुवारी महिन्यात करावी लागते. उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या वेळात करावी. जमिनीत चांगल्या प्रकारची ओल होताच म्हणजे जमीन ओलावून अथवा पेरणी करून ताबडतोब पाणी द्यावे. बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेंटिग्रेड पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. पेरणीस जसजसा उशीर होईल तशी उत्पादनात घट येते. तसेच. त्यामुळे ज्या ठिकाणी मे महिन्यापर्यंत पाण्याची सोय आहे अशा ठिकाणीच पीक घेणे शेतकऱ्यांना भाग पडते. महाराष्ट्राच्या बहुतांश - भागात मार्च अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे भुईमूग लवकर पेरून (नोव्हेंबर-डिसेंबर) पाणी कमी होण्यापूर्वी काढणी करण्याला तापमानाच्या मर्यादा निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी पारदर्शक प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करून भुईमूगाची पेरणी नोव्हेंबरमध्ये आणि काढणी मार्च अखेरपर्यंत करणे शक्य झाले आहे.

प्लॅस्टीक फिल्म कसे असावे ?

प्लॅस्टीक आच्छादन पारदर्शक असावे.
आच्छादन अतिशय पातळ आणि पारदर्शक असावे जेणेकरून सूर्याची उष्णता जमिनीपर्यंत पोहोचेल.
आच्छादनाची जाडी सुमारे ५ ते ७ मायक्रॉन असावी. त्यामुळे भुईमूगाच्या आऱ्या आच्छादनातून सहजपणे जमिनीमध्ये जातील.
आच्छादनाची रुंदी ९० सें. मी. पन्ह्याच्या प्लॅस्टीक कागदाप्रमाणे आणि लांबी शेताच्या आकारमानानुसार तसेच उतारानुसार ठेवावी.
आच्छादनाच्या मध्यभागी २० सें.मी. अंतरावर तीन ओळींमध्ये १० सें.मी. वर ३ सें.मी. व्यासाची भोके पाडून घ्यावीत.
प्लॅस्टीक आच्छादनामुळे होणारे फायदे -
जमिनीतील तापमान (५०-८० सें.) वाढते त्यामुळे थंडीच्या कालावधीत भुईमूगाची उगवण सुमारे ३ ते ४ दिवस लवकर होते.
जमिनीतून होणारे बाष्पीभवन रोखले जाते. त्यामुळे पिकास पाणी कमी लागते आणि २-३ पाण्याच्या पाळ्यांची बचत होते.
जमिनीतील उपयुक्त जिवाणूंमध्ये वाढ होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
जमिनीतील जिवाणूंची वाढ झाल्यामुळे भुईमूगाची नत्र स्थिरीकरणाची क्षमता वाढते. तसेच इतर आवश्यक स्फुरद, पालाश इ. अन्नघटकांची उपलब्धता वाढते.
मुळांची वाढ जोमाने होते आणि मुळांचा एकूण विस्तार वाढतो.
पिकाची वाढ जोमाने होते, फुले लवकर आणि जास्त प्रमाणात येतात. त्यामुळे शेंगांचे प्रमाण वाढून शेंगा भरण्यास जास्त कालावधी मिळतो.
उशिरा येणाऱ्या आऱ्या कमकुवत असल्यामुळे त्या प्लॅस्टिक फिल्म भेदून जमिनीत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जमिनीत गेलेल्या आऱ्यांमधील दाणे चांगले पोसले जातात आणि सर्व शेंगा जवळजवळ एकाच वेळी तयार होतात.
८ शेंगांतील तेल आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते.
भुईमूग साधारण ८-१० दिवस लवकर काढणीस तयार होतो.
भुईमूगाची वाढ जोमाने झाल्यामुळे रोगांचे प्रमाण कमी होते.
शेंगांचे उत्पादन वाढते.

जमिनीची मशागत आणि गादीवाफे तयार करणे :

खरीप पिकाच्या कापणीनंतर योग्य ओलावा असतानाच जमीन उभी आडवी नांगरावी. आणि दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. अशा प्रकारे जमीन समपातळीत आल्यानंतर ५० सें.मी. उंचीचे, ६० सें.मी. रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यामधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. गादीवाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार तसेच शेताच्या आकारमानानुसार निश्चित करावी.

योग्य जातीची आणि बियाण्याची निवड :

रब्बी हंगामासाठी उपट्या प्रकारातील भुईमूग जातीची निवड करावी. उपट्या प्रकारातील जाती काढणीस सोप्या असतात. टी. जी. - २६, फुले प्रगती, टीओजी-२४ या सुधारित जाती वापराव्यात. बियाणे प्रमाणित, शुद्ध असावे तसेच बियाण्याची उगवणशक्ती ९० टक्क्याहून जास्त असावी. प्रति हेक्टरी १०० ते १२५ कि.ग्रॅ. बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बाविस्टीन अथवा थायरम बुरशीनाशकाची प्रती किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात प्रकिया करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.

खत व्यवस्थापन :

भुईमूगाचे पीक सेंद्रीय खतास चांगला प्रतिसाद देते. त्यामुळे गादीवाफे तयार करताना हेक्टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये वाफ्यावर मिसळावे. त्यानंतर हेक्टरी ५० कि.ग्रॅ. नत्र, १०० कि.ग्रॅ. स्फुरद आणि ६० किलो बालाश या खताची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी ओळीमध्ये ८ ते १० सें.मी. खोलीवर पडेल अशा त-हेने द्यावी

प्लॅस्टीक आच्छादनाचा वापर :

तणनाशक फवारणीनंतर प्लॅस्टीक आच्छादन गादी वाफ्यावर अंथरावे. आच्छादन स्थिर रहावे म्हणून दोन वाफ्यातील सरीमधील आच्छादनाच्या कडांवर मातीचा थर द्यावा.

पेरणी :

आच्छादन गादी वाफ्यावर अंथरल्यावर दोन वाफ्यातील सरीमध्ये उभे राहून आच्छादनास पाडलेल्या ३-४ सें. मी. खोलीवर बियाण्याची पेरणी करावी. प्रत्येक ठिकाणी दोन बिया टाकाव्यात आणि बियाणे मातीने झाकून घ्यावे. पेरणीनंतर ५-६ दिवस राखण करणे आवश्यक आहे. कारण कावळे व इतर पक्षी बियाणे अथवा कोंब खातात. पेरणी नोव्हेंबरमध्ये करावी. पेरणीसाठी प्रती हेक्टरी १०५ ते १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणीनंतर सुमारे ५-७ दिवसांत भुईमूगाची उगवण होते. त्यानंतर न भुईमूगाच्या फांद्या किंवा पाने आच्छादनाखाली राहणार " नाहीत याची काळजी घ्यावी. अशी रोपे हाताने भोकातून अलगद बाहेर काढावीत. तसे न केल्यास फांद्या व आच्छादनाखाली पिवळी पडतात आणि कालांतराने अति उष्णतेत करपून जाण्याची शक्यता असते.

पाणी व्यवस्थापन :

आच्छादनाचा वापर केल्यामुळे पिकास पाणी कमी लागते. त्यामुळे पाण्याच्या १-२ पाळ्या कमी लागतात. पिकाच्या वाढीच्या कालावधीमध्ये दोन पाळ्यांतील अंतर १५-२० दिवस ठेवावे. मात्र पीक फुलोऱ्यात असताना तसेच शेंगा भरण्याच्या वेळेस पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर सुमारे १२ ते १५ दिवस असावे. अशा प्रकारे पिकास एकूण ८-९ पाण्याच्या पाळ्या पुरेशा आहेत.

उत्पन्न :

भुईमूगाच्या प्लॅस्टीक आच्छादन तंत्रज्ञानाचा वापर करून हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल उत्पादन मिळते. रब्बी हंगामात तयार झालेले भुईमूग बियाणे ६ टक्के ओलाव्यापर्यंत वाळवून अॅल्युमिनियम फॉईल बॅगमध्ये साठवून ठेवल्यास पुढील रब्बी हंगामात वापरता येते.

लेखक - सुनिल सुभाष किनगे, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
ऐश्वर्या जगदीश राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

English Summary: Plastic mulch technology for groundnut summer crop management
Published on: 26 March 2024, 04:36 IST