सूर्यप्रकाशामुळे आपले वनस्पतींचे पोषण होते, मात्र आपण वनस्पतीपासून अन्न बनवू शकत नाही. त्यामुळे मानव तसेच प्राण्यांना अन्नासाठी वनस्पतींवरच अवलंबून राहावे लागते. अर्थात वनस्पतीही आपल्यावर काही प्रमाणात अवलंबून असतात. योग्य निगा राखली गेली तरच त्यांना फुले-फळे येतात. निसर्गात अशा अनेक अन्नसाखळ्या आहेत. त्यांचा एकमेकांशी परस्परसंबंध आहे. मानवी हस्तक्षेपामुळे त्यातील एखादी जरी अन्नसाखळी तुटली तरी निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ती पूर्ववत करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. वनस्पतींचे वेगवेगळे भाग जून होऊन गळून पडतात. त्यात सुकलेली पाने, फुले, फांद्या आदी घटक असतात. आपण तो ‘कचरा’ पालापाचोळा कचरा समजून स्वच्छ करतो. बाजूला नेऊन एक तर जाळून टाकतो किंवा त्याचे खत बनवितो. जंगलात ही प्रक्रिया नैसर्गिकपणे झाडाखालीच होत असते. शहरात आपण तसे होऊ देत नाही. त्यामुळे जमीन समृद्ध होण्याची प्रक्रिया खंडित होते. ज्याप्रमाणे वनस्पती आपली गरज भागवितात, त्याप्रमाणे ती वेगवेगळ्या कीटकांचीही गरज भागवितात. साधारणत: एका वृक्ष प्रजातीवर तीनशे प्रकारचे कीटक आढळतात. त्यापैकी दोन ते पाच टक्के किडी वनस्पतींच्या पानावर जगतात. उर्वरित किडी मांसाहारी असतात. ते शाकाहारी किडी, त्यांनी घातलेली अंडी व अळ्यांवर आपली उपजीविका करतात.
काही कीटक वनस्पतींच्या फुलांचे परागीकरण करण्यास मदत करणारे असतात. उदा. मधमाशा आणि फुलपाखरे.
आपल्या कुंडीतील झाडय़ांच्या मातीवर वनस्पतींची वाळलेली पाने आणि आच्छादन टाकले तर कालांतराने ते कुजून त्यापासून खत तयार होते. शिवाय आच्छादनामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. मातीतील जिवाणूंचे त्यामुळे संरक्षण होते. आपण घरातील कुंडीमध्ये निर्माल्य, भाजीची देठे, इ. टाकू शकतो. कधी कधी कुंडीतील झाडांवर चिलटे येतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे टाकलेले अतिरिक्त पाणी. त्यामुळे कुंडीत आवश्यक तितकेच पाणी टाकावे. जास्त पाणी टाकले म्हणजे झाड लवकर वाढणार नाही. उलट अतिरिक्त पाण्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यांचे आरोग्य बिघडू शकते. कुंडीतील मातीवरील पानांच्या आच्छादनावर थोडे हळदीचे पाणी शिंपडल्यास चिलटय़ांचे प्रमाण कमी होते.
झाडांच्या मातीमध्ये ओलावा टिकावा म्हणून त्यात योग्य प्रमाणात सेंद्रीय खते (शेण खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत) टाकणे आवश्यक आहे. मातीमधील पाण्याचा निचरा योग्य वेळेत न झाल्यास मुळांना मातीमधील अन्नद्रव्यांचे शोषण करता येत नाही. तसेच जीव-जिवाणूंच्या योग्य वाढीसाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. जास्त पाणी टाकले तर तापमान कमी होते. या जिवाणूंच्या पोषणासाठी अधूनमधून कुंडीत ताक टाकावे. जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी मटण, मासे धुतलेले पाणी कुंडीत टाकावे. डाळ-तांदूळ धुतलेले पाणीही उत्तम. त्यामुळे जिवाणूंचे चांगले पोषण होते.
जीवामृत
झाडांच्या चांगल्या वाढीसाठी ज्यांना शक्य आहे, त्यांनी पुढील प्रयोग करून पाहावा. गाईच्या शेणात दोन चमचे गाईचे तूप मिसळावे. त्यानंतर त्यात चार चमचे मध घालून त्याचे मिश्रण करावे. बादलीभर पाण्यात त्यातील निम्मे मिश्रण व थोडे गोमूत्र टाकून झाडांना घालावे. त्याला जीवामृत असे म्हणतात.
ज्यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, त्यांनी आपल्या गच्चीत अथवा अंगणात विसर्जन करून ते पाणी नंतर झाडांना घालावे.
उपरोक्त दोन्ही प्रकारांत मध आणि तूप हे दोन घटक असे आहेत, ज्यांचा मातीशी संपर्क आला की अनेक प्रकारच्या उपयुक्त जिवाणूंची निर्मिती होते. गाईच्या शेणात अनेक प्रकारचे उपयुक्त जिवाणू असतात. मध व तुपाने त्यांचे संवर्धन होते.
त्याचप्रमाणे उरलेली मोड आलेली कडधान्ये मिक्सरमध्ये बारीक करावेत. ते पाण्यात मिसळून झाडांवर फवारल्यास त्यांचे चांगले पोषण होते. शक्यतो झाडांना रासायनिक नत्र देऊ नयेत.
अतिरिक्त नत्रामुळे झाडांची वाढ लुसलशीत व फोफशी होते. तसेच त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे त्यांना कीड व रोगांचा लगेच प्रादुर्भाव होतो.
कडू रसाचा फवारा
झाडांवर येणाऱ्या किडी दोन प्रकाराने झाडांचे नुकसान करतात. एक तर या किडी झाडांचे रस शोषून घेतात. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. कळ्या, फुले, फळे गळून जातात आणि दुसरे म्हणजे त्या विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात.
घरातील वा आवारातील वनस्पतींवरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्याचे सर्वात सोपे औषध म्हणजे त्यांच्यावर कडुनिंब अथवा तत्सम कडू गुणधर्माच्या वनस्पतीचा रस फवारावा. कारण बहुतेक सर्व कीटक वनस्पतीच्या वासाने आकर्षित होत असतात. वनस्पतींचा तो गंध आपल्याला येत नाही. कीटकांना येतो. कडू गंध त्यांना आवडत नाही. त्यामुळे ते त्यापासून लांब पळतात.
Published on: 04 April 2022, 09:56 IST