पाने खाणाऱ्या अळीचा पतंग(Spodoptera litura)
या सर्वातून एक गोष्ट लक्ष्यात आली शेतीवर अवाढव्य अविवेकी खर्च न करता गरजेपुरता व योग्य ठिकाणी खर्च करणे. बऱ्याच गोष्टी दुर्दैवाने आपल्या हातात नसल्याने कमीत कमी खर्चात आटोपशीर गुंतवणूक शेतीमध्ये करणेच योग्य ठरेल. आता आपला खर्च कोणकोणत्या गोष्टीमधून वाढतो हे पाहुया.तर खर्च वाढवणारी पहिली गोष्ट म्हणजे किडीचा पिकामध्ये शिरकाव त्यासाठी लागणारी कीटकनाशके, गरज नसताना वाढ संप्रेरकांची फवारणी आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाने सांगितलेले उपाय करून पाहणे.
तर आज आपण कीटकनाशक फवारणीचा खर्च कामगंध सापळ्यांचा (Pheromone Traps)वापर करून कसा कमी करू शकतो. हे पाहुयात कामगंध सापळे हे पीक संरक्षणासाठी वरदान आहेत असं म्हंटल तरी ते वावगे ठरणार नाही. मागील ४०-५० वर्षात कीटकनाशक फवारणी शिवाय शेती पूर्णच होऊ नाही. असं समीकरण तयार झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून त्वचारोग, कॅन्सर, ब्रेन ट्युमर,जन्मजात अपंगत्व असा भयंकर उत्पात उभा समोर ठाकला आहे. मग हे थांबवन्यासाठी व पुढील पिढीस उत्तम आरोग्य देऊन सेंद्रिय-शाश्वत शेती करण्यासाठी प्रोत्साहित करायचे असेल तर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून त्यामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर अनिवार्य आहे.
यामध्ये मुख्य दोन भाग असतात ल्युर व सापळा. ल्युर विशिष्ट किडीस आकर्षित करते व सापळा आकर्षित झालेल्या किडीच्या पतंगांना अडकवून ठेवण्याचे काम करतो. फेरोमोन हे नैसर्गिक पदार्थ आहेत जे कीटकांच्या ओटीपोटात विशेष ग्रंथींद्वारे समान जातीच्या विरुद्धलिंगी कीटकांना आकर्षित करतात आणि अनेक प्रजातींच्या कीटकांचे फेरोमोन एकात्मिक कीड व्यवस्थापनांमध्ये वापरण्यासाठी प्लास्टिक किंवा लाकडी ब्लॉकमध्ये कृत्रिमरित्या समाविष्ट केले जातात. त्याला ल्युर(प्रलोभन) असे म्हणतात. सापळ्यांचा उपयोग आपण शेतातील किडींचे प्रमाण पाहण्यासाठी व किडीचे नियंत्रण करण्यासाठी अश्या दोन्ही पद्धतीने करू शकतो. कीड सर्वेक्षणासाठी १०-१२ सापळे(Monitoring) व मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी १५-२५ सापळे(Mass trapping).पहिली गोष्ट म्हणजे सापळे लावल्यानंतर ते आपल्या पिकातील परिस्थितीचा आरसा बनतात.
ज्या पद्धतीने आपण आपल्या शिवाराची सोया लावली आहे,त्याचा संपूर्ण लेखाजोखा सापळ्यामध्ये सापडणाऱ्या कीटकांच्या माध्यमातून दिसून येतो. समजा तुमि एकरात १० सापळे लावले आणि येत्या काही दिवसात त्यामध्ये सरासरी २-३ पतंग सापडले तर ज्या दिवसापासून पतंग सापडण्यास सुरवात झाली त्या दिवसापासून आपल्या शेतामध्ये किडीचा शिरकाव झाला, असं सापळे आपल्याला सांगतात. दिवसेंदिवस सापळ्यात सापडणाऱ्या पतंगाची संख्या वाढली तर शेतामध्ये किडींचे प्रमाण वाढत चालले आहे असा संदेश सापळे देतात. त्यानुसार आपण फवारणीची पुढील दिशा ठरवू शकतो. यामुळे आपला विनाकारण होणार फवारणी खर्च आटोक्यात होतो. सर्वेक्षणाच्या माध्यमातून कीड निंयत्रण पहिल्यापासून सुरु होते. कीड आर्थिक नुकसान पातळीच्यावर जात नाही.
रसायनांचा वापर न झाल्यामुळे पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन होते.मुख्य म्हणजे आपल्या एका फवारणीच्या खर्चात हे आपले खरेदी करू शकतो. हि गोष्ट प्रत्येक पिकासाठी सारखी लागू होते त्यामुळे आपल्या पिकानुसार किडींची ओळख करून घेऊन त्यासाठी लागणारा सापळा आपल्या शेतात पेरणी उगवून आल्यानंतर लगेच लावून घ्यावा. आपले पीक कीड व रोगमुक्त ठेवावे. आपला खर्च कसा कमीत कमी होईल यावर नियोजन करावे.
- टीम आय पी एम स्कुल
Published on: 23 October 2021, 08:11 IST