Agripedia

पेस्टिसाईडच्या दुकानात औषध घेण्यासाठी जातांना

Updated on 21 July, 2022 3:16 PM IST

पेस्टिसाईडच्या दुकानात औषध घेण्यासाठी जातांना तुम्ही नेमके कोणते औषध घ्यायचे हे ठरवून जाता का? जर तुम्ही नेमके ठरवून दुकानात गेले नाहीत तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता 90 टक्के पेक्षा जास्त आहे.10 पैकी 8 लोक तरी पेस्टिसाईड दुकानदारालाच पिकाच्या किडरोगातला ‘गुरु’ मानतात. पिकावर पडलेली किड रोग दुकानदाराला सांगतात. त्यावरहुकुम दुकानदार कुठल्यातरी नवीन कंपनीचं ‘लई भारी‘ औषध देतो. चांगला रिझल्ट मिळण्यासाठी त्यात दुसरं औषध मिक्स करायला सांगतो. शेतकरी ते घेऊन मळ्यात येतो आणि त्याची फवारणी करतो.हा आपल्या सगळ्यांचा नेहमीचाच अनुभव आहे.एक्सपायरी डेटमागील आठवड्यात माझ्या गावात एका मित्राच्या दुकानात ‘तणनाशक’ घेण्यासाठी गेलो. त्याच्याकडे मागतांना ठराविक कंपनीच्या ‘ब्रॅण्ड‘नावानेच मागितले. ते त्याच्याकडे शिल्लक नव्हते. म्हणून त्याने तोच घटक असलेले दुसऱ्या कंपनीचे औषध दिले. 

‘हल्ली तणनाशकांचा चांगला रिझल्ट येत नाही. तर चांगला ‘पीएच’ तपासून मगच फवारणी कर असाही सल्ला त्याने दिला. पीएच तपासायचे साधन माझ्याकडे काही नव्हते . तर त्याने अजून एक बाटली पुढे करीत त्यातील औषध घेण्यास सुचविले. किती प्रमाणात घ्यायचे तेही त्याने सांगितले. त्याने बिल दिले नाही. मीही मग मित्र असल्याने बिलाचा आग्रह धरला नाही.घरी आल्यावर दोन्ही औषधांच्या बाटल्या नीट पाहिल्या तेव्हा त्यातील तणनाशकाच्या बाटलीवरील ‘एक्स्पायरी डेट’ शेवटच्या दोन दिवसांत संपणार होती. मिक्स करायच्या औषधाच्या बाटलीवरील ‘निर्मिती तारीख आणि अंतिम तारीख’ मात्र पर्मनन्ट मार्करचा वापर करुन पूर्ण खोडलेली होती. तत्काळ दुकानदार मित्राला फोन करुन विचारले तर, तणनाशक जितके जुने तितके चांगले असते. असं नवं ज्ञान त्याने पाजळले. तर मिक्स करायच्या औषधाच्या बाटल्यांचा सेट पावसाने भिजल्यामुळे त्यावरील तारीख आणि किंमती पुसून गेल्याचे त्याने सांगितले. पण त्या खोडून का टाकल्या? आणि नेमकी तारीख आणि किमतीची जागाच कशी पुसली गेली? यावर काही त्याने उत्तर दिले नाही. ‘मी माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकांना हे आधीच सांगतो‘ अशी वरुन मखलाशीही त्याने केली.

हा खेळ जास्त मार्जिनचादरम्यान आमच्या भागातील प्रयोगशील शेतकरी भास्कर भाऊ कांबळे यांची भेट झाली. त्यांना हा अनुभव सांगितला. ‘हा सगळा जास्त मार्जिनचा खेळ आहे. ज्या प्रॉडक्ट मध्ये जास्त मार्जिन (नफा) मिळतो.तेच बहुतांश दुकानदार ग्राहकांच्या माथी मारतात.ते उत्पादन ‘ओरिजीनल‘ नसते. ते मूळ उत्पादनाची नक्कल असते किंवा पूर्ण बनावट तरी असते.That product is not 'original'. It is either an imitation of the original product or a complete fake.त्या शिवाय एक्स्पायरी डेट संपलेला माल बिनधास्तपणे विकला जातो. फारशी चौकशी न करणाऱ्या शेतकऱ्याची सहज दिशाभूल केली जाते. चौकशी करणाऱ्याला काहीही थापा दिल्या जातात. अशी विक्री करणारेही त्याच भागातील शेतकऱ्याचेच सुपूत्र असतात हाही एक दुर्दैवाचा भाग!माझं गाव आणि परिसरातील 84 आदिवासी खेड्यांचा विचार केला तर माझ्या गावातील औषध दुकानातून कोट्यवधींची उलाढाल होते. त्यातील बहुतांश माल हा दुय्यम दर्जाचा व साधारण दर्जाच्या कंपन्यांचा असतो. भांडवलाच्या चणचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या माथी उधारीवर हा असाच माल मारला जातो. हे नित्यनेमाने दिसणारे वास्तव चित्र आहे.

ही एकाकी लढाईनैसर्गिक आपत्तींशी झुंज नेहमीच सुरु असतांना पुढे काय बाजारभाव मिळेल याचीही शाश्‍वती नसते. त्यातच बनावट औषधांमुळे तर खूप मोठे आर्थिक नुकसान सतत होत असते. याबाबतीत गाफील शेतकऱ्याला मात्र खूप मोठा फटका बसतो. अशावेळी व्यवस्था-कृषि विभागाची यंत्रणाही त्याला साथ देत नाहीत. बहुतांशवेळा कंपन्या आणि यंत्रणा यांचे परस्परांशी लागेबांधे असतात. या संदर्भात कोणतेही ठोस कायदे शेतकऱ्यांचे संरक्षण करीत नाहीत. कारण तसे ते अस्तित्वातही नाहीत. त्यापेक्षा आधीच जितके सावध राहता येईल तितके सावध रहावे. कारण तेच आपल्या हातात आहे.अभ्यास गरजेचाकृषितज्ज्ञ मंगेश भास्कर म्हणतात, जे पिक आपण करतो त्याचे एखादे चांगले पुस्तक आपल्या संग्रही हवे व कोणतीही अडचण आली तर स्वत: किंवा घरातील शिकलेल्या व्यक्तींकडून गुगल सर्च करणे हे उपयुक्त ठरते. प्रत्येकाकडे असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारची अद्ययावत माहिती मिळवू शकतो. चांगल्या अभ्यासू शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप वरही एखाद्या प्रॉडक्ट बद्दल केलेली चर्चा उपयुक्त ठरु शकते.

औषधे खरेदी करण्यापुर्वी पुढील काही गोष्टी नीट लक्षात ठेवाव्यात.1) पिकाचे नीट निरिक्षण करुन किड, रोग आणि कमतरता ओळखा व त्यावरील औषध कुटुंबिय व मित्रमंडळींबरोबर चर्चा करुन निश्‍चित करा.2) नेमके कोणते औषध घ्यायचे आहे ते आधी ठरवून मगच दुकानात जावे व तेच औषध घ्यावे.3) औषध घेतांना बाटली नीट पाहून घ्यावी. त्यावरील ब्रॅण्ड नेम-शास्त्रीय नाव- मॅन्युफक्चुअरींग डेट, एक्स्पायरी डेट हे तपासावे.4) पक्की पावतीच घ्यावी. त्यावर वरील माहिती नमद असल्याचे पाहून ‌घ्यावे.5) उधारीमध्ये दुकानदार देईल ते औषध घ्यावे लागते व तो जे लावील ते बिल घ्यावे लागते. शक्यतो रोखीतच औषध घ्यावे. औषधांसाठी भांडवलाची तरतूद करुन ठेवणे शहाणपणाचे ठरते. एकवेळ कर्ज काढून औषधे घेणे परवडते. पण उधारीत औषध घेणे परवडत नाही असा अनेक जाणकार शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

 

- ज्ञानेश उगले

English Summary: Pesticides, Margins and Farmers Very important article
Published on: 21 July 2022, 03:16 IST