ताजी फळे व भाजीपाल्याचा आहारात समावेश होतो. म्हणून त्यावरील कीडनाशक अंश आरोग्यास कमी-अधिक प्रमाणात अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे अन्नघटकातील कीडनाशक अवशेषांच्या कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) ठरविलेल्या आहेत. सुरक्षित अन्नासाठी किडनाशक वापरानंतर कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचून काढणीसाठीचे प्रतिक्षा कालावधी काही किटकनाशकांसाठी पुढे दिलेले आहेत. प्रतिक्षा कालावधी हा हवामानानुसार उन्हाळ्यात पावसाळा व हिवाळ्याच्या तुलनेने कमी असतो. पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर रासायनिक कीडनाशकाची आवश्यकतेनुसार अत्यंत माफक वापर करावा. त्यामुळे शेतमालावरील कीडनाशक अवशेष कमाल अवशेष मर्यादेपेक्षा कमी राहील व देशातून होणाऱ्या कृषिमालाच्या निर्यातीतील प्रमुख अडसर दूर होऊन निर्यातीत वाढ होईल. यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करणे हितावह होईल.
१) अधिकृत (केंद्रिय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती) शिफारशीनुसार किडनाशकांचा वापर करावा. शिफारस केलेला काढणीपूर्व कालावधी उलटल्यावरच पिकाची काढणी करावी. कीडनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम्स काळजीपूर्वक वाचावेत.
२) कीडनाशक फवारणीपूर्वी किडीची संख्या / आर्थिक नुकसान पातळी विचारात घेऊन आवश्यक असेल तरच फवारणी करावी. रासायनिक किडनाशकांचा वापर पिकांच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात करावा. पीक काढणीच्या काळात वनस्पतिजन्य किडनाशके तथा जैविक घटकांचा उपयोग करून एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रानुसार पीक संरक्षण करावे.
३) फळे व भाजीपाला काढणीयोग्य झाल्यावर म्हणजे काढणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर रासायनिक किडनाशकाची फवारणी बंद करावी त्याऐवजी जैविक कीडनाशके वापरावीत.
४) मानवी आरोग्यास व पर्यावरणास कमी हानिकारक असलेली, तसेच कमी मात्रामध्ये अधिक परिणामकारक कीड नियंत्रण करणारी निवडक किडनाशके वापरावीत. वापरावर बंदी असलेली किडनाशके वापरू नयेत.
५) निर्यातीपूर्वी शेतमालाची कीडनाशक अंश चाचणी करून अंश नसल्यास खात्री करावी व मगच निर्यात करावी.
६) एकाच किडनाशकाचा वापर न करता वेगवेगळी कीडनाशके वापरावीत.
७) फळे व भाजीपाला १ ते २% मिठाचे किंवा द्रवरूप साबणाचे सौम्य द्रावणात चांगले धुवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यास किडनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होते. म्हणून फळे व भाजीपाला वापरण्यापूर्वी चांगली धुऊन घ्यावीत व गरजेनुसार शिजवून खावीत.
८) किडनाशकांच्या फवारणीनंतर पाळावयाचा प्रतीक्षा कालावधी संबंधित कीटकनाशकांच्या वेष्ठणावर तथा माहिती पत्रिकेवर नमुद केलेले असतात. त्याचे पालन करावे.
९) पावसाळ्यात पावसाने पीक धुतले जात असल्याने त्यासाठी हिवाळा व उन्हाळ्या पेक्षा प्रतीक्षा कालावधी कमी असतो.
स्रोत:-महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी
संकलन - IPM SCHOOL
Published on: 11 October 2021, 06:43 IST