वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी ऑगस्ट महिन्यात क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील विविध ठिकाणी कापूस व सोयाबीन पिकाच्या प्रक्षेत्रांस भेट दिली असता विविध किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कपाशीवर प्रामुख्याने माव्याचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून आला असुन काही ठिकाणी तुडतुडे व गुलाबी बोंडअळीच्या डोमकळया आढळून आल्या.
सध्या हवामान ढगाळ असल्याने व कपाशीचे पिक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहेत. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने चक्रीभुंगा, कोंडीका तसेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्या अनुषंगाने विद्यापीठातील किटकशास्त्रज्ञांनी पुढीलप्रमाणे कापूस व सोयाबीन पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
कापूस या पिकांत सद्यस्थितीत पुढील प्रमाणे व्यवस्थापन करावे
कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे. गुलाबी बोंडअळीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत. प्रती सापळा सरासरी 8 ते 10 पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळुन आल्यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी, व योग्य किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठया प्रमाणात गोळा करुन नष्ट करण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत. उपलब्धते प्रमाणे कपाशीत एकरी 3 ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजूस लावावेत. तसेच इंग्रजी T आकाराचे पक्षीथांबे हेक्टरी 40 या प्रमाणात लावावेत. कापूस पिकामध्ये फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी निळे चिकट सापळे तर पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.
कापुस व सोयाबीनवरील किड व्यवस्थापनाकरिता फवारणीसाठी किटकनाशके
प्रादुर्भाव |
किटकनाशके |
प्रती दहा लिटर पाण्यात किटकनाशकाचे वापराचे प्रमाण |
कापूस |
||
गुलाबी बोंडअळी |
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा |
20 मिली |
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा |
20 ग्रॅम |
|
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडासाहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी |
04 मिली |
|
मावा-तुडतुडे व इतर रस शोषक किडी |
ॲसीफेट 50 टक्के + इमिडाक्लोप्रीड 1.8 एस.पी. |
20 मिली |
फ्लोनीकॅमीड 50 डब्ल्यु जी |
04 ग्रॅम |
|
सोयाबीन |
||
चक्रीभुंगा, कोंडीका अळी, पाने खाणारी अळी |
क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 एस सी. |
04 मिली |
फ्लुबेंडामाईड 39.35 एस. सी. |
04 मिली |
|
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडासाहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी |
04 मिली |
* वरील किटकनाशकाचे प्रमाण हे साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.
कापूस व सोयाबीन पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे आदींनी केले आहे.
Published on: 25 August 2019, 07:51 IST