Agripedia

पिनवर्म (टुटा अबसोलुटा) डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत जास्त प्रादुर्भाव होतो.

Updated on 13 January, 2022 1:56 PM IST

पिनवर्म (टुटा अबसोलुटा) डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत जास्त प्रादुर्भाव होतो. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे ४०-१०० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकाच्या पाने, फळे आणि खोडावर आढळून येतो. किडीची अळी प्रथम पानांच्या दोन्ही पापुद्रांमधील हरितद्रव्य खाते. पानांवर वेडेवाकडे, पोकळ पांढरट पापुद्रे तयार होतात. पाने फाटतात, वाळतात व गळून पडतात. नंतर अळी कोवळे शेंडे, खोड, फळे पोखरून खायला सुरवात करते. हिरव्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीमध्ये अळी छिद्र करून खाते. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होते.

एकात्मिक व्यवस्थापन

पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्‍लोप्रिड ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवावीत.

पानांवर किडीचा प्रादुर्भाव दिसताच, ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे किडीच्या अवस्थांसह गोळा करून नष्ट करावीत.शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत.काळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.

शेतात परोपजीवी मित्रकिटकांचे (ट्रायकोग्रामाॲची, नेसिडोकोरस, नेबीस, मॅक्रोलोफस, नेक्रीमस) संवर्धन करावे.

बॅसिलस/मेटारायझीअम/बिव्हेरिया या जैविक कीडनाशकांची २ ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.

किडीची कोषावस्था जमिनीवर आणि मल्चिंग पेपरवर आढळून येते. यासाठी जमिनीवर, मल्चिंग पेपरवर मेटारायझीअमची फवारणी करावी. कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्यांचे प्रमाण जास्त आढळल्यास, झाडाच्या बुंध्याजवळ रिंग/स्पॉट पद्धतीने फिप्रोनिल १ मि.लि. किंवा क्‍लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटरप्रमाणे आळवणी करावी.

आवश्यकतेनुसार, रासायनिक कीटकनाशक 

क्‍लोरअँट्रॅनिलीप्रोल ०.३ मिलि. किंवा इंडोक्झाकार्ब ०.७५ मि.लि. किंवा स्पिनोसॅड ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून-पालट करावी कारण अळी कोवळे शेंडे, खोड, फळे पोखरून खायला सुरवात करते. हिरव्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीमध्ये अळी छिद्र करून खाते. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होते.

English Summary: Pest insects management in tomato crop
Published on: 13 January 2022, 01:56 IST