डॉ. स्वाती गुर्वे, डॉ. महेश बाबर, डॉ. पराग तुरखडे
गहू व भात पिकानंतर मका हे जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावरील तृणधान्य पिक आहे. मका हे पिक उष्ण, समशीतोष्ण व शित अशा हवामानाशी समरस होणारे पीक असून २५ ते ३०० तापमानात वर्षभर घेता येणारे पीक आहे. देशाचा विचार केला असता भारतात मका पिकाखाली एकूण ९८.६५ लाख हे क्षेत्र असून ३१५.१० लाख टन उत्पादन व एकुण ३२०० किलो प्रति हेक्टर उत्पादकता आहे. महाराष्ट्र राज्यात मका हे पीक प्रामुख्याने नाशिक, धुळे, कोल्हापुर, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, नंदुरबार आणि सोलापूर या जिल्हयात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मक्याचा वापर मुख्यत्वे अन्नधान्य, पशुखादय, पोल्ट्रीखादय तसेच इतर मुल्यवर्धित खादयपदार्थासाठी होतो. मका पिकामध्ये कार्बोदके तयार करण्याची जास्त क्षमता असल्याने इतर तृणधान्यांपेक्षा उत्पादन क्षमता जास्त आहे. सदर पिकामध्ये ६०.६८ टक्के स्टार्च, ७.१५ टक्के प्रथिने, ४.५ टक्के स्निग्ध पदार्थ, ६ टक्के साखर व २.५ टक्के क्रुड फायबर असून इतरही उपयोगामुळे महाराष्ट्र राज्यात मका पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र राज्यात मक्याखाली एकुन १२.०२ लाख हे क्षेत्र असून ३५.८८ लाख टन उत्पादन व २९८३ किलो प्रति हेक्टर उत्पादकता आहे. मका पिकाच्या बहुगुणी उपयोगामुळे या पिकाला तृणधान्यांची राणी आणि चारा पिकांचा राजा असे संबोधले जाते.
मका पिकाचे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग होय. पिकास उगवणीपासून काढणीपर्यंत प्रादुर्भाव करणाऱ्या निरनिराळ्या किडी म्हणजे अमेरिकन लष्करी अळी, खोडकिड, कणसे पोखरणारी अळी, गुलाबी अळी, पाने गुंडाळणारी अळी, केसाळ अळी, करडे सोंडे आणि मावा होय. मका पिकावरील महत्वाच्या रोगांचा विचार केला तर टर्सिकम व मेडिस करपा, फुलोऱ्या पूर्वीचा खोड कुजव्या व तांबेरा असे विविध रोग आढळुन येतात. मक्यावर येणाऱ्या विविध किडींपैकी अमेरिकन लष्करी अळी ही एक महत्वाची किड असून सदर किडीमुळे मका पिकाचे ५ ते ९० टक्क्यांपर्यंत नुकसान होवू शकते म्हणून या किडीचे वेळीच एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
अमेरिकन लष्करी अळी :
महाराष्ट्रात सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वप्रथम सोलापुर मधिल तांदुळवाडी या ठिकाणी या किडीची नोंद झाली. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर विविध पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला. हि कीड पिकांसाठी जास्त नुकसानकारक आहे. कारण किडीच्या मादीची प्रजनन क्षमता खुप जास्त आहे. एक मादी पतंग एका वेळी सरासरी १५०० ते २००० अंडी देवू शकते. ही कीड बहुभक्षी व खादाड असून ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर आपली उपजिविका साधु शकते. किडीचे पतंग एका रात्रीत १०० ते २०० कि.मी. पर्यंत प्रवास करु शकतात. नावाप्रमाणे ही कीड पिकावर लष्कराने म्हणजे झुंडीने आक्रमण करते. तसेच ही कीड एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर स्थलांतर झोपाळयाद्वारे करते. एका वर्षात अखंड खाद्य मिळाल्यास ही कीड ३ ते ४ पिढ्या विविध वनस्पतींवर पूर्ण करु शकतात. या किडीची उन्हाळयात ३० दिवसात एक पिढी पुर्ण होते. तर हिवाळयात हा कालावधी दोन महिन्यांपर्यत आढळुन येतो. म्हणजे ही कीड वातावरणानुसार व ऋतुनुसार जीवनचक्रात बदल करते. सदर किडीच्या पतंगांची संख्या एप्रिल ते डिसेंबर महिन्यांपर्यत विपूल प्रमाणात असते.
अमेरिकन लष्करी अळीची ओळख व जीवनक्रम
सदर किडीच्या योग्य व्यवस्थापनाकरीता तिचा जीवनक्रम समजून घेणे गरजेचे आहे. या अळीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार विविध अवस्थांमधुन पुर्ण होतो.
अंडी : एक मादी तिच्या संपूर्ण जीवनकाळात सुमारे १५०० ते २००० अंडी १०० ते २०० च्या समुहात कोवळ्या पानांच्या खालच्या किंवा वरच्या बाजुला पुंजक्यात देत असून, राखाडी रंगाच्या मऊ केसांनी झाकलेली असतात. घुमटाच्या आकाराची पांढरी अर्धगोलाकार अंडी चार ते पाच दिवसात उबवतात.
अळी : सदर किडीची अळी अवस्था पिकाला प्रत्यक्ष नुकसान करणारी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. अळी हिरवट तपकिरी रंगाची असून वेगवेगळ्या सहा अवस्थांमधुन जाते. अळयांची त्वचा गुळगुळीत असून पुर्ण वाढ झालेल्या अळीच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचा उलटा वाय (2) आकाराचे चिन्ह दिसते व समोरील आठव्या व मागुन दुसऱ्या शरीर वलयावर हलक्या रंगाचे चार चौकोनी ठीपके दिसतात. या महत्वाच्या बाबीवरुन या प्रजातीची ओळख होते. सामान्य लष्करी अळीचे शरीर तपकिरी असले तरी बहुतांश अळीची पाठ हिरवट रंगाची असते व अशा अळीच्या पाठीवर ठीपके गडद रंगाऐवजी हलक्या रंगाचे असतात. उन्हाळयात अळी अवस्था १४ दिवसांची व हिवाळयात ३० दिवसापर्यंत असू शकते. पुर्ण वाढ झालेली अळी ३.१ ते ३.८ से.मी. लांब असते. दिवसा अळी लपून बसते व रात्रीच्या वेळी प्रादुर्भाव घडवून आणते.
कोष : किडीची तृतीय अवस्था म्हणजे कोषावस्था होय. कोषावस्था म्हणजे सुप्तावस्था असून कोष जमिनीत २ ते ८ सें.मी. खोलीवर असतात. कोष लालसर तपकिरी रंगाचे असतात. कोषावस्था उन्हाळयात ८ ते ९ दिवसांची व हिवाळ्यात ३० दिवसापर्यंत असते.
प्रौढ : प्रौढ अवस्था ही निशाचर असून उष्ण व दमट वातावरणात जास्त सक्रिय असते. नर पतंगाच्या पंखाच्या पुढच्या बाजूस पांढरे ठिपके असतात व मादी पतंगाचे पंख राखाडी तपकिरी रंगाचे असतात. प्रौढांचे आयुष्य १०-१२ दिवसांपर्यंत असून त्या कालावधीत मिलन करुन मादी अंडी देवून दुसरी पिढी चालु होते.
किडीचे पर्यायी खाद्य वनस्पती : ही कीड बहुभक्षी खादाड असून ८० पेक्षा जास्त वनस्पतीवर उपजीवीका साधते. तृणधान्य वर्गिय पिके या किडीचे सर्वात आवडते खादय आहे. ही किड सर्वात जास्त मका, मधुमका, ज्वारी, हराळी (बरमुडा गवत), गवत वर्गीय तणे जसे डीजीटेरीया (कॅबग्रास), सिंगाडा, ऊस, कापूस, रानमेथी, ओट, बाजरी, वाटाणा, धान, भात, शुगरबीट, सुदान ग्रास, सोयबीन, तंबाखु, गहू, भुईमुंग, चवळी आणि भाजीपाला वर्गीय पिकांवर प्रादुर्भाव करते.
किडीच्या नुकसानीचा प्रकार : या नुकसानीचा प्रकार म्हणजे सर्वप्रथम अंडयातुन बाहेर आलेल्या अळया पानांचा पापुद्रा खातात. त्यामुळे पानांना पांढरे चट्टे पडतात. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळया पानांना छिद्रे करतात. कालांतराने या अळया पोंग्यात जावून छिद्रे करतात. जुनी पाने पर्णहीन होवून पानांच्या शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते. पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते. मध्यम पोंगे अवस्था कमी तर उशीरा पोंगे अवस्था अळीला जास्त बळी पडते. कालांतराने अळी कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करुन दाणे खाते.
अमेरीकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन : किडग्रस्त पिकाच्या शेतात खोल नांगरणी करावी. तुर, मुग व उडीद ही कडधान्य आंतरपीक म्हणून घ्यावीत. इंग्रजी (T) आकाराचे एकरी १० पक्षी थांबे लावावे तर पतंग अडकण्यासाठी हेक्टरी १५ कामगंध सापळे लावावे. पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे वापरावेत. मक्याच्या पानावर दिसणारे अंडीपुंज व अळया हाताने वेचून रॉकेल मिश्रीत पाण्यामध्ये टाकुन नष्ट कराव्यात. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. त्यामुळे झाडाचा वाढीचा भाग खाण्यापासून परावृत्त करता येईल व शेंडा तुटणार नाही. अंडयावर उपजीवीका करणाऱ्या ट्रायकोग्रामा परोपजीवी किटकाची हेक्टरी ५०,००० अंडी १० दिवसाच्या अंतराने शेतात ३ वेळा सोडावीत. तसेच टेलेनोमस रेमस या परोपजीवी किटकांची एकरी ५० हजार अंडी शेतात सोडावीत लवकर पक्व होणाऱ्या वाणाची निवड करुन लवकर पेरणी करावी व याचा गावपातळीवर अवलंब करावा. जेणेकरून किडीला सतत खादय उपलब्धता होणार नाही व किडीची साखळी तोडण्यास मदत होईल. किडीस प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. जैविक उपाययोजनामध्ये मेटारायझियम अॅनिसोपलीची ७५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे किडग्रस्त शेतात फवारणी करावी. तसेच नोमुरीया रीलाय या बुरशीजन्य किटकनाशकाची २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. अळीच्या वाढीच्या लवकरच्या अवस्थांमध्ये निमअर्क १५०० पी.पी.एम. किंवा निंबोळी अर्क ५ टक्के यांची ५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
नुकसानीचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असल्यास स्पीनेटोरम ११.७ एस. सी. ५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस.जी. ४-५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. नुकसान जास्त आढळल्यास क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५ एस. सी. ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारावे. सायनट्रीनीलीप्रोल १९.८% + थायमिथॉक्झाम १९.८% एफ.एस. ६ मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास पहिले १५-२० दिवस संरक्षण मिळते. अळीच्या शेवटच्या अवस्थेमध्ये किंवा दुसऱ्या फवारणीनंतर १० किलो भाताचा कोंडा व २ किलो गुळ, २ ते ३ लिटर पाण्यात २४ तास आंबवून वापरण्याच्या अर्धा तास अगोदर थायोडिकार्ब १०० ग्रॅम मिसळून हे विषारी आमिष पिकाच्या पोंग्यामध्ये टाकावे. पिकाच्या शेवटच्या काळात किटकनाशकांचा वापर हितकारक नसल्याने जैविक किटकनाशके म्हणजे मेटारायाझियम किंवा नोमोरीयाची फवारणी करावी. मका चारापिक म्हणून घेत असल्यास कुठल्याही रासायनिक किटकनाशकाची फवारणी शिफारस केलेली नाही म्हणून शक्यतो टाळावी.
खोडकीड : या किडीचे वैशिष्ट म्हणजे अळीच्या पाठीवर काळया ठिपक्यांचे पट्टे असून डोके गडद रंगाचे असते. नावाप्रमाणे या किडीचा नुकसानीचा प्रकार म्हणजे खोडाला आतुन पोखरने. किडीची अळीअवस्था नुकसानकारक आहे. पुर्ण वाढ झालेली अळी २.२ सें.मी. लांब धुरकट करडया रंगाची असून डोके काळे असते. मादी पतंग पानांच्या खालच्या बाजुला २ ते ३ रांगेत चपटया आकाराची ३०० अंडी देते. अंडी ५० ते १०० च्या समुहात असतात. अळी अवस्था १४ ते २८ दिवसांची असून त्यात ५ ते ६ वेळा कात टाकते. पुर्ण वाढ झालेली अळी खोडाला छिद्र पाडुन आत कोषात जाते. कोषातुन आठवड्याने प्रौढ बाहेर पडतो. अळी पानांना समान रेषेत छिद्र करुन खोडाच्या आतील भाग पोखरते. त्यामुळे पोंगा पुर्ण वाळतो. पिकाची रोपावस्था किडीला बळी पडणारी आहे. मका पिकाची उगवण झाल्यावर जवळपास चौथ्या आठवडयानंतर किडीचा प्रादुर्भाव सुरु होतो. सदर अळीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे १० टक्के झाडांच्या पानांवर गोल छिद्र किंवा ५ टक्के पोंगेमर आढळणे होय.
खोडकिडीचे एकात्मिक व्यवस्थापन : शेतातील काडीकचरा धसकटे स्वच्छ करावी कारण त्यामध्ये अळी सुप्तावस्थेत जाते. प्रादुर्भावग्रस्त शेतातील चारा हंगामापुर्वीच जनावरांना खावू घालावा. पोंगेमर दिसताच मक्याचे झाड उपटून जाळून नष्ट करावे. किडीच्या पतंगाला आकर्षित करुन मारण्यासाठी हेक्टरी २ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. मका पिकात ४ ओळी मका व १ ओळ चवळी असे आंतरपिक म्हणून लागवड केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. किडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्र किटकाची ८ ट्रायको कार्ड प्रति हेक्टर मका उगवणीनंतर ११ आणि २४ व्या दिवशी पानांखाली लावावेत. उगवणीनंतर १५ दिवसांनी निंबोळी अर्क ५% ची फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त दिसल्यास डायमिथोयेट ३० ई.सी. १-२ मिली १ लिटर पाण्यातुन फवारावे. अशाप्रकारे सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास मक्यावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होऊन रासायनिक किटकनाशकाची गरजेपुरती फवारणी करता येईल.
खोडमाशी : ही कीड घरमाशीसारखी पण आकाराने लहान असते. तिची लांबी ५ मि.मी असून रंग गडद असतो. अळी अवस्था फिक्कट पिवळया रंगाची असते. मादी माशी १५ ते २५ अंडी कोवळया पानांखाली किंवा खोडाच्या तळाशी घालते. अंडी उबवून अळी अवस्था ७ ते १० दिवसाची असते. पूर्ण वाढ झालेली अळी खोडात किंवा जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवडयाची असून कोषातून बाहेर पडलेली माशी ३-६ दिवस जगते. या किडीचा एकुण जीवनक्रम २१ ते २७ दिवसात पुर्ण होतो. मका पिकाची उगवण झाल्यानंतर चौथ्या आठवडयापर्यंत या किडीचा होतो. सुरुवातीला अळी पिकाची कोवळी पालवी खाते व हळूहळू पोंग्यात शिरुन पोंगेमर होते व त्याचा दुर्गध येतो. प्रादुर्भावग्रस्त रोपांना बुंध्यापासुन नवीन फुट येते व किडीला बळी पडते. जुन्या झाडांमध्ये पाने खोडमाशीमुळे वेडीवाकडी होतात. सदर किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे १०% पोंगेमर होय. सदर किडीच्या व्यवस्थापनासाठी बियाण्याचे प्रमाण वाढवून प्रादुर्भावग्रस्त रोपे वेळीच उपटुन नष्ट करावीत. पेरणीपुर्वी थायमिथॉक्झाम १० ग्रॅम किंवा इमिडाक्लोपराईड १० ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. आर्थिक नुकसान पातळी गाठताच डायमिथोएट २० मिली. १० लि. पाण्यातून फवारणी करावी. पीक काढणीनंतर शेतातील अवशेष जाळून नष्ट करुन खोल नांगरट करावी. जेणेकरुन किडीची सुप्तावस्था नष्ट होईल, पिकाच्या उगवणीपासुन ५० दिवसांपर्यंत फिशमिल सापळे प्रति हेक्टरी १-२ प्रमाणात लावावेत. फिशमिल सापळ्यात मासळीच्या वासासारख्या रसायनाचा वापर केला जातो. या रसायनाकडे खोडमाशी आकर्षित होवून सापळयात अडकुन मरते.
कणसे पोखरणारी अळी : या किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था म्हणजे केसर अवस्था होय. या किडीचे पतंग मध्यम आकाराचे मळकट पिवळे करडया रंगाचे असतात. या किडीची अळी हिरव्या असून ३८ ते ५० मी.मी. लांब असते. अळया कणसातील दाण्यांवर उपजीविका साधतात. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. एक मादी सुमारे ३५० अंडी घालून अळीची पुर्ण वाढ कणसामध्ये १५ ते ३५ होते. मादीपतंग बहुदा कणसाच्या स्त्रिकेसरवर अंडी घालतात. अळया जमिनीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था हवामानानुसार १० ते २५ दिवसांची असते. सदर अळीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला लहान अळया उचलुन नष्ट कराव्या. पिकांचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे. जैविक किड व्यवस्थापनामध्ये ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी किडीची अंडी असलेले ८ कार्ड प्रति हेक्टरी लावावेत. एच.ए.एन.पी.व्ही. २५० एल.ई. प्रती हेक्टरी वापरावे. सुरवातीला निंबोळी अर्क ५ % उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारणी करावी. किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी घ्यावी. ५ मिली स्पिनेटोरम ११.७% एस.सी. प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अतराने दोन फवारण्या घ्याव्यात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस.जी. ५ ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रनिलिप्रोल १८. ५० एस.सी. ४ मिली प्रति १० लि. पाण्यात फवारावे.
गुलाबी अळी : पिकाच्या सर्वच अवस्थेत गुलाबी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही अळी गुलाबी रंगाची असून डोके तपकिरी रंगाचे असते. सुरुवातीला अळी पानांवर लांब निमुळते छिद्र पाडते. कणीस भरण्याच्या अवस्थेत कणसातील दाणे खाते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेत नेहमी स्वच्छ ठेवावे. पक्षी थांबे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे वापरावेत. पुर्ण वाळलेली सुरळी उपटुन नष्ट करावी. जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी किटकांचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टर लालावेत तसेच ५ टक्के निंबोळी अर्क व गरज असल्यास रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी
मावा : मावा ही एक रसशोषक किड असून पानाच्या खालच्या बाजूला राहुन पानातील रस शोषण करते. त्यामुळे पाने सुकतात पिवळी पडतात व कडा वाळून पानाचा द्रोन सारखा आकार होतो. माव्याच्या शरीरातून चिकट द्रव पानावर सोडला जातो. त्यामुळे काळी कॅप्नोडीयम बुरशी वाढून पाने काळी होतात. प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. एकंदरीत झाड पिवळे पडून सुकायला लागते. यामुळे उत्पन्नात घट येते. मावा किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिकारक्षम आणि सहनशील वाणांची निवड करावी. किडीला अनुकुल हवामान म्हणजे थंडी, प्रादुर्भावाची उच्च पातळी आणि पिकांची कोवळी अवस्था या एकत्र येणार नाही याची काळजी घ्यावी. मका पिकाभोवती चवळीची लागवड केल्यास बाहेरुन येणारा मावा त्यावर स्थिरावतो. नत्रयुक्त खताची मात्रा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. शेत व बांध नेहमी स्वच्छ ठेवावेत. पिकात पिवळे चिकट सापळे लावावेत. जैविक किटकनाशकामध्ये व्हर्टिसीलिअम लेकॅनी व मेटारायझियम अॅनिसोपलीची फवारणी ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून करावी. माव्याच्या नियंत्रणासाठी परभक्षी किटक म्हणजे क्रायसोपर्ला हेक्टरी ५०,००० अंडी आणि लेडी बर्ड बिटलच्या १५०० अळ्या शेतात सोडाव्यात. प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी पुढे गेल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. इमिडाक्लोपराईड ४ मिली किंवा थायमिथॉक्झाम १२.६०% + लॅबंडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेड. सी. ३ मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
मका पिकावरील रोग, करपा : मका पिकावर २ प्रकारचे करपा रोग येतात. यात टर्सिकम पर्ण करपा व मेडीस पर्ण करपा असे थंड व अधिक आर्द्रतायुक्त वातावरणात टर्सिकमपर्ण करपा जास्त प्रमाणात वाढतो. यामध्ये पिकाच्या पानांवर सुरुवातीला लांब अंडाकृती करडया, हिरवट रंगाचे डाग दिसतात. हे डाग हळुहळु पानांच्या शिरांपलीकडेपर्यंत वाढतात व एकत्र येऊन १५ ते २५ सें.मी. पर्यंत मोठ्या चिरा पडतात. या चिरांनी पानांचा मोठा भाग ग्रासला जावून नंतरच्या टप्प्यात कणसावरही राखाडीसर आवरण वाढायला लागते. मेडिस पर्ण करपा हा रोग उष्ण दमट व थंड हवामानात जास्त वाढतो. या रोगामध्ये सुरुवातीला पानांच्या शिरामध्ये लांबट तपकिरी किंवा गडद लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात व कालांतराने हे ठिपके एकत्र येवून मोठ्या चिरा तयार होतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक पद्धतीमध्ये सुरुवातीला ट्रायकोडर्मा बुरशी ५ ग्रॅम १ लि. पाण्यातून वापरु शकतो. रासायनिक उपाय योजनेमध्ये मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लि. पाण्यातून फवारणी करावी.
खोड कुजव्या रोग : सदर रोगामध्ये सुरूवातीला खोड रंगहीन होऊन खोडाची साल तपकिरी, आकसलेली व मऊ पडते. खोडावर बुरशीची वाढ होते. पाने अनैसर्गिक रंगाची होऊन त्यावरही बुरशीची वाढ होते. जमिनीलगत खोडास पीळ दिसून येतो. कालांतराने ओंबीवर काळे किंवा तपकिरी डाग, खपल्या आणि कणसांची कुज दिसुन येते. संपूर्ण झाडाची मर दिसून येते. अधिक उष्णता व आर्द्रता जास्त असल्यास सदर रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात दिसून येतो. हवामान परिस्थिती प्रमाणे लक्षणे आणि रोगाची गंभीरता बदलते.
या रोगाच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास फ्लुरोसेन्स वापरावे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे रोग प्रतिकारक्षम वाण वापरावे. ज्या शेतात सदर रोग येतो तिथे एकरी २८००० ते ३२००० रोपे राहतील व ७०४९० सें.मी. ओळीतील आणि ३०-५० सें.मी. रोपातील अंतर ठेवावे. खोड किडीलाही नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे हा रोग पसरविण्यास मदत होते. संक्रमित झाड आढळल्यास उपटुन जाळून नष्ट करावे. कणसे साठवण्याच्या काळात चांगले वाळवून म्हणजें त्यातील ओलावा १५% पेक्षाही कमी राहील असे वाळवून साठवावे. साखळी तोडण्यासाठी घेवडा किंवा सोयाबिनसारख्या शेंगवर्गीय पिकांसोबत केरपालट करावी. खोडांची निरोगी आणि मजबूत वाढ होण्यासाठी मक्यांच्या झाडांचा ताण कमी करावा. रासायनिक उपाययोजनांसाठी ब्लिचिंग पावडर १० किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीत दयावे. तसेच ७५ % कॅप्टन १२ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून जमिनीतून दयावे. पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण आल्यास फुलोऱ्यानंतरचा खोड कुजव्या रोग येतो. यामध्ये खोडाचा उभा छेद घेतल्यास आतील भाग गुलाबी जांभळा किंवा काळया रंगाचा दिसतो. याचा प्रादुर्भाव मुळे, पेरे व शेंडयावर होत असल्याने झाड वाळायला लागते. याच्या जैविक नियंत्रणासाठी १० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी १ किलो शेणखतात मिसळून १० दिवसांनी जमिनीतून द्यावे.
देठ कुजणे : या रोगामुळे झाडांचे देठ कुजण्यास सुरूवात होते. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी १५० ग्रॅम कॅप्टन १०० लिटर पाण्यात मिसळून मुळांना टाकणे गरजेचे आहे.
तांबेरा : या संक्रमण झालेल्या झाडांची वाढ खुटते, झाडे पिवळी पडतात व मर झाल्याची लक्षणे दिसतात. हिरवी पाने आणि बारीक चमकदार जांभळ्या रंगाची फुले येणारी झाडे पिकाभोवती येतात. ही झाडे मका पिकावर परजीवी असून मुख्य पिकाची पोषके शोषून पिकाचा पिवळेपणा, पानांची मरगळ व झाडांची वाढ खुंटते. याच्या नियंत्रणासाठी पिकाला योग्य मात्रेत नत्रयुक्त खते दयावी. पिक फेरपालट करावी, पिकात जोम राहण्यासाठी पिकात शक्तिवर्धके वापरावे. शेणखताचा भरपूर वापर करावा. शेताच्या अवतीभोंवती नेपियर गवत लावल्यास स्ट्रांयगा गवताला पिकाच्या दूर ठेवता येते. संक्रमित शेतात काम केलेले सर्व शेत अवजारे स्वच्छ करावे. जेणेकरुन परत त्याद्वारे संक्रमण होणार नाही.
लेखक डॉ. स्वाती गुर्वे, डॉ. महेश बाबर -शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा
डॉ. पराग तुरखडे- शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, कणेरी मठ, ता. कागल, जि. कोल्हापूर
Published on: 17 April 2024, 02:17 IST