डॉ. विजेंद्र एस.बाविस्कर
सध्या गहू उत्पादनामध्ये आपण स्वयंपूर्ण बनलो आहोत व राखीव साठेसुद्धा ओसंडून वाहत आहेत. बियाणे जर चांगल्या प्रतीचे असेल तर उत्पादनही भरघोस मिळते. बियाणे साठवण करून ठेवणे, त्याची कीड व रोगापासून काळजी घेणे गरजेचे आहे. बियाणे साठवणुकी मध्ये आढळणारे प्रमुख कीड व रोगाचे व्यवस्थापन कसे करावे व साठवणूक करण्याच्या पध्दती विषयी माहिती या लेखात सादर केली आहे. साठवणकाळात धान्याचे १०% नुकसान होते, तेव्हा ते होऊ नये म्हणून धान्य सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. बियाणांना कीड व रोगांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यासाठी बियाणे सुरक्षित व चांगल्या उगवणक्षमतेचे ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात बियाणे साठवणुकीच्या पारंपारिक पद्धती:
लहान बिन किवां आयताकृती बिन:
या प्रकारची रचना सर्वत्र आढळते. हे प्रामुख्याने धान्य जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी वापरले जाते. मुख्यत: बाजरी, गहू, डाळींचे विविध प्रकार इत्यादी धान्य साठवण्यासाठी यांचा वापर केला जातो. यांची क्षमता ७० ते ८० किलो पर्यंत असते. अशा प्रकारच्या कोठ्यांमध्ये किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. त्यामुळे खर्चात बचत होते. बियाणे व बाहेरील हवामान यांचा संपर्क कमी येतो. बियाणे ठेवण्यास आणि काढण्यास अत्यंत सोपे जाते. हे सामान्यत: भिन्न क्षमतेत येते.
मोठे बिन:
या प्रकारची बिन लहान बिनाप्रमाणेच असून जास्त क्षमतेचे असतात. हे प्रामुख्याने धान्य जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी वापरले जाते. यांची क्षमता २० ते ३० क्विंटल पर्यंत असते. अशा प्रकारच्या कोठ्यांमध्ये किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. बियाणे ठेवण्यास आणि काढण्यास अत्यंत सोपे जाते.
कच्च्या मातीने तयार केलेली कोठी किंवा मातीची वाडगी:
महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागामध्ये मुख्यत: अशा प्रकारचे कोठी बियाणे साठवणुकीसाठी वापरली जातात. मुख्यतः मका, गहू, भात आणि बाजरी साठवण्याकरिता याचा उपयोग केला जात असे व त्याची क्षमता १५ ते २० किलो पर्यंत होती. या प्रकारात पावसाळ्यात मातीची वाडगी ओलावा धरून ठेवतात. त्यामुळे किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
बांबूची किंवा गवतापासून बनवलेली कोठी:
स्थानिक गवतवर्गीय उंच बारीक-पातळ बनस्पतींपासून तयार केलेले धान्य साठवण कंटेनर आणि किटकांपासून बचाव करणार्या कोरड्या सागाच्या पानांनी प्लास्टर केलेल्या कंटेनर चा वापर आदिवासी भागांमध्ये जास्त करून दिसून येतो. सागाच्या वाळलेल्या पानांचा वापर साठवलेल्या धान्याच्या संरक्षणासाठी केला जातो कारण त्यांच्या वासाने कीटक दूर होतात.
तागाची पोती किवां प्लास्टिक पिशव्या:
तागाची पोती किंवा
गोणी बियाणे साठवण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र वापरली जातात. अशा प्रकारच्या संरचनेत काही निश्चित प्रमाणात धान्य प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये साठवून ठेवतात आणि पिशव्या एकमेकांवर ठेवतात. या प्रकारचा संग्रह मुख्यतः खोलीच्या कोपऱ्यात, हॉल आणि मोठ्या गोडाऊनमध्ये होतो. बॅगची क्षमता साधारणत: ५ ते ५० किलो असते. या प्रकारामध्ये किडींचा प्रादुर्भाव साधारणतः पावसाळ्यात दिसून येतो.
प्लास्टिक धाग्यापासून तयार केलेली पोती:
सध्या अशा प्रकारच्या पिशव्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात, परंतु यामध्ये बियाणे जास्त काळासाठी साठवून ठेवता येत नाही. अशा प्रकारच्या पिशव्यांमध्ये किडींचा व उंदरांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
दगडाने बनवलेली कोठी:
धान्य कमी प्रमाणात साठवण्यासाठी याचा वापर केला जात असे. बाजरी, गहू व तांदूळ साठवण्यासाठी वापरला जातो. क्षमता ८ ते १० किलो पर्यंत असते. मुख्यतः ते आयताकृती किंवा चौरस आकाराचे आहेत.
लाकडी पेटी (संदूक):
अशा प्रकारची संरचना कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यात वापरली जातात. तसेच यांची क्षमता ६० ते १०० किलो असते.
बांबूची टोपली:
हिमाचलप्रदेश, उत्तराखंड आणि आसाममध्ये वापरली जातात. बांबूच्या ट्विंग्ज/पट्ट्यांसह विणलेले तसेच शेणाने सारलेले असतात. फक्त वरील बाजूने उघडतात व यांची क्षमता ५ ते १० किलो पर्यंत असते.हरियाणा, यू.पी.,
मटका: पंजाब, मध्यप्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये मटका वापरला जातो. या प्रकारचे मटके वालुकामय चिकणमातीचे बनलेले असून कडक करण्यासाठी अग्नीत जाळले असतात तसेच पाण्याच्या रंगाने रंगवलेले असतात. त्यांची जाडी हि १ ते २ सें.मी. असते व क्षमता सुमारे ५ ते १० लिटर पर्यंत बदलते.
बियाणाचे १०% नुकसान कशामुळे होते?
•बियाणातील ओलावा व कुबट वास: २ ते ३%
•बियाणातील विविध किडी : २.५%
•उंदीर : २.५%
•बुरशीजन्य रोग : २ ते ३%
बियाणातील ओलावा व कुबट वास:
पावसाळ्यात बियाणाला पाणी लागल्याने ओलावा निर्माण होतो. अशा प्रकारचे बियाणे सडल्यामुळे त्यास कुबट वास येतो व बियांची नासाडी होऊन नुकसान होते. कीड व बुरशींना ओलाव्यामुळे वाढीस चालना मिळते.
किडींचा जीवनक्रम:
किडींचा जीवनक्रम अंडी – अळी – कोष – पंतग अशा प्रकारात होतो. यामध्ये अळी अवस्थेत किड जास्त प्रमाणात नुकसान करते.
बियाणे साठवणुकीमध्ये सापडणाऱ्या प्रमुख किडी, पतंग, उंदीर, बुरशी खालीलप्रमाणे:
सोंडे किडे (धान्य भुंगा):
तारुण्य आणि अळी अवस्था जास्त करून बियाणांचे नुकसान करते. मादी जास्त करून ज्या बीमध्ये खाते तिथेच अंडी घालते. नंतर त्या अंड्याचे पूर्ण किड्यांमध्ये रूपांतर होईपर्यंत ती बियांमध्येच राहते आणि नुकसान करते. ह्या किडीचे जीवनचक्र ३५ दिवसांत पूर्ण होते. यासाठी पोषक तापमान २८ अंश से. आणि आर्द्रता ७० टक्के असल्यास किडे झपाट्याने वाढतात.
पतंग (धान्य मॉथ):
हे बियाणाजवळ अंडी घालतात. पांढर्या रंगाच्या अळ्या बीला होल पाडतात आणि आतील भाग खातात. तरुण अवस्थेत आल्यावर बीतील आतील भाग खाऊन कडेचे आवरण तसेच ठेवतात. नंतर त्या आवरणाच्या आत ते कोष तयार करतात. पतंग अवस्थेत आल्यावर बाहेरील आवरण तोडून ते बाहेर येतात. नंतर वरच्या भागातील बियाणे ते खातात. त्या खोलवर साठवलेल्या बियाणात जात नाहीत.
धान्य पोखरणारे किडे:
जास्त करून अंडी बियाणामध्ये घालतात. अळ्या बियाणामध्ये शिरतात आणि तिथेच वाढतात आणि बियांची झालेली पावडर ते खातात, जी पावडर तरुण किड्यांनी तयार केलेली असते. या किडीच्या प्रजननवाढीसाठी तापमान ३४ अंश सें. पोषक असते. आर्द्रता ६० ते ७० टक्के लागते. मादी तिच्या आयुष्यकाळात ३०० ते ५०० अंडी घालते.
पिठातील लाल किडे आणि अळी:
हे किडे व अळ्या प्रामुख्याने पिठावर आणि फुटलेल्या बियाणावर गुजराण करतात. न फुटलेले बियाणे ते खात नाहीत. या किडीमुळे साठवणुकीत दुर्गंध येतो. प्रजननासाठी आवश्यक तापमान ३५ अंश सें., आर्द्रता ७५ टक्के लागते. मादी २० दिवसांच्या आयुष्यक्रमात ५०० अंडी घालते.
उंदीर:
पावसाळ्यात शेतातील उंदरांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्याने ते जवळील घरे, गोडाऊन आणि निवार्याच्या ठिकाणी आश्रय घेतात. उंदरांचे प्रजनन खूप जलदगतीने होते. नर-मादीच्या एका जोडीपासून वर्षभरात ८० उंदरांची पैदास होते. जन्मानंतर १० दिवसांनी उंदराला तीक्ष्ण दात येतात. दर महिन्याला त्याची लांबी १/२ सें.मी ने वाढते. मादी तर दोन महिन्यांनी पिल्ले देते. प्रत्येक वेळी ती सहा ते दहा पिल्लांना जन्म देते. गर्भधारणेचा काळ २० ते २८ दिवसांचा असतो. मादी एका वर्षात पाच ते सहा वेळा विते. ही पिल्ले दीड ते दोन महिन्यांत वयात येतात.
उंदरांचे नियंत्रण करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करावा:
•गोदाम, घर आणि शेतात एकाच वेळी उंदीर नियंत्रण मोहीम घ्यावी.
•दरवाजे घट्ट बसणारे असावेत, जेणेकरून उंदीर आतमध्ये शिरकाव करणार नाहीत. दरवाज्याला जमिनीच्या बाजूस पत्रा बसवावा.
•खिडक्यांना व मोर्यांच्या तोंडावर लोखंडी जाळ्या बसवाव्यात.
•घरात, गोदामात स्वच्छता ठेवावी आणि आजूबाजूची उंदरांची बिळे बुजवून घ्यावीत.
•उंदीर पकडण्यासाठी पिंजरा, सापळा यांचा वापर करावा.
•विघटक सौम्य विष तसेच झिंक फॉस्फाइड वापरावे. प्रथम १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गूळ मिसळून त्याच्या गोळ्या २ ते ३ दिवस उंदरांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर ठेवाव्यात. त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर त्यात ३ ग्रॅम झिंक फॉस्फाइड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पिठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर ठेवाव्या, जेेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. मेलेले उंदीर पुरून टाकावे.
बुरशीजन्य रोग:
पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यानंतर बुरशीची वाढ जास्त प्रमाणात दिसून येते. अॅस्पिर्जिलस व पेनिसिलियम या प्रकारातील बुरशी जास्त करून बियाणे साठवणीच्या ठिकाणी आढळते. फुटलेले बियाणे बुरशीला लगेच बळी पडते. यामुळे बुरशीची वाढ जास्त प्रमाणात होते. पांढऱ्या रंगाच्या जाळ्या बियाणामध्ये दिसून येतात. बियाणे काळपट दिसते. अशा प्रकारच्या बियाणाची उगवणक्षमता खूप कमी होते.
बियाणे साठवणुकीसाठी एकात्मिक कीड व रोगनियंत्रण:
•बियाणामधील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्के ठेवावे.
•पावसाचे पाणी साठवणीच्या ठिकाणी येणार नाही याची काळजी घ्यावी.
•बियाणे साठवण ठिकाणे साफ ठेवावीत.
•पोती साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी, जेणेकरून जमिनीशी संपर्क येणार नाही.
•बाजारामध्ये आता साठवणुकीत ठेवण्यासाठी कीडनियंत्रक सापळे उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा.
•हवाबंद जागेमध्ये बियाणे साठवणूक केल्यास त्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कीड लागत नाही.
•कडुलिंबाचा पाला साठवण पत्रामध्ये मिसळून ठेवला तरी चांगल्या प्रकारे कीडनियंत्रण होऊ शकते.
•निमतेल, निमार्क आणि निबिसिडीन यापैकी कोणतेही एक औषध २ मि.ली. १ किलो बियाणास चोळावे किंवा पोत्यावर बाहेरून फवारावे.
•साठवणुकीची पोती, कणग्या, पक्की कोठारे, वाहतुकीची साधने आणि भिंतींच्या फटीमधील किडींचा नाश करण्यासाठी मेलॉथियान १ लिटर + १०० लिटर पाणी यांची फवारणी करावी. ही फवारणी उघड्या बियाणावर करू नये. त्यानंतर बियाणाची साठवणूक करावी.
•२५ टक्के पाण्यात मिसळणारी डेल्टामेथ्रीन पावडर ४० ग्रॅम + १ लिटर पाणी यांचे द्रावण साठवलेल्या पोत्यावर तसेच कोठारावर बाहेरून फवारणी करावी. ही फवारणी दर ३ महिन्यांनी करावी.
•पावसाळ्यात गॅसयुक्त धुरीजन्य औषधाने कीडींपासून तसेच बुरशीपासून संरक्षण करता येते. त्यासाठी साठवण ठिकाणे हवाबंद करावी. साठवलेले बियाणे प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून त्यात धुरीजन्य औषधाच्या पुड्या फोडून ठेवाव्यात व झाकण ८ ते १० दिवस बंद ठेवावे. अशा प्रकारे कीड, रोग आणि उंदीर नियंत्रण केल्याने पावसाळ्यात होणारे बियाणाचे नुकसान टाळता येईल.
लेखक - डॉ.व्ही.एस.बाविस्कर (कृषी विद्यावेत्ता) अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे ४११००४