शेतकऱ्यांनी तुरीची बागायती लागवड केली असेल अशा शेतकऱ्यांनी पिकास कमीत कमी तीन वेळा पाणी द्यावे. त्यासाठी वाढीच्या अवस्था लक्षात घ्याव्यात. जेणेकरून नेमके पाणी किती द्यायचे ते निश्चित करता येते. फुलकळी येण्याची अवस्था, 50 टक्के फुले व शेंगा लागण्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था या अवस्थांना पाणी दिल्यास उत्पादनात वाढ मिळते.
फुलगळीची कारणे
१)फुले लागण्याच्यावेळी जमिनीत अत्यंत कमी ओलावा असणे किंवा सततचा जास्त ओलावा असणे.
२) जमिनीत जास्त दिवस पाणी धरून राहणे किंवा लवकर वापसा न येणे.
३) वातावरण सतत ढगाळ असणे व हवेत दमटपणा असणे.
४)जमिनीत ओलावा जास्त असणे लागवडीचे क्षेत्र हे पाणवठा, नदी किंवा तळ्याच्या जवळ असल्यास आणि वातावरणात तापमान अत्यंत कमी झाल्यास वाफेचे रूपांतर धुक्यात होऊन फुलगळ होते.
५)अतितापमान झाल्यास व जमिनीत ओलावा कमी असल्यास फुलगळ होते.
उपाययोजना
१) फुलगळ कमी करण्यासाठी वाढ उत्प्रेरक एनएए (नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड) 20 पीपीएम (100 लिटर पाण्यात 20 मिलि एनएए) या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे फुलगळ काही प्रमाणात कमी करता येईल.
शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
१)अळीची अंडी फुलकळीच्या देठावर किंवा जवळच्या पानाच्या मागील बाजूस एकट्याने किंवा गुच्छात दिसतात. 5 ते 7 दिवसांत लहान अळी बाहेर पडते. ही अवस्था सर्वांत घातक असते. या अवस्थेत नियंत्रण केल्यास पुढील दोन फवारण्या वाचतात.
२)नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा क्लोरोपायरिफॉस 17 मिलि प्रति10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुसरी फवारणी क्विनॉलफॉस किंवा प्रोफेनोफॉस 20 मिलि प्रति10 लिटर पाण्यात मिसळून पीक 50 टक्के फुले व शेंगा असताना करावी दाणे भरताना शेंगा पोखरणाऱ्या अळीबरोबरच शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 4 ग्रॅम प्रति10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
कामगंध सापळ्यांचा वापर
१)हे सापळे शेंग पोखरणाऱ्या अळीच्या नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी लावले जातात. नर पतंग आकर्षित झाल्यामुळे मादीशी होणारा संपर्क कमी करून अळीचे पुनरुत्पादन कमी करण्यास मदत होते._
२)सापळ्यामध्ये किती नर पतंग जमा झाले त्यावरून आर्थिक नुकसानीची पातळी ठरविण्यास मदत होते._
३) प्रतिएकरी दोन कामगंध सापळे लावावेत. सापळे पिकाच्या उंचीपेक्षा दीड ते दोन फूट वरच्या बाजूस लावावेत._
पक्षीथांबे
प्रत्येक गुंठ्यात एक याप्रमाणे पक्षीथांबा बसवावा. पिकाच्या उंचीपेक्षा 2 ते 3 फूट उंच काठी लावावी या काठीवर पक्षी बसून प्रौढ अळ्या वेचून खातात. त्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण होईल._
लेखक प्रवीण सरवदे कराड
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 20 August 2021, 03:08 IST