महाराष्ट्रात देव ह्यावर्षी शेतकऱ्यांची खरी अग्निपरीक्षा पाहत आहे. पावसाच्या अनियमित वितरनाने तसेच काही भागातील अतिवृष्टीने शेतकरी राजा पार हतबल झाला आहे आणि शेतकऱ्यांना नेमके काय करावे हे सुचत नाही आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे त्यातच गेल्या महिन्यात शेतमालाचा भाव व शासनाचे धोरण ह्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. पाऊसामुळे कापुस, सोयाबीन, कांदा ह्याच पिकांचे नुकसान झाले असे नाही तर ह्या अतिवृष्टीमुळे फळबाग पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल आपण काही दिवसांपूर्वीच बघितलेत आता खान्देशांत देखील पावसाचा विपरीत परिणामी समोर येत आहे. खांदेशातील सर्वात मोठा जिल्हा व आदिवासी जिल्हा म्हणुन ओळखला जाणारा नंदुरबार जिल्ह्यात पपई चे खुप मोठे क्षेत्र आहे आणि पपई लागवडीतून ह्या जिल्ह्यातील शेतकरी चांगली कमाई करत आहेत. पण ह्यावर्षी येथील पपई उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपई पिकाच्या फळबागा अतिवृष्टी मुळे चांगल्याच प्रभावित झाल्या आहेत. जास्त पावसामुळे फळबागांवर रोगाचे प्रकोप वाढताना दिसत आहेत. जिल्ह्यातील पपईच्या बागा ह्या बुरशीजन्य रोगामुळे ग्रसित झाल्या आहेत. ह्यामुळे पपईच्या फळांवर विपरीत परिणाम होत आहे आणि फळे खराब होत आहेत. ह्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. असे असले तरी मायबाप सरकार अजून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत नाही, पंचनामा करत नाही असा आरोप आता जिल्ह्यातील शेतकरी बांधव करत आहेत. शेतकरी शासन दरबारीं मागणी करत आहे की, शासनाने लवकरात लवकर पपई पिकांवर आलेल्या ह्या रोगावर नियंत्रणसाठी काहीतरी उपाययोजना करावी.
खान्देश प्रांतातील एकट्या नंदुरबार जिल्ह्यात 6400 हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करण्यात आली आहे. ह्या एवढ्या मोठ्या क्षेत्रापैकी चार हजार हेक्टर क्षेत्र एकट्या शहादा तालुक्यात आहे. ह्या पपई लागवड केलेल्या क्षेत्रात अनियमित पाऊसामुळे बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे पपईचे पिक हे धोक्यात आले आहे आणि त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्याचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि हे नुकसान अजून कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पपई पिकावर डाऊन बुरशीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पपई व्यतिरिक्त इतर फळबाग पिकांवर देखील ह्या रोगाचा प्रभाव दिसून येत आहे त्यामुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. ह्या अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठया संकटात आणले आहे. वारंवार होत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना जोराचा झटकाच दिला आहे.
डाऊनी हा एक बुरशीजन्य रोग आहे ह्याच्या प्रादुर्भावामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी पडतात आणि पडायला लागतात. ह्या रोगामुळे फळांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ह्यामुळे पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू शकतो. ह्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पपईच्या बागा जवळपास उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पपई पिकावर आलेल्या या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाने व्यावहारिक पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ह्या रोगावर जर वेळीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर ह्यामुळे जिल्ह्यातील पपईच्या बागा ह्या राख होतील आणि शेतकरी कर्जबाजारी होईल असे विचार जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
Published on: 19 October 2021, 07:05 IST