Agripedia

एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे

Updated on 14 April, 2022 1:48 PM IST

एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे दूध 82 अंश से. तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे. त्यानंतर दुधाचे तापमान 70 अंश से.पर्यंत कमी करावे. या तापमानावर दुधात एक किंवा दोन टक्के तीव्रता असलेले सायट्रिक आम्ल बारीक धारेने सोडावे. सायट्रिक आम्लाऐवजी लिंबाचासुद्धा उपयोग करता येतो. सायट्रिक आम्लामुळे दूध लगेच नासते. अशा फाटलेल्या किंवा नासलेल्या दुधातून बाहेर येणारे हिरवट निळसर पाणी जेव्हा दिसू लागेल, त्याक्षणी सायट्रिक आम्ल टाकणे बंद करावे.

नंतर दुसऱ्या एका स्वच्छ पातेल्याच्या तोंडावर तलम किंवा मखमलीचे कापड बांधावे. त्यावर पहिल्या पातेल्यातील दूध ओतावे. कापडावर छन्ना (पाणी वगळता उरलेले घनपदार्थ) जमा होईल. वेगळा केलेला छन्ना लगेच लाकडी पेटीत (पनीर दाब पेटी) कापडासहित ठेवावा. त्यानंतर लाकडी पेटी वर हळूहळू 25 ते 30 किलोग्रॅम वजन 15 ते 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर तयार झालेले पनीर बाहेर काढून पाच ते आठ अंश से. तापमान असलेल्या थंड पाण्यात तीन ते चार तास ठेवावे. थंड पाण्यातून काढून लाकडी फळीवर पाणी निघण्यासाठी थोडा वेळ ठेवावे.

म्हशीच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश सहा टक्के) दुधाच्या 20 ते 22 टक्के पनीर तयार होते. गाईच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश 3.5 ते 4 टक्के) सरासरी 16 ते 18 टक्के पनीर तयार होते, परंतु गाईच्या दुधापासून तयार केलेले पनीर मऊ असते, त्यामुळे त्या पनीरला बाजारात म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरच्या तुलनेत कमी मागणी असते.

पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. 

 परंतु या महागड्या यंत्रांशिवाय सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करता येऊ शकते

लाकडी पेटी तयार करणे (पनीर दाब पेटी)

यासाठी सर्वसाधारणपणे 45 सें.मी. लांब, 25 सें.मी. रुंद आणि 25 सें.मी उंच या आकाराची लाकडी पेटी तयार करावी, या पेटीसाठी वापरलेल्या लाकडी फळीला चारही बाजूने बारीक बारीक छिद्रे असावेत. पनीर तयार करताना दुधातील पाणी (व्हे) निघण्यासाठी ही छिद्रे आवश्‍यक असतात.

English Summary: Panir making this is easy methods
Published on: 14 April 2022, 01:40 IST