1. कृषीपीडिया

सेंद्रिय शेती- एक पाऊल आरोग्याच्या दिशेने

अमेरिकेने दिलेला गहू असो की लाल ज्वारी (मिलो) की आणखीन काही. हे सर्व आपण अनुभवलं, सोसलं. मग गरज पडली ती भारतीय शेतीत आमूलाग्र बदल करण्याची.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सेंद्रिय शेती- एक पाऊल आरोग्याच्या दिशेने

सेंद्रिय शेती- एक पाऊल आरोग्याच्या दिशेने

अमेरिकेने दिलेला गहू असो की लाल ज्वारी (मिलो) की आणखीन काही. हे सर्व आपण अनुभवलं, सोसलं. मग गरज पडली ती भारतीय शेतीत आमूलाग्र बदल करण्याची. कारण आपली शेती पिढ्यान् पिढ्यांच्या तत्त्वावर आधारलेली असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येची भूक भागवणं शक्य नव्हतं. त्यासाठी भारतीय शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक होते. शेतकऱ्यांची अस्मिता जागृत करणे

स्वातंत्र्यानंतरचा भारतीय शेतीतील काळ आजही आपल्याला आठवला तरी अंगावर काटे उभे राहतात. खासकरून १९७१-७२ चा काळ (भीषण असा दुष्काळ) त्याची तीव्रता हृदय पिळवटून काढणारी. आजही त्याचे चटके आपल्याला जाणवतात. एवढ्या साऱ्या लोकसंख्येला पुरेल असा अन्नसाठा आपल्याकडे नव्हता, मग आपल्याला जगाच्या दारात कटोरा घेऊन उभं राहावं लागलं आणि जे पदरी आलं ते स्वीकारावं लागलं. ते किती निकृष्ट दर्जाचं होतं हे वेगळं सांगायला नको.

अनेक लोकांनी, संस्थांनी, विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी अपार मेहनत घेतली. त्यापैकीच एक होती कैलास ते सिंधुसागरापर्यंतची पदयात्रा. विनायकदादा पाटलांनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे, या पदयात्रेतील लोक अन्नसुरक्षा, सुधारित शेती या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती देत, परदेशावर असलेले आपले अवलंबत्व अधोरेखित करत व शेतीत बदल स्वीकारा, प्रगती होईल असे आवाहन करीत. त्यांच्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ११ गावांनी अशी प्रतिज्ञा केली, की ‘एक वर्षाच्या कालावधीसाठी परदेशातून मदत म्हणून आलेले धान्य आम्ही खाणार नाही.

आमची गरज आम्ही गावातच भागवू.’ तसे येथील ग्रामपंचायती व विविध कार्यकारी सोसायट्यांनी एकमताने ठराव करून जाहीरही केले. या खंडप्राय देशात केवळ ११ गावांनीच प्रतिज्ञा केली असली, तरी ठिणगी पडली होती ‘हरितक्रांतीची’. मग भारतीय शेतीत बदल होत गेला. पीक लागवडीच्या नवीन पद्धती आल्या. उच्च दर्जाचे उत्पन्न देण्याच्या जाती आल्या. पिकांचे उत्पादन वाढवणारी रासायनिक खते आली. रोग आणि किडीपासून रक्षण करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आली. या सर्व पद्धती भारतीय शेतीत आल्या. त्याचा आपण अवलंब केला आणि भारतीय शेतीत उल्लेखनीय असा आमूलाग्र बदल झाला. अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड वाढले. आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो, जे कधी काळी आपण कटोरा घेऊन जगाच्या दारात उभे होतो, त्याच कटोऱ्याने आपण जगाला धान्य पुरवायला लागलो. कारण आपण स्वयंपूर्ण झालो होतो. आपले अन्नधान्याचे उत्पादन ५० मिलियन टन (१९५०) वरून १३० मिलियन टन (१९७८-७९) झाले व आज २५० मिलियन टन आहे. या सर्वांचे फलित म्हणजे भारताने केलेली ‘हरितक्रांती’ होती. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. आयातीवरून आपण निर्यातीकडे वळलो. जागतिक बाजारपेठेत आपली मान उंचावली. शेतकरी सधन बनला. हरितक्रांतीमुळे आलेली स्वयंपूर्णता, संपन्नता नक्कीच उल्लेखनीय होती; पण निसर्ग व आरोग्याच्या दृष्टीने होती का? आपण आजच्या फायद्यासाठी उद्याचं भविष्य धोक्यात तर घालत नव्हतो ना? हरितक्रांतीमुळे जे उल्लेखनीय बदल झाले त्याचबरोबर पर्यावरण आणि आरोग्याच्या दिशेनेही काही विपरित परिणाम झाले- रासायनिक खतांचा, कीटकनाशक- बुरशीनाशक अशा कितीतरी केमिकल्सच्या वारेमाप वापर झाला. परिणामी, जमिनीची प्रत ढासळली. जमिनीतील सेंद्रिय कर्ब नष्ट झाले व आरोग्याच्या दृष्टीने तर अतिशय हानिकारक परिणाम झाले. केमिकल्सच्या रेसिड्यूमुळे ते आपल्या शरीरात गेले व त्यामुळे अनेक दुर्धर व भयानक आजार उद््भवले. आरोग्याच्या गंभीर समस्या जाणवल्या, त्या पंजाब आणि हरियाणात. काही केमिकल्स इतके हानिकारक होते व त्यामुळे जमिनीची प्रत इतकी ढासळली, की ती आजही सुधारली नाही. रासायनिक खतांच्या विशेषतः नत्रयुक्त खतांच्या वारेमाप वापरांमुळे, जमिनीत खोलपर्यंत ही खते झिरपत गेली व पिण्याच्या पाण्याचे साठे, बोअरवेलचे पाणीदेखील प्रदूषित झाले. केरळसारख्या या राज्याने पुढाकार घेऊन एंडोसल्फानसारख्या हानिकारक कीटकनाशकांवर बंदी आणली. कारण त्यामुळे लोकांना कॅन्सर, चर्मरोग व अस्थिरोगांसारखे दुर्धर रोग होऊ लागले व शिवाय शेतीतील जैवविविधता धोक्यात आली. त्यामुळे गरज निर्माण झाली आरोग्यपूरक, पर्यावरणपूरक शेती करण्याची, म्हणजेच ‘सेंद्रिय शेती’ची.

खरं पाहायला गेलं तर सेंद्रिय शेती काही आपल्याला नवी नाही. पूर्वीपासून आपण ती करीत आलो आहोत. मात्र, त्याला शास्त्रीय आधार नव्हता ही गोष्ट मात्र खरी. आजची जीवनशैली आपण अनुभवतो आहोत आणि त्यातील समस्या व त्रुटी या काही नव्या राहिल्या नाहीत. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या आज उद््भवतात. या सर्वांचा अतिरेक इतका झाला आहे, की आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळलेच पाहिजे, जरी वाढती लोकसंख्या ही समस्या असली तरी. आपल्याला माहीतच आहे, की आपले शारीरिक व मानसिक आरोग्य हे आपल्या आहारावर अवलंबून आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय, ती कशी करायची, त्याची तत्त्वे कोणती व त्यापुढील संधी आणि आव्हाने या सर्वांची माहिती असणे गरजेचे आहे. १९७० च्या दशकांत जपानमधील फुकूओका नावाच्या एका शेतकऱ्याने भाताचे पीक सेंद्रिय पद्धतीने घ्यायला सुरुवात केली. अल्पावधीतच ही ‘वन स्ट्रॉ रिव्हॉल्यूशन’ जगभर पोहोचली व त्याचा बराच बोलबाला झाला. जमिनीची अजिबात मशागत न करता (झीरो टिलेज) अन्नधान्य पेरायचे, फक्त उत्पन्न घ्यायचे व राहिलेला काडीकचरा त्याच शेतात टाकायचा व अशा तऱ्हेने जमीन समृद्ध करीत जायचे. काळाच्या कसोटीवर ही संकल्पना उतरली नाही. आता आधुनिक युगात आपण परंपरेची कास न सोडता, पण नवीन तऱ्हेने सेंद्रिय शेती केली पाहिजे.

 

‘सेंद्रिय शेती’ सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास रसायनांचा वापर टाळून व पर्यावरणीय जीवनचक्रास समजून घेऊन केलेली एकात्मिक शेतीपद्धती होय. ‘सेंद्रिय शेती’ ही अशी उत्पादनपद्धती आहे, ज्यामध्ये रासायनिक पदार्थांना मग ती खते कीटकनाशके, तणनाशके किंवा प्राणिमात्रांचे खाद्य, या कोणत्याही स्वरूपात त्यांच्या वापरावर बंदी असते. या पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट, पिकांच्या अवशेषांचा वापर, प्राणिमात्रांचे मलमूत्र, जैविक कीडनियंत्रण इ. गोष्टींवर भर देऊन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवली जाते. लॅम्पकीन (१९९०) यांच्या म्हणण्यानुसार निसर्गाकडून आपण जे घेतले ते निसर्गाला परत देणे म्हणजेच ‘सेंद्रिय शेती’ होय.

२००४ च्या आकडेवारीनुसार जगात २४० लक्ष हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात होती व तीच आकडेवारी आपण २००६ मध्ये बघितली तर ३१० लक्ष हेक्टर पोहोचली. म्हणजे दोनच वर्षांत ७० लाख हेक्टर क्षेत्राची भर पडली आणि आजच्या घडीला ४३७ लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आहे (यात सेंद्रिय शेतीच्या मार्गावरील क्षेत्रदेखील आहे). सद्यःस्थितीनुसार १७२ हून अधिक देशांत सेंद्रिय शेती केली जात आहे.

यात भारतातील सेंद्रिय शेतीचा विचार करायचा ठरल्यास जगाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. वेगवेगळ्या संस्थांनी संकलित केलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये भारतामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ०.३० टक्के क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली होते. दरम्यानच्या काळात भारत सरकारने विविध योजना राबवल्या व त्याचे फलित म्हणजे भारताची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल होत आहे व त्याची टक्केवारी दरवर्षी वाढत आहे. या सर्व प्रयत्नामुळे सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब करणारे राज्य बनले. भारतात लागवडीखालील एकूण क्षेत्र १४३ मिलियन हेक्टर आहे. त्यातील मार्च २०१४ पर्यंत ४.७२ मिलियन हेक्टर एवढे क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली होते (यात सेंद्रिय शेतीच्या मार्गावरील क्षेत्रदेखील आहे) व २०१५-१६ मध्ये हेच ५.७१ मिलियन हेक्टर एवढे झाले. यावरून भारतीय शेतकऱ्यांचा व नागरिकांचा कल हा हळूहळू सेंद्रिय शेतीकडे व आरोग्याच्या हेतूने चांगला दिसून येत आहे. हे प्रमाण ३.५ टक्क्यांच्या वर जात नाही, तरीही हे आपणा सर्वांसाठी नक्कीच दिलासा देणारे चित्र आहे.

सेंद्रिय शेती करीत असताना काही तत्त्वे आपण जोपासली पाहिजे व मुख्य म्हणजे निसर्गाप्रती प्रेम व आवड असणे आवश्यक आहे. निसर्गाने आपल्याला हे सर्व दिलेले आहे, म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणे महत्त्वाचे आहे. 

 

प्रगतिशील शेतकरी

शरद केशवराव बोंडे.

तालुका अचलपूर जिल्हा अमरावती

9404075628

English Summary: Organic farming one feet healthy direction Published on: 20 February 2022, 01:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters