Agripedia

सेंद्रिय किवा शाश्वत शेती ही काळाची गरज आहे. पण शेतकऱ्यांशी बोलताना आणि त्यांचे सेंद्रिय शेती बाबतचे अनुभव समजून घेताना , एक गोष्ट प्रखरतेने जाणवते कि, अगदी मोजक्याच शेतकर्यांना सेद्रिय शेती बद्दल शास्त्रशुद्ध माहिती असते.

Updated on 27 August, 2021 3:07 PM IST

सेंद्रिय किवा शाश्वत शेती ही काळाची गरज आहे. पण शेतकऱ्यांशी बोलताना आणि त्यांचे सेंद्रिय शेती बाबतचे अनुभव समजून घेताना , एक गोष्ट प्रखरतेने जाणवते कि, अगदी मोजक्याच शेतकर्यांना सेद्रिय शेती बद्दल शास्त्रशुद्ध माहिती असते. बऱ्याचदा शेतकरी भावनिक दृष्टीकोनातून किवा अपुऱ्या माहितीतून सेंद्रिय शेतीकडे वळतात. शेतीमध्ये भावनिक दृष्टीकोन ठेवण्यात काहीच गैर नाही , पण अपुरी माहिती तोट्याचीच.

बरेच शेतकरी अचानक निर्णय घेतात , उद्यापासून कोणतेही रासायनीक खते वापरायची नाहीत ….जसे कि कोणत्याही तयारी शिवाय कुस्तीच्या आखाड्यात उडी मारणे. मुळात रासायनिक खते खरेच इतकी वाईट आहेत का ? का आपण ती वाईट पद्धतीने वापरतोय ? कोणत्याही गोष्टीचा आतीरेक वाईटच नाही का ? अगदी गरजे पेक्षा जास्त पाणी सुद्धा जमिनीची क्षारता वाढवतेच ना? रासायनीक / अ-रासायनिक खते आणि त्यांचा योग्य वापर हा वेगळा विषय आहे , त्यामुळे तो वेगळाच ठेऊ ! असे पाहू कि अगदी १०० % शुद्ध सेंद्रिय शेती करताना सर्वात महत्त्वाचा घटक ‘सेंद्रिय कर्ब’ (Organic Carbon) म्हणजे काय ? आणि सेंदीय कर्ब इतके महत्वाचे का ?
अगदी सोप्या भाषेत सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीतील कुजलेला काडी-कचरा (झाडाची पाने / मुळे , प्राणी/ प्राण्यांची विष्ट इ.).

एखादी गोष्ट जेव्हा मातीत कुजते तेव्हा त्याचे रुपांतर सेद्रिय कर्ब (Carbon) मध्ये होते. सुक्ष्म जीवूण पासून ते सर्व प्राण्यानपर्यंत सर्वाचे जीवनमान कर्बा वर चालते. जसे पाण्याचे चक्र आहे तसेच कर्ब चे ही चक्रचालूच राहते. सेंद्रिय कार्बामध्ये साधारणता ६५% ह्युमस (Humas) म्हणजे जुन्या सेंद्रिय कर्बा मध्ये रुपांतरीत झालेला भाग असतो , तर तितकेच महत्वाचे म्हणजे १० % पर्यंत जिवंत जीवाणू असतात. असे हि म्हणता येईल कि सेंद्रिय कार्बा मुळेच मातीचा कस वाढून जिवंत पण येतो.

सेद्रिय कर्बचे चे मातितील प्रमाण –

अगदी ढोबळमानाने विचार केल्यास मातीमध्ये २५% हवा , २५ % पाणी , ४५ % खनिजे आणि ५% सेद्रिय कर्ब असल्यास अशी माती शेतीसाठी सर्वात चांगली मानता येईल. साधारणता सध्याच्या घडीला माती परीक्षांणानुसार १ % सेद्रिय कर्ब असल्यास अत्यंत जास्त असा शेरा मिळतो. म्हणजेच ५ % सेद्रिय कर्ब ही सध्या जवळपास कोणत्याच शेतकऱ्यांच्या आवाक्यातली गोष्टं दिसत नाही. कसा कुस्ती लढणार सेद्रिय शेतीचा पहेलवान ?

सेद्रिय कर्बचे कार्य –

एक महत्वाची बाब म्हणचे , पिके (झाडे) सेद्रिय कर्बचा उपयोग अनद्राव्य म्हणून करतच नाहीत. तर सेद्रिय कर्ब हे मुख्यत्वे मातीतील जिवाणूंचे खाद्य आहे. म्हणजेच जीवाणू सेद्रिय कर्ब खाऊन , मातीतील अनद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतात. उदारणार्थ शेण खतातील नत्र अमोनिया (NH3) ह्या स्वरुपात असून Nitrobactor कुळातील बाक्टेरिया त्याचे रुपांतर Nitrate किवा Nitrite (NO३ / NO२) मध्ये करून पिकांना पचनीय स्वरुपात आणून देतात.

इतर सर्व अन्नद्रव्यच्या उपलब्धते साठी झाडे जमिनीतील सुक्ष्म-जीवनवरच अवलंबून असतात. सेंद्रिय कर्ब मातीचे भौतिक गुणधर्म जसे कि मातीची पाणी धारण क्षमता, भुसभुशीतपणा इ. सेंद्रिय कर्ब च्या उपलब्धते प्रमाणे बदलते. साधारणता असे मानले जाते कि २ ते ५ % पर्यंत सेंद्रिय कर्ब असणाऱ्या (जंगलातील चहाच्या पुडी सारखी माती ) १ चमचाभर मातीमध्ये पृथ्वीवरील लोकसंख्ये पेक्षा जास्त जीवाणू असू शकतात.

 

सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे –

सध्या आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी (०.१ ते १ %) असण्याचे मुख्य करण – व्यावहारिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर , जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण , पिक पलटणी न करणे , मातीची मशागत मोठ्या प्रमाणावर करणे आणि जमिनीला विश्रांती न देणे ही दिसतात. नैसर्गिक शेती मध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त आढळून येते. पण व्यवहारिक दृष्टिकोनातून बघताना जमिनीची मशागत न करणे हा पर्याय तरी आता शक्य दिसत नाही.

जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवून सेंद्रिय किंवा शाश्वत शेती कशी करता येईल – जमिनीमध्ये एखादी गोष्ट कुजण्यासाठी ज्या मुख्य गोष्टींची गरज असते त्यामध्ये जमिनीतील ओलावा (पाण्याचे योग्य प्रमाण) आणि नत्राचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीला नत्राचे प्रमाण हे मुख्यता काडी-कचरा (Soil Organic Matter) प्रकार , हवामान इ. वर अवलंबून असते. जसे कि झाडांच्या पानां पेक्षा प्राण्यांपासून तयार झालेला कचऱ्यात ( शेण,गोमुत्र , मासळी खत इ.) जास्त नत्र असते. म्हणूनच उसाच्या पाचटापेक्षा , शेण किवा कोंबड खताला जास्त जोर असतो.

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीतील ओलाव्या नुसार बदलणार असेल तर ह्याचा अर्थ असा की एखाद्या परिसरातील हवामानानुसार मातीमध्ये काडी-कचरा कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये होण्यासाठी कमी-जास्त वेळ लागू शकतो. काडी-कचरा कुजून उपयुक्त सेंद्रिय कर्ब बनण्यासाठी १-५ वर्ष लागू शकतात आणि हा सेद्रिय कर्ब स्थिरावून जमीन पूर्णपणे कसदार होण्यासाठी २० वर्षा
पर्यंत वेळ लागेल. हि वेळ कामी करण्यासाठी काही उपाय आहेत

जसे कि काडी-कचरा जमिनीत कुजण्यास १ महिना लागत असला तरी गाईच्या पोटात तो एका दिवसात कुजतो आणि शेण मिळते. हे शेण biogas मध्ये वापरल्यास मिळणारी slurry जास्त उपयुक्त होते , ह्या slurry चे गांडूळ खत केल्यास सेंद्रिय कर्ब लवकरात लवकर मिळवता येईल. पण एक दिवसात कोणत्याही तयारी शिवाय सेद्रिय शेती कडे वळणे म्हणजे नुकसान अटळ !
कोकणात जिथे पावसाचे आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे तेथे एखादी गोष्ट कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये लवकर होईल. ह्याविरुद्ध विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये मातीतील ओलावा कमी असल्यामुळे एखादी गोष्ट कुजण्यासाठी जास्त वेळ लागेल. मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी हवामानानुसार काही गोष्टींचा अभ्यास करून शेतीतील आंतरमशागती किंवा शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा कराव्या लागतील.

 

हवामानानुसार मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठीचे काही प्रयोग –

जास्त पावसाचा प्रदेश
कोकणासारख्या ठिकाणी खूप पाऊस पडतो आणि जमिनीवर मोठ्या प्रमाणावर झाडाची वाळलेली पाने पडतात तेथे असे आढळून येते की कुजण्याची प्रक्रिया जरी वेगाने होत असली तरी जास्त पावसाच्या प्रमाणामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाहून जातो. सेंद्रिय कर्ब नदीवाटे खाडीत आणि खाडीतून समुद्रात जाऊन तो माशांना उपलब्ध होतो आणि म्हणूनच समुद्रातील माशांना किंवा वनस्पतींना हा कर्ब मिळून त्यांची वाढ जोमाने होते. पण हा कर्ब शेतकऱ्यांच्या उपयोगाला न आल्यामुळे शेतीचे उत्पादन मात्र कमी राहते.अशा वेळेला एक पर्याय म्हणून हा कर्ब उत्पादनात आणण्यासाठी एक प्रयोग करून बघता येईल.

समजा पावसाळ्यानंतर उपलब्ध झालेला पालापाचोळा आळंबी उत्पादनासाठी वापरल्यास ह्या पालापाचोळा यापासून आळंबी उत्पादन मिळेल तसेच कुजण्याची प्रक्रिया ही वेगाने होईल. आळंबी उत्पादनसाठी कुजण्यास कठीण कचरा (लाकूड , नारळाच्या झावळ्या इ.) इतर कचरा जाळून ह्या उष्णतेचा उपयोग पालापाचोळानिर्जान्तुकीकरण प्रकरण्यासाठी वापरता येईल.

अळंबी उत्पादनानंतर अर्धवट कुजलेले पालापाचोळा गांडूळ खत बनवण्यासाठी वापरून असे गांडूळखत किवा गांडूळ पाणी शेतीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मिळवता येईल.पावसाळ्याच्या सुरवातीला मागील वर्षातील गांडूळ पाणी (वर्मिवाश) वापरून वाहून जाणाऱ्या कार्बाची पूर्तता करता येऊ शकते. तसेच मासळी खत , कोंबड खत तसेच स्पुरद आणि पालाश युक्त खते (SSP/ MOP इ.) बायोगॅस मधून बाहेर येणारा काल्याबरोबर (slurry ) मिश्रित करून वापरता येतील.

  • कमी पावसाचा प्रदेश
    विदर्भ किंवा मराठवाड्यासारख्या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात कोरडवाहू जमिनीतील सेद्रिय कर्ब वाढवणे कठीण असते. ह्याचे मुख्य कारण जमिनीतील कमी ओलावा
  • ओलाव्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करून जमिनीत वापसा टिकवता येईल.
  • हिरवळीची खते जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून जमिनीची पाणी धारण क्षमता वाढवण्यास मदत करते
  • जीवामृत, गांडूळ खत ,जिवाणू खतांचा जास्तीत जास्त उपयोग
  • जेथे सिंचनाची सोय आहे आणि ऊस किंवा इतर नगदी पिके जास्त प्रमाणात घेतली जातात अशा ठिकाणी नगदी पिकांबरोबरच आंतरपीक म्हणून पट्टा पद्धतीने हिरवळीच्या खतांचा उपयोग वाढवता येईल

 

बऱ्याचदा असे दिसून येते सेंद्रिय शेती करताना शेतकरी रासायनिक खतांना विष समजून त्यांचा उपयोग अचानक पणे पूर्ण बंद करून टाकतात. खरेतर युरिया ( नत्र), सिंगल सुपर फॉस्फेट (स्पुरद), पोट्याश (पलाश), सल्फर आणि इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये जिवाणूंच्या वाढीसाठीही अन्नद्रव्य पुरवतात आणि सुक्ष्मजीवाणूनी वापरून रुपांतरीत झालेली अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून देतात. पण आपण गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचा अतिरेक किंवा अयोग्य वापर आणि सेद्रिय कर्बाचे कमी होणारे प्रमाण ह्या मुळे जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊन कुजण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

जिवाणूंची वाढ न झाल्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचीही उपलब्धता होत नाही. एखादी गोष्ट कुजण्यासाठी नत्राची गरज ही युरियाचा वापर करून पुरवता येऊ शकते. जसे की उसाचे पाचट किंवा गव्हाचा भुसा शेतांमध्ये कुजण्यास वेळ लागतो आणि नंतरचे पिक चांगल्या पद्धतीने येत नसल्यामुळे शेतकरी असा कचरा जाळून टाकतात. खरेतर हा सर्व काडीकचरा जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी खूप उपयोगाचा आहे. हा काडीकचरा योग्य गतीने कुजण्यासाठी युरियाचा वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून सेंद्रिय शेती करण्यास मदतच होते. कालांतराने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून (१.० ते २ % ) इतर वरखते पूर्ण बंद करता येऊ शकतील आणि खर्या अर्थाने सेंद्रिय किवा शाश्वत शेती शक्य होईल.

संजय घानोरकर
प्रतिनिधि गोपाल उगले

English Summary: Organic curb is the basis of organic farming
Published on: 27 August 2021, 03:07 IST