Agripedia

शेती करणारा शेतकरी आज अडचणीत असला तरी,शेतीसाठीचे पुरवठादार आणि सल्लागार लखोपती,करोडपती आहेत.

Updated on 16 April, 2022 12:59 PM IST

शेती करणारा शेतकरी आज अडचणीत असला तरी,शेतीसाठीचे पुरवठादार आणि सल्लागार लखोपती,करोडपती आहेत.खत,बी-बियाणे, कीटकनाशके पुरवणारे कृषि सेवा केंद्रवाले असोत की,शेतीत उत्पादन कसं वाढवायचं,कोणती पिकं घ्यायची,याचं मार्गदर्शन करणारे सल्लागार असोत,त्यांचंही छान चाललयं.यांनाही शेतीतील जोखमीचा फटका बसत नाही. फटका बसतो तो फक्त शेतकऱ्यांना. 

हा जमाना प्रसिद्धीचा,खऱ्या खोट्या प्रचाराचा,मार्केटिंगचा आहे.त्यात भलं-बुरं दोन्ही खपवलं जातं.

हे मार्केटिंग शेतकऱ्यांना चक्रावून सोडणारं असतं.कोणी म्हणतं,आंबा लावा,डाळिंब लावा,कोणी द्राक्ष... कोणी शेवगा लावा म्हणतं तर कोणी बांबू लावा,चंदन लावा म्हणतं.कोणी भाजीपाला लावायला सांगतं तर कोणी फुलशेती करा म्हणतं...एक नाही, शेकडो सल्ले.डोळे फिरवणाऱ्या अनेक यशकथा. कोणी कोथिंबीर विकून कसा लखोपती झाला हे सांगतं तर एक एकर आंब्यात २५लाखाचं उत्पन्न झाल्याचं सांगणारा टी.व्ही.वर झळकतो.प्रत्येक यशकथा वाचली,बघितली की,शेतकऱ्यांच्या डोक्यात त्याचं अनुकरण करण्याचा किडा वळवळू लागतो. विशिष्ट पिकं घ्या म्हणून मार्गदर्शन करणारे सल्लागार त्या पिकांचे सगळे फायदे सांगतात मात्र त्यातील जोखमीबाबत कोणीच बोलत नाहीत.कारण त्यांना त्यांचं बियाणं,रोपटी विकायची असतात. आज त्याला नेमकं काय मार्केट आहे.उद्या काय राहिल,याबाबत बोलणं ही फारच दूरची गोष्ट. एकाने एक नवा प्रयोग केला नि त्यात थोडसं यश मिळालं की,अनेकजण त्याचं अनुकरण करतात.लागवड करून जेव्हा उत्पादन विकायची वेळ येते तेव्हा लक्षात येतं की,त्याला बाजारात फारशी मागणीच नाही.त्यातून हे हौशी प्रयोगशील शेतकरी मोठ्या नुकसानीत येतात. मग शेतीच्या नावानं रडारड अधिकच वाढते.गेल्या काही वर्षांपासून अशी अनेक उदाहरणं मी आजुबाजुला पाहतोय.कधी शेतकऱ्यांना जिट्रोबाची लागवड करायचा सल्ला मिळाला,कधी सुबाभूळ तर कधी आणखी कुठली औषधी वनस्पती. शहामृग पालनात माझे चार मित्र लाखोत बुडालेत.

शहामृगाचं अंड म्हणजे सोन्याचं अंड असाच प्रचार होता.हजाराला,दिड हजाराला विकलं जातं,असं सांगीतलं जायचं.हा सगळा प्रचार खोटा निघाला.चंदन लावा,रक्तचंदन फार फायदेशीर,सागवान लावा हे फंडेही होऊन गेलेत.मागे एकाने मला बांबु लागवडीबद्दल फोन केला.त्याचं सगळं ऐकून घेतल्यानंतर मी म्हटलं, आतापर्यंत कितीजणांना बांबू लावलाय? माझ्या बोलण्यातील खोच लक्षात आल्याने त्यानं फोन बंद केला.

शेतजमीनीत मोठं वैविध्य आहे.काळी माती,तांबडी माती,मध्यम दर्जाची,हलकी ,मुरमाड. भरपूर अन्नद्रव्य असलेली,निकृष्ट,भरपूर पाणी सहन करण्याची क्षमता असलेली.कमीतकमी पाणी लागणारी,चिबाड,लगेच वापसा होणारी.असे जमिनीचे कितीतरी प्रकार आहेत.त्या जमिनीच्या पोतानुसार,तिथं विशिष्ट पिकांचं उत्पादन चांगलं येतं.कोणत्या जमिनीत कोणतं पिक चांगलं येतं,हे प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं.आपल्याकडंच मनुष्यबळ, भांडवल, सिंचन सुविधा आणि जोखीम पचवण्याची क्षमता काय,हे माहित असतानाही, अनेकदा प्रचाराला बळी पडून शेतकरी प्रयोग करतात आणि हमखास बुडतात.

पत्रकार म्हणून मी शेतीतील बऱ्याच यशकथा वाचल्यात.अशा ठिकाणांना भेटी देऊन त्यातील फोलपणाही दाखवून दिलाय.शिवाय यावर्षीची यशकथा पुढच्या वर्षी अस्तित्वात असेलच याची खात्री नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी मी माझ्या संबंधातील एका व्यक्तीच्या फुलशेतीची यशकथा लिहली.ती अँग्रोवन मध्ये छापून आली.माझ्यामुळं तीन चँनलवर ती प्रक्षेपित झाली.मोठं कौतूक झालं. दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्याने ती फुलशेती मोडीत काढली.ग्रीन हाऊसचं मोठं अनुदान मिळालं की त्याचा फुलशेतीतील रस संपला.तो दरवर्षी अनुदान मिळणारी नवी स्किम काढतो.पण हे दोन -चार शेतकऱ्यांनाच जमू शकतं.कृषि विभागात पैसे दिल्याशिवाय कुठलीच अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाहीत. ऑनलाईन नावाचा भलताच बोगस प्रकार सुरू झालाय.मुळातच शासनाचं कृषि खातं हे केवळ ती यंत्रणा पोसण्यासाठी निर्माण केलं गेलयं,हे माझं अनुभवांती बनलेलं मत आहे.

मी लातूरमध्ये दैनिकाचा संपादक असतानाचा किस्सा मुद्दाम नोंदवण्याजोगा आहे. एका शेतकऱ्याने एक एकर जमिनीत २०लाखाचं आंब्याचं उत्पन्न काढल्याची ठळक बातमी एका प्रादेशिक दैनिकात छापून आली होती.शेतकरी कृषि पदवीधर होता.तो सेंद्रिय पध्दतीने शेती करायचा.इतरांना लागवडीसाठी मार्गदर्शन करायचा,असाही उल्लेख त्या बातमीमध्ये होता.योगायोगाने त्याच आठवड्यात लातूरमध्ये या प्रगतीशील शेतकऱ्याचं व्याख्यान होतं.मी ते ऐकलं.ते संपल्यावर, तुमची मुलाखत घ्यायची म्हणून मी त्यांना माझ्या कार्यालयावर घेऊन गेलो.चहा पाजून,मी त्यांना थेट प्रश्न केला...ही खोटी भाषणं देत तुम्ही का फिरताय? ते एकदम चपापले...रागात बोलले,मी काय खोटं बोललो? मी म्हटलं,एक एकर आंबा लागवडीत तुम्ही २०लाखाचं उत्पन्न काढल्याचा दावा केलाय,तो खरा आहे काय?....खरं आहे म्हणून तर सांगतोय, असं ते गुर्मीतच बोलले.मी शांतपणे बोललो, तुमचं राहणीमान साधं आहे,याचं मला कौतूक वाटतं.पण तुमच्या पायातील एका चप्पलचा अंगठा तुटलाय, शर्टाची कॉलर फाटलीय शिवाय तुमची मोटारसायकल भंगारमध्ये काढण्याच्या लायकीची झालीय...तुमचं शेतीतील उत्पन्न २०लाख, इतरांच्या शेतात आंबे लावणीचे पैसे,भाषणांचे पैसे...हे सगळं लक्षात घेतलं तर तुम्ही लक्झरी कारनेच फिरायला पाहिजे... तुम्ही ही डबडी गाडी का वापरताय? माझा घाव बरोबर वर्मावर बसला होता. ते धोतरानं घाम पुसायला लागले..मी म्हटलं,हे काही मी पेपरमध्ये छापणार नाही... पण तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करणं बंद करा. ते लगेच घाई आहे म्हणून उठून गेले.त्यानंतर त्यांचं भाषण किंवा बातमी माझ्या बघण्यात आली नाही.

झीरो बजेट शेतीचं अनाकलनीय तत्वज्ञान सांगून लखोपती झालेल्या व वर्षभरापूर्वी पद्मश्री मिळवलेल्या महान शेती मार्गदर्शकाची कथा तर सगळ्यांनाच माहिती असेल. हजारो शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीच्या नादाला लावणाऱ्या या गृहस्थाने स्वत: कधीच सेंद्रीय शेती केली नाही. आजही त्यांची शेती त्यांचा वाटेकरी रासायनिक पध्दतीने करतो. याचा पर्दाफाश अनेकांनी केलाय.तरीही याचे भक्त मोठ्या संख्येने आहेतच.

दुसरा अनुभव माझा स्वत:चाच आहे.२०१०-११सालचा.शेळीपालन कसं फायद्याचं आहे,यावर विविध तज्ज्ञांचे मी बरेच लेख वाचले होते.शिवाय आमच्या माळावर शेळ्या चारण्यासाठी बरेच मजूर येत.त्यांच्याकडं पाच शेळ्यांच्या पंधरा शेळ्या झाल्याचं मी बघत होतो.त्यातच उस्मानाबादच्या एका निवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा उस्मानाबादी शेळी पालनावरचा एक लेख वाचनात आला.तो वाचून मी त्या डॉक्टरला फोन केला.त्यांनी माझ्या डोक्यात वळवळत असलेला किडा आणखी घट्ट केला.

मी आठवडाभरात उस्मानाबादला जाऊन ४०शेळ्या व दोन बोकड आणले.शेळ्या राखायला एक तरूण मुलगा ठेवला.तेव्हा मी प्रकाशन व्यवसायात पूर्णपणे अडकलो होतो.हा प्रयोग कसाबसा वर्षभर चालला.खूप मानसिक त्रास झाला.पावला पावलावर त्या लेखातील माहिती खोटी ठरत होती.ती सगळी कहाणी लिहायची म्हटली तर स्वतंत्र लेख होईल.यात माझं फार मोठं आर्थिक नुकसान झालं नाही. मात्र वर्षपूर्तीच्या आत एकाच दिवशी सगळ्या शेळ्या विकून मी मोकळा झालो.'घी देखा लेकिन बडगा नही देखा' या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.यावर एक लेख तयार झाला,तेच काय ते फलीत.

मात्र या अनुभवानं मला समृद्ध बनवलं.कोणी कितीही तज्ज्ञ असला तरी,मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.त्याचं म्हणणं मी माझ्या पध्दतीने तपासून बघतो.कोणी शेतकरी कितीही बढाया मारत असला तरी,मी कोणाचंही अनुकरण करीत नाही.मी पूर्णवेळ शेतकरी नसलो तरी,जवळपास एक तप शेतीत गड्यांसोबत प्रत्यक्ष काम करतोय.या अनुभवानं मी समृद्ध झालोय. शेतीतील त्रास, दु:ख आणि आनंदही मला कळलाय.या अनुभवाने मला शिकवलंय की,शेती करणं हे केवळ शारीरिक नाही तर,बौध्दिकही काम आहे. इथं काळं किंवा पांढरं असं नाही. प्रत्येक शेतकऱ्याचा वेगळा अनुभव आहे.

शेतीतील प्रत्येक अनुभवातून मी शिकतोय.एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये असा प्रयत्न करतोय.माझं शेतीशी भावनिक नातं आहे.मी तिला आई म्हणतो.पण मी शेतीकडं भाबडेपणानं नाही तर व्यावहारिक दृष्टीने बघतो. त्यातूनच मी माझी शेतीआधारीत,निसर्गपूरक जीवनशैली विकसित केलीय.माझा खरीपाला सोयाबीन आणि रब्बीला ज्वारी, हे दोनचं पिकं घेण्याचा निर्णय असो की,म्हशीपालन... हे विचारपूर्वक घेतलेले निर्णय आहेत. एखाद्या वर्षाचा अपवाद सोडला तर म्हशीपालन फायद्यातच आहे.कमीत कमी जोखीम,कमीत कमी नुकसान, कमीत कमी मन:स्ताप आणि निसर्गासोबत आनंददायी जगणं , ही माझ्या शेतीची चर्तूसुत्री आहे.अर्थात या शेतीत लाखो रूपयांचा फायदा होणं शक्य नाही.ती जाणीव असल्याने 

अपेक्षाभंगही नाही.

सरकार केंद्रातील असो की,राज्यातील,ते शेतकरी विरोधीच आहेत.शेतकऱ्यांचा कोणी मित्र नाही.ही बाब पक्की लक्षात घेऊनच प्रत्येकाने आपलं नियोजन करण्याची गरज आहे. अतिवृष्टी ते अवर्षण,रोगराई ते वन्यपशू अशा अनेक जोखीम शेतीत आहेतच.त्यावर आजतरी काहीही उपाय नाही. त्यामुळं त्याबद्दल वारंवार रडूनही उपयोग नाही.अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याने आपण केवळ शेतीवर अवलंबून राहणार नाही, हे पाहणे गरजेचे आहे.

शेतीबाहेरचा कोणीही माणूस शेतकऱ्याएवढा हुषार नाही.त्याच्या शेतीचा तोच खरा तज्ज्ञ आहे. त्याने शेतीत कोणतं तंत्र वापरावं,शेती रासायनिक पध्दतीने करावी की सेंद्रीय,याबाबत इतर कोणाचंही अनुकरण करू नये.प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या डोक्याचा नीट वापर करून शेती केली तरच ते या अरिष्टात किमान स्वत:चा बचाव करू शकतील, असं मला वाटतं.

 

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: Only use your own head in farming
Published on: 16 April 2022, 12:52 IST