हे उत्पादन तुलनेने अधिक पौष्टिक असते. या शिवाय मध माशान्द्वारे निर्मित गोड मध मानवी जीवनात अमृत सिंचनाचे कार्य करतो. परंतु सद्य:स्थितीत रासायनिक किडनाशकांचा अनिर्बंध वापर, पृथ्वीच्या तापमानात होत असलेली वाढ, कमी होत चाललेली नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच सातत्याने होत असलेली जंगलतोड यामुळे मधमाशीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आज २० मे जागतिक मधमाशी दिनानिमित्त मानवी जीवन व कृषी व्यवसायातील मधमाशीचे अनन्यसाधारण महत्व याविषयी प्रस्तुत लेखात वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.मधमाशी पालनाचे ऐतिहासिक संदर्भ अतिप्राचीन काळापासून मधमाश्यांच्या पोळ्यांत गोड मध मिळतो, हे मानवास ज्ञात होते. साखरेचा शोध लागण्यापूर्वी खाद्यपदार्थांस गोडी आणण्यासाठी मधाचा वापर होत असे. मानव मध काढीत आहे, असे दर्शविणारे रंगीत चित्र स्पेनमध्ये एका डोंगरातील दगडावर सापडले आहे.
हे चित्र इ. स. पु. ७,००० वर्षे या काळातील असावे, असा अंदाज आहे. त्याही अगोदर प्राचीन भारतीय सभ्यते मध्ये मधमाशी व मधा विषयीचे अनेक संदर्भ आढळून येतात. आयुर्वेदामध्ये मधाच्या औषधीय गुणांचे वर्णन आहे. फार पूर्वीपासून मानवाला मधमाशांबाबत इत्यंभूत माहिती होती, त्याआधारे मधमाशां पाळून मधाचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने संशोधन झाले. त्यामधुन मधमाशाबाबतचे अनेक पैलू अवगत होऊन मधमाशी पालनाचे शास्त्रीकृत तंत्रज्ञान आज विकसित झाले आहे.२० मे जागतिक मधमाशी दिवस :मधमाशीपालन हा पारंपारीक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात ता. २० मे, १७३४ रोजी एका गरीब मधमाशीपालकाच्या कुटूंबात एन्टोन जान्सा या प्रसिध्द मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांनी १७६६ मध्ये युरोपातील पहिले मधमाशी शिक्षण केंद्र सुरू केले. सन १७७१ मध्ये त्यांनी मधमाशी पालनावरील पहिले पुस्तक प्रसिध्द केले. १७७३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशाने जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्या मदतीने संयूक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला, यानुसार २०१८ सालापासून २० मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी’ दिन म्हणून साजरा केला जावु लागला.
भारतात मधाचे दरडोई सेवन अत्यल्प :सातव्या पंचवार्षिक योजनेत सन १९९४-९५ दरम्यान भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाव्दारे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मधमाशी मंडळाची स्थापना झाली. राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या सर्वसाधारण समितीत ६५० सदस्य आहेत. महाराष्ट्र हा पश्चिम क्षेत्राचा सदस्य आहे. मधमाश्या फुलातील पुष्परस गोळा करुन मध तयार करतातच परंतु, त्यासोबतच परागसिंचनाद्वारे पिकांच्या उत्पादनात लक्षणीय भर घालून देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यास मदत करतात. राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या आकडेवारीनुसार सन २०१७-१८ साली भारतातील मध उत्पादन १.०५ लाख मैट्रीक टन होते. तसेच जानेवारी २०१९ पर्यंत ९०९१ नोंदणीकृत लोक हा व्यवसाय करत आहेत. जर्मनीमध्ये दरडोई मधग्रहणाचे प्रमाण १८०० ग्राम असून तेच प्रमाण भारतामध्ये केवळ ८ ग्राम आहे.
मधाचे औषधीय गुणधर्म :मधमाशी आणि मध हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होते. मधामुळे आपल्या शरीराला उष्णता तसेच शक्ती प्राप्त होते. मधातील आंबटपणामूळे उचकी व श्वसन संस्थेतील विकार दुर होण्यास मदत होते. मधामध्ये जीवनसत्व ‘बी’ चे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने अनेक रोग दुर होतात. आपल्या आहारात ज्या ठिकाणी साखर तुपाचा उपयोग केला जातो. तेथे मधाचा उपयोग करता येउ शकतो. साखर अधिक प्रमाणात घेतल्याने पोट फुगणे, अजीर्ण होणे, फोड येणे, मधुमेह होणे असे आजार होउ शकतात. मधाचा उपयोग केल्यास हे विकार टाळले जाऊ शकतात. शुद्ध मध हा शीतल, मधुर, नेत्रास हितकारक, स्वर सुधारणारा, बुध्दीची धारणाशक्ती वाढविण्यासाठी मदत करणारा तसेच कोड, खोकला, पित्त, कफ, मेद, क्षय इत्यादी विकार दुर करणारा नैसर्गिक पदार्थ आहे.
प्रा. डॉ. उपेंद्र शरदचंद्र कुलकर्णी
सहयोगी प्राध्यापक (किटकशास्त्र)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
uskulkarni@pdkv.ac.in
Published on: 14 May 2022, 11:09 IST