खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर पाचटाची कुट्टी करून घ्या.त्यानंतर सरी वरती रोटर मारा व नांगरट करा. नंतर 4.5/5फुटी सरी सोडून सरी वरती आणखीन एकदा रोटर मारून घ्या. म्हणजे पाचट मातीमध्ये चांगले मिसळून जाईल. व त्यानंतर हरभरा पेरणी करा. पाचट कुट्टी केल्यामुळे हरभऱ्याची उगवण थोडी कमी होते.त्यासाठी एकरीं 10किलो बियाणे जादा वापरा.
पेरणी करून पहिले पाणी दिल्यानंतर 30दिवसांनी दुसरे पाणी द्या.डिसेंबर महिन्यात हरभरा केला असेल तर एकरीं 7ते8क्विंटल उत्पादन मिळते.
जर खोडव्या ऊसाची तोडणी जानेवारी फेब्रुवारी मध्ये झाली असेल तर अशावेळी हरभऱ्याची पेरणी लेट झाल्यामुळे उत्पादन फारच कमी येते. हरभरा काढुन मळणी करायला परवडत नाही. अशावेळी हरभरा 65/70 दिवसांनी हुरड्याला आल्यानंतर नांगरट करून मुजवून घ्यावे.
हरभऱ्याला दोन पाणी दिल्याने व पाचट माती मध्ये मिक्स झाल्याने संपूर्ण पाचट 65/70दिवसा मध्ये कुजून जाते.व पाचटापासून 1नं सेंद्रिय खत व हरभऱ्याचे बेवड असा दुहेरी फायदा होतो.
लक्षात घ्या एक एकर हरभरा केला तर ते एकरीं 10ट्रेलर शेणखताच्या पेक्षा त्याची ताकत जास्त होते. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे.माझ्या चुलत बंधूने एक वर्षी खोडवा ऊस बाहेरच्या कारखान्याला लवकर घालवून त्यामध्ये हरभरा केला.माझा खोडवा ऊस लेट तुटल्याने मला हरभरा करणे शक्य झाले नाही
नंतर त्या क्षेत्रात मला जून महिन्या मध्ये लगेच आडसाली ऊस करायचे असल्यामुळे मी एकरीं 10ट्रेलर शेणखत टाकले.व चुलत बंधूने एक चिमटही शेणखत टाकले नाही.नंतर दोघांनी एकाच दिवशी आडसाली लावण केले.बियाणे,पाणी,जमीन, सगळी एकसारखी खते सुद्धा सेम टाकली. दोघांची जमीन देखील एका ठिकाणीच लागून आहे. नंतर दोघांचा ऊस एकाचवेळी एकाच कारखान्याला गेला. आमच्या चुलत बंधूंच्या ऊसाचे उत्पादन माझ्यापेक्षा एकरीं 10टनाने जास्त निघाले.
मी एकरीं 10ट्रेलर शेणखत टाकून देखील माझे उत्पादन त्यांच्यापेक्षा एकरीं 10टनाने कमी आले.त्याच एकमेव कारण म्हणजे त्यांचा बेवड हरभऱ्याचा होता.
लेखक - विनोद भोयर, मालेगाव
प्रतिनिधि - गोपाल उगले
Published on: 19 September 2021, 10:34 IST