Agripedia

सेंद्रिय उत्पादक भीमराव पाटील यांनी केले अंबाडी पिकाचे मूल्यवर्धन

Updated on 20 April, 2022 2:40 PM IST

सेंद्रिय उत्पादक भीमराव पाटील यांनी केले अंबाडी पिकाचे मूल्यवर्धन

घरीही सुरू केले विक्री केंद्र अंबाडी ज्यूसच्या गुणधर्माचा अभ्यास सेंद्रिय उत्पादक भीमराव पाटील यांनी केले पिकाचे मूल्यवर्धन कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकापासून सोनाळा (जि. जळगाव) येथील सेंद्रिय उत्पादक भीमराव पाटील यांनी अर्क व ज्यूसनिर्मिती करून पिकाचे व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. अद्याप या प्रक्रियेकडे व्यावसायिक पद्धतीने त्यांनी पाहिले नसले तरी त्याला बाजारपेठ मिळवण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. 

सेंद्रिय शेतीची कास धरून वडिलोपार्जित 92 गुंठे शेतीत भीमराव पाटील बहुमजली पीक पद्धतीसह आंतरपीक, सापळा पिकांचे प्रयोग सातत्याने करीत असतात. त्यातही देशी कपाशीत लाल अंबाडीचे सापळा पीक घेण्याकडे त्यांचा विशेष ओढा असतो. अंबाडीच्या फुलांकडे आकर्षित होणाऱ्या कीटकांमध्ये "क्रायसोपा' नावाचा मित्र कीटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. कपाशीवरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी अंबाडी सापळा म्हणून काम करते असा त्यांचा अनुभव आहे. भीमराव कपाशीसोबत अंबाडीची लागवड जून महिन्यात पावसाच्या ओलीवर करीत असतात. त्यासाठी देव अंबाडीचे बियाणे वापरले जाते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्याच्या सुमारास अंबाडीची फुले काढणीयोग्य होतात. 

अंबाडीच्या आणखी एका गुणधर्माचा उपयोग भीमराव यांनी खुबीने करून घेतला आहे. तो म्हणजे त्याच्या फुलांच्या पाकळ्यांपासून रसनिर्मिती करण्याचा. मागील वर्षी त्यांच्या मित्रांनी त्यांना अंबाडी रसनिर्मितीचा व्यवसाय सुरू करण्याचे सुचवले. त्याप्रमाणे भीमराव यांनी अंबाडी ज्यूसची विक्री करण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी ठरला. आता व्यावसायिक दृष्ट्या त्यात उतरण्याचा त्यांचा विचार आहे. 

अशी होते अंबाडी ज्यूसनिर्मिती भीमराव यांचे कपाशीचे क्षेत्र - सुमारे 60 गुंठेत्यात लाल अंबाडीचे सापळा पीक.त्याची फुले काढून पाकळ्या वेगळ्या केल्या जातात.कडक उन्हात लाल रंग उडून जाऊ नये म्हणून फुले सावलीत वाळवली जातात.त्यातून 25 ते 30 किलो सुकलेल्या पाकळ्या मिळतात.

फिल्टरच्या पाण्याची प्रक्रिया करून पाकळ्या स्वच्छ धुतल्या जातात.दहा लिटर पाण्याला एक किलो पाकळी असे प्रमाण वापरले जाते.सुमारे 24 तासांनंतर पाकळ्या काढून टाकायच्या.लाल गर्द द्रावण तयार होते. अर्क साडेसात लिटरपर्यंत मिळतो.

अर्क वस्त्रगाळ करून घेणे महत्त्वाचे असते. अर्क अधिक काळ टिकावा यासाठी त्यात प्रति लिटर एक ग्रॅम याप्रमाणे सोडियम बेन्झोईट मिसळले जाते.

हंगामात तयार झालेला अर्क : सुमारे 500 लिटर

अंबाडीच्या अर्कापासून तयार होते सरबत अंबाडीपासून तयार केलेल्या अर्काला थेट ग्राहक मिळवताना येणाऱ्या समस्या लक्षात आल्यापासून भीमराव यांनी अंबाडी अर्कात 30 ते 35 टक्के साखर, सैंधव व जरुरीपुरते पाणी मिसळून रुचकर सरबत तयार केले आहे. अलीकडील काळात मधुमेही रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांच्यासाठी "शुगरलेस' सरबतही तयार केले आहे. 

उपलब्ध पॅकिंग- 200, 500 व 1000 मिलि- प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये. 

दर - अंबाडी अर्क : 110 ते 130 रुपये प्रतिलिटर 

- सरबत - 40 ते 50 रुपये प्रति लिटर

ऍग्रोवनच्या माध्यमातून कंपनी पोचली शेतात

ऍग्रोवनमध्ये यापूर्वी भीमराव पाटील यांच्या सेंद्रिय शेतीची यशकथा प्रसिद्ध झाली होती. ती वाचून नाशिक येथील प्रक्रिया उद्योगाशी संबंधित एका कंपनीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या शेताला भेट दिली. आता भीमराव यांनी तयार केलेल्या अंबाडीचे सरबत व अर्काचे मार्केटिंग व विक्री करण्याची जबाबदारीही कंपनीने उचलली आहे. त्यासाठी भीमराव यांना समाधानकारक दरही दिला आहे. 

घरीही सुरू केले विक्री केंद्र

भीमराव यांनी अंबाडी सरबताच्या बाटल्यांची घरूनही विक्री सुरू केली आहे. बाटल्यांच्या झाकणांचे पॅकिंग करण्यासाठी त्यांनी हॅंडप्रेस खरेदी केले आहे. 200 मिलीच्या प्रति बाटलीसाठी 10 रुपये किंमत आकारली जाते. याशिवाय लहान मुलांसाठी प्लॅस्टिकच्या छोट्या पिशवीतूनही थंडगार बर्फमय अंबाडी ज्यूस विकला जातो. त्याची एक रुपया नगाने दररोज 40 ते 45 संख्येने विक्री होते. भांडवलाची सोय झाल्यावर भविष्यात अंबाडीपासून जॅम, मुरब्बा, जेलीसारखे उपपदार्थ तयार करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. 

अंबाडी ज्यूसच्या गुणधर्माचा अभ्यासऍग्रोवनसह अन्य पुस्तकांच्या माध्यमातून अंबाडीचे आयुर्वेदिक महत्त्व भीमराव यांनी समजून घेतले आहे. शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या ज्यूसचा उपयोग होतो. विशेषतः पोटाच्या विकारांसाठी तो चांगला असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे ते म्हणतात. अजून व्यावसायिकतेवर भर दिलेला नाही. मात्र अंबाडी ज्यूस विक्रीसाठी परवाना काढणे, गुणवत्ता नियंत्रण, त्यांचे प्रमाणपत्र ही प्रक्रिया येत्या काळात सुरू करणार असल्याचेही भीमराव म्हणाले. 

 

भिमराव पाटील

 

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: Oho this farmer earn lot of money form ambadi juice
Published on: 20 April 2022, 02:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)