Agripedia

सोयाबीन पिकातील अन्नद्रव्याच्या किंवा खताच्या व्यवस्थापना संदर्भात आपण काही बाबी जाणून घेणार आहोत.

Updated on 30 May, 2022 5:14 PM IST

(A) नेमकी सोयाबीन पिकात विदर्भासाठी खताची किंवा प्राथमिक अन्नद्रव्याची काय शिफारस आहे?सोयाबीन पिकात 30 किलो नत्र अधिक 60 किलो स्फुरद अधिक 30 किलो पालाश प्रति हेक्टर पेरणी सोबत देण्याची शिफारस आहे. परंतु एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केला असेल म्हणजे हेक्‍टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दिलेले असेल सोबत बियाण्याला जिवाणू खताची बीजप्रक्रिया केली असेल व इतर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा वापर केला असेल तर वर निर्देशित शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा अर्धी होते म्हणजे 15 किलो नत्र अधिक 30 किलो स्फुरद अधिक 15 किलो पालाश प्रती हेक्‍टर या प्रमाणात सोयाबीनला अन्नद्रव्य पुरवठा करावा अशी शिफारस आहे. शक्‍यतोवर सोयाबीन पिकामध्ये खताचे व्यवस्थापन करताना सरळ खते द्यावी परंतू हे शक्य नसल्यास मिश्र खते देताना 20 किलो गंधक प्रति हेक्‍टरी पेरणीच्या वेळी द्यावे(B) सोयाबीन मध्ये एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून खते द्या म्हणजे नेमके काय?

(१) सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्या आणि आपल्या जमिनीसंदर्भात सामू, चुनखडी चे प्रमाण, उपलब्ध नत्र स्फुरद पालाश तसेच उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्य व इतर बाबीची माहिती घ्या व माती परीक्षणाच्या आधारावर शिफारशीप्रमाणे सोयाबीन पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा हा एकिकृत अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा पाया आहे.(२) सोयाबीन पिकाला शिफारशीप्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खत द्या(३) सोयाबीन पिकाला रायझोबियम आणि पीएसबी या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करा(४) सोयाबीन पिकात माती परीक्षणाच्या आधारावर आपल्या जमिनीमध्ये कमतरता असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य शिफारशीप्रमाणे जमिनीत व फवारणीद्वारे द्या.(४) शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा माती परीक्षणाच्या आधारावर योग्य खताची निवड करून पेरणीच्या वेळेस निर्देशित प्रमाणातच द्या.(५) दोन टक्के युरिया किंवा 19 19 19 या द्रवरूप फवारणीच्या खताची शिफारशीप्रमाणे योग्य कालावधीत फवारणी करा.शेतकरी बंधूंनो वर निर्देशित घटक सुयोग रित्या वापरून रासायनिक खताचा माती परीक्षणाच्या आधारावर योग्य तेवढाच वापर करणे म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होय. 

(C) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून एक एकर सोयाबीन पिकाला कोणते सेंद्रिय खत किती प्रमाणात व कधी वापरावे.शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकात जमिनीची तीन वर्षात एक वेळेस पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरट करून दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी व एकरी किमान दोन टन म्हणजेच म्हणजेच किमान साधारणत आठ ते दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत टाकावे व नंतर वखराची पाळी देऊन हे शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.(D) सोयाबीन पिकात सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा प्रति एकर वापर कसा , कधी व किती प्रमाणात करावा?शेतकरी बंधूंनो पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम सूक्ष्म अन्नद्रव्य करता माती परीक्षण करून घ्या आणि माती परीक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर सोयाबीन पिकात करावा. सर्वसाधारणपणे विदर्भाच्या जमिनीत झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवते. माती परीक्षणाच्या अहवालात झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास एकरी चार ते सहा किलो झिंक सल्फेट तसेच चुनखडीयुक्त

जमिनीत जमिनीत फेरस लोहाची कमतरता असेल तर एकरी चार ते सहा किलो फेरस सल्फेट तसेच जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता असल्यास तीन वर्षातून एकदा एकरी दोन ते चार किलो बोरॅक्स किंवा बोरॉन या प्रमाणात घेऊन शेणखतात मिसळून सोयाबीनच्या पिकाला पेरणीच्या वेळेस द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्य खताचा वापर रासायनिक खतांबरोबर टाळून सेंद्रिय खत म्हणजे शेण खताबरोबर केल्यास या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत याची क्रियाशीलता व उपलब्धता वाढविण्यास मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता उभ्या सोयाबीनच्या पिकात आढळून आल्यास योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारून सुद्धा देता येतील.(E) सोयाबीन पिकात जैविक खताचा वापर प्रती एकर कसा, कधी, व किती प्रमाणात करावा?शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकाला 750 ग्रॅम सोयाबीनचे रायझोबियम म्हणजे रायझोबियम जापोनिकम व 750 ग्रॅम पीएसबी या जिवाणू खताची प्रति 30 किलो बियाण्यास (म्हणजेच एक एकराच्या बियाण्याला) या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी.

रायझोबियम व पीएसबी हे द्रवरूप स्वरुपात असतील तर त्यांचे बीज प्रक्रिया चे प्रमाण प्रत्येकी अडीचशे ते तीनशे मिली प्रति 30 किलो बियाण्यास या प्रमाणात ठेवावे. शेतकरी बंधूंनो ही बीज प्रक्रिया करताना 100 ग्रॅम गुळ एक लिटर पाण्यात टाकून पाणी कोमट करावे व नंतर थंड होऊ द्यावे व आवश्यकतेनुसार संबंधित प्रमाणात वर निर्देशित जिवाणूखत बीजप्रक्रिया करण्यासाठी घेऊन बीज प्रक्रिया करावी व बियाण्यावर जिवाणू खत चिटकून राहण्याकरता त् थंड गुळाच्या द्रावणाचा किंचित शिडकावा मारावा. सोयाबीनची बियाणे नाजूक असल्यामुळे हे बियाणे ओले गच करणे टाळावे, हाताने चोळणे टाळावे तसेच पेरणी आधी अर्धा ते एक तास ही बीज प्रक्रिया करून सावलीत बियाणे वाळवून ताबडतोब पेरणी करावी. जिवाणू खताची बीजप्रक्रिया रासायनिक बुरशीनाशके किंवा रासायनिक कीटकनाशके यांच्याबरोबर करू नये तसेच रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया करावयाची झाल्यास ती प्रथम करावी व नंतर 15 ते 20 मिनिटानंतर जैविक खताची किंवा जैविक निविष्ठा ची बीज प्रक्रिया करावी व रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया केली असल्यास जीवाणू खत वापराचे प्रमाण शिफारशीपेक्षा दीडपट किंवा दुप्पट ठेवावे.(F) सोयाबीन सोयाबीन पिकात प्रती एकर रासायनिक खताची मात्रा कोणत्या रूपात, कधी, व किती प्रमाणात द्यावी?

शेतकरी बंधुंनो सोयाबीन पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केला असेल म्हणजे माती परीक्षणाच्या आधारावर शेणखत दिले असेल जिवाणू खताची बीजप्रक्रिया केली असेल तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये याच्या कमतरते प्रमाणे जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला असेल व इतर शिफारशीत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा वापर केला असेल तर सर्वसाधारण शिफारशीप्रमाणे सोयाबीन पिकात एक एकर सोयाबीन पिकाकरिता करिता पेरताना 13.04 किलो युरिया, 75 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या सरळ खताच्या रूपात खते जमिनीत 5 ते 7 सेंटीमीटर खोल पडतील अशी काळजी घेत पेरावीत. शेतकरी बंधूंनो स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या रूपांत दिल्यामुळे सोयाबीन पिकाला लागणारा गंधक यां अन्नद्रव्यांची मात्रा सुद्धा सोयाबीन पिकाला पुरवल्या जाते. शेतकरी बंधूंनो याठिकाणी प्रती एकर सरळ खताच्या रूपात मात्रा काढून दिले आहेत. इतर खताचा रूपात मात्र द्यायचा झाल्यास शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याचा पुरवठा होतो का तसेच गंधकाचा सुद्धा पुरवठा होतो का व आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे या सर्व गोष्टीचा विचार करून तज्ञांचा सल्ला घेऊन शिफारशी प्रमाणे माती परीक्षण अहवालाच्या आधारावर सोयाबीन पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. 

विशेषता सिंगल सुपर फास्फेट चा रुपात स्फुरदाची मात्रा दिल्यामुळे अतिरिक्त खताची मात्रा देऊन गंधक वेगळा पुरवठा करण्याची गरज पडत नाही.(G) सोयाबीन पिकाला फवारणी युक्त खताचा वापर करून खताची मात्रा कशी द्यावी?(१) शेतकरी बंधूंनो सोयाबीनच्या अधिक उत्पादन करतात शिफारशीत रासायनिक खत व इतर खताच्या मात्रे बरोबर पेरणीनंतर 50 व 70 दिवसांनी दोन टक्के युरिया म्हणजे दोन किलो युरिया अधिक 100 लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करू द्रावण तयार करून फवारणी करावी किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत दोन टक्के (200 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन) 19 :19 :19 या या विद्राव्य खताची फवारणी करावी.(२) शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकात पाण्याच्या ताणाचे अवस्थेत पिक फुलोरा अवस्थेनंतर पंधरा दिवसांनी एक टक्का पोटॅशिअम नायट्रेट म्हणजेच 100 ग्रॅम 13 : 0 : 45 अधिक दहा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन या विद्राव्य खताची आवश्यकतेनुसार फवारणी करावी.(३) शेतकरी बंधुंनो सोयाबीन पिकात चुनखडीयुक्त जमिनी मध्ये लोहाच्या कमतरतेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात व योग्य उत्पादन मिळत नाही त्यामुळे माती परीक्षण करून घ्या चुनखडीयुक्त जमिनीत

लोहाची कमतरता असल्यास फेरस सल्फेट 0.5% (50 ग्रॅम) + 0.25 टक्के (25 ग्रॅम) कळीचा चुना अधिक दहा लिटर पाणी या मिश्रणाची फवारणी दोन वेळा म्हणजे पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये लोहाची कमतरता असेल तरच शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.(H) सोयाबीन पिकात खत व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या सर्वसाधारण काळजा.(१) सोयाबीन पिकात माती परीक्षणाच्या आधारावर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करूनच खताची किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा.(२) असंतुलित अविवेकी व अतिरेकी खताचा वापर टाळा विशेषता उभ्या पिकात नत्रयुक्त खताचा अवाजवी वापर टाळा.(३) आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खताची निवडून निवड करून शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा त्या खतातून शिफारशीप्रमाणे जाते का तसेच ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे का व जमिनीच्या आरोग्यासंदर्भात सुद्धा ते हितावह आहे का या सर्व बाबीची शहानिशा करून शास्त्रोक्त शिफारशीप्रमाणे सोयाबीन पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन किंवा खताचे व्यवस्थापन करा.

 

राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

English Summary: Now look at this soybean crop nutrient (fertilizer management) can save you a lot of money.
Published on: 30 May 2022, 05:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)