उन्हाळी मुगाची पेरणी करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून ढेकळे चांगली फोडून घेऊन वखराच्या उभ्या-आडव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी व काडीकचरा वेचून घ्यावा. शेवटच्या वखरणीच्या वेळेस एकरी साधारणता दोन टन किंवा एकरी 6 ते 8 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळून द्यावे व शेवटची वखराची पाळी देऊन शेण खत जमिनीमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावे.
उन्हाळी मूग या पिकाला उन्हाळ्यातील स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान विशेष मानवते आणि खरिपाच्या तुलनेत उन्हाळी मूग पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो. उन्हाळी मुगाची पेरणी करताना साधारणता 20 फेब्रुवारी ते मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. उन्हाळी मुगाच्या पेरणीला फार उशीर झाल्यास या पिकाचा फुलोरा कडक किंवा जास्त उन्हात सापडून त्याचा विपरीत परिणाम शेंगा लागण्यावर तसेच जास्त उशीर पेरणीस केल्यास उन्हाळी मुगाचे पीक मान्सून पूर्व पावसात सापडून उन्हाळी
मुगाची नुकसान होण्याची शक्यता असते म्हणून योग्य शिफारशीत वेळी उन्हाळी मुगाची पेरणी करावी.उन्हाळी मुगाच्या लागवडीसाठी संबंधित कृषी विद्यापीठाच्या संबंधित कृषी तज्ञांनी सांगितलेल्या किंवा सल्ला दिलेल्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची प्रत्यक्ष सल्लामसलत करून निवड करावी. साधारणपणे BM 2003-2, PKV AKM -4 , वैभव, फुले एम 2, BM 4 यासारख्या वानाची प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन संबंधित कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याने वाणाची निवड करणे केव्हाही योग्य.
वर निर्देशित वानाचे उपलब्धते संदर्भात महाबीज, संबंधित कृषी विद्यापीठ, नामांकित शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच शासन मान्यताप्राप्त इतर बीजोत्पादन कंपन्या यांचेकडे विचारणा करावी तसेच पेरणी करता दर्जेदार, प्रमाणित, योग्य उगवण क्षमता असणारे तसेच आदर्श बियाण्याचे मानके पूर्ण करणारे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे. वाण निवडण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घ्यावा. पेरणीपूर्वी उन्हाळी मुग बियाण्यास रायझोबियम व पीएसबी या जिवाणू खताची प्रत्येकी अडीशे ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी. उन्हाळी मूग पिकात मुळकुजव्या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी.
उन्हाळी मुगाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 30 सेंटिमीटर व दोन झाडांतील अंतर 1O सेंटिमीटर राहील याप्रमाणे पेरणी करावी व प्रती एकर साधारणपणे पाच ते सहा किलो बी पेरणीसाठी लागेल म्हणजेच हेक्टरी 12 ते 15 किलो प्रति हेक्टर बियाणे लागेल हे नियोजन ठेवून पेरणी करावी. शिफारशीत झाडाची संख्या शेतात राहील यादृष्टीने नियोजन करावे.उन्हाळी मुगाचे पिकास खताचे व्यवस्थापन करताना साधारणता 20 किलो नत्र अधिक 40 किलो स्फुरद प्रति हेक्टर व माती परीक्षणाच्या आधारावर गरजेनुसार 20 किलो पालाश प्रती हेक्टर अशी शिफारस पेरणीच्या वेळेस देण्याची डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचेकडून करण्यात आली आहे.
सर्वसाधारणपणे ह्या शिफारसी गृहीत धरून माती परीक्षणाच्या आधारावर उन्हाळी मुग पिकास पूर्वमशागतीच्या वेळेस एकरी सहा ते आठ गाड्या चांगले कुजलेले शेणखत देऊन शेवटची वखर पाळी देऊन जमिनीत चांगले शेणखत मिसळून घ्यावे. नंतर पेरणीच्या वेळेस प्रती एकर 15 ते 16 किलो युरिया व 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट तसेच माती परीक्षणाच्या आधारावर गरजेनुसार एकरी 12 ते 15 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रती एकर पेरणीच्या वेळेस द्यावे. डीएपी या रुपात खत द्यावयाचे झाल्यास पेरणी करताना प्रती एकर साधारणता 40 किलो डीएपी पेरताना द्यावे व त्याबरोबर 12 ते 15 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
सरळ खतातून नत्र स्फुरद व पालाश यांची मात्रा दिल्यास योग्य ठरते व स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटच्या रूपात दिल्यास स्फुरद या अन्नद्रव्या बरोबर गंधकाचा सुद्धा पुरवठा होतो.उन्हाळी मुगाचे पेरणीनंतर साधारणता 15 ते 20 दिवसांनी पहिली व 25 ते 30 दिवसानंतर दुसरी कोळपणी करून उन्हाळी मुगाचे पीक तणविरहित व भुसभुशीत ठेवावे. गरजेनुसार उन्हाळी मूग पिकात एक किंवा दोन वेळा निंदन करावे तसेच उन्हाळी मुगाचे पीक सुरुवातीच्या एक ते दीड महिन्याच्या काळात तणविरहित राहील याची काळजी घ्यावी.
उन्हाळी मुगाच्या पिकात जमिनीत पाणी देऊन वाफसा आल्यावर पेरणी केल्यास योग्य उगवण मिळते तसेच उन्हाळी मूग पिकात जमिनीच्या मगदुरानुसार साधारणता 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे असते व फुले व शेंगा धरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. उन्हाळी मूग पिकात पाणी देताना तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची बचत होते व पाण्याचा योग्य विनियोग होतो तसेच पाट पाण्याच्या तुलनेत तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास मूळकुजव्या सारख्या रोगाचा बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध मिळतो.
उन्हाळी मुग पिकात तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी तसेच पाने खाणाऱ्या अळ्या यांचा तसेच भुरी केवडा व मूळकूज या सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याकरिता शेतकरी बंधूंनी योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती उपाययोजना अमलात आणावी. उन्हाळी मूग पिकावर किडी करीता प्रतिबंधात्मक बाब म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी
उन्हाळी मुगाच्या 75 टक्के शेंगा वाळल्यानंतर पहिली तोडणी व त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दुसरी शेंगाची तोडणी करावी व मुगाचे पीक चांगले वाळवून कडुनिंबाचा पाला टाकून साठवणूक करावी तसेच उन्हाळी मुगाच्या साठवणुकीत येणाऱ्या किडीपासून प्रतिबंधक करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीने साठवण करावी.
टीप : वर निर्देशित बाबी ह्या उन्हाळी मुग संदर्भातील काही मूलभूत बाबी आहेत त्याचा वापर करण्यापूर्वी स्थानिक कृषी विद्यापीठाचे तज्ञ तसेच संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशी तसेच प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच त्याचा गरजेनुसार अंगीकार करावा.
(२) कोणत्याही रसायनाची फवारणी करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे रसायने वापरावी तसेच अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे व सुरक्षित फवारणी तंत्राचा अंगीकार करावा.
Published on: 14 February 2022, 12:12 IST