Agripedia

शाश्वत व बाहेरील निविष्ठांवर आधारित नसलेली आणि पूर्णतः रसायनमुक्त व पर्यावरण पूरक शेती पद्धतीकडे जाण्याची वेळ आता आली आहे.देशी गाई पासून निर्मित होणाऱ्या निविष्ठांच्या वापर केंद्र स्थानी असणारी शेती पद्धती कि ज्या मध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर निषिद्ध आहे.

Updated on 06 December, 2022 2:38 PM IST

शाश्वत  व बाहेरील निविष्ठांवर आधारित नसलेली आणि पूर्णतः रसायनमुक्त व पर्यावरण पूरक शेती पद्धतीकडे जाण्याची वेळ आता आली आहे.देशी गाई पासून निर्मित होणाऱ्या निविष्ठांच्या वापर केंद्र स्थानी असणारी शेती पद्धती कि ज्या मध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर निषिद्ध आहे. विषमुक्त शेती उतपादने निर्माण करून शेती उत्पादन खर्च कमी करणे हा या शेती पद्धतीमधी महत्वाचा मुद्दा आहे.जंगला मध्ये झाडे, फळे, फुले ज्या नियमाने येतात त्याच नियमाने आपल्या शेतात फळे धान्य फुले पिकली तर ती नैसर्गिक शेती  होईल.

आज संपूर्ण जगात ‘शाश्वत जीवनशैली’ ची चर्चा आहे, शुद्ध आहार-विहार  यावर चर्चा होत आहे. हे एक असं क्षेत्र आहे, ज्यात भारताकडे हजारो वर्षांचा अनुभव आहे, ज्ञान आहे. आपण शतकानुशतके यात जगाचे नेतृत्व केले आहे. म्हणूनच आज आपल्याला संधी चालून आली आहे, की आपण नैसर्गिक शेती सारख्या उपक्रमांत पुढे येऊन शेतीशी संबंधित जागतिक शक्यतांचा लाभ सर्वांपर्यंत पोचवायला हवा.

नैसर्गिक शेती मध्ये बहुतांश शेतकरी जीवामृत, बीजामृत, आच्छादनाचा वापर, मिश्र / अंतर पिके /वापसा इत्यादी गोष्टींचा वापर उतरत्या क्रमाने करतात. असे  अभ्यासाअंती दिसून आले आहे.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक शेती ला अनेक नावाने ओळखले जाते. जसे कि झीरो  बजेट नैसर्गिक शेती, प्राकृतिक खेती, शास्वत शेती, रसायन मुक्त शेती इत्यादी.

सध्या केंद्र सरकार नैसर्गिक शेती ला भारतीय  प्राकृतिक खेती पद्धती या नावाने प्रोत्साहित करत आहे.नीती आयोगाने पुरस्कृत केलेल्या व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ल्ली यांच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रबंधन संस्था हैदराबादआणि कोरडवाहू शेती मध्यवर्ती  संशोधन संस्था हैदराबाद  यांच्या संयुक्त रित्या केलेला अभ्यास " भारतीय शेतकर्यांमध्ये  नैसर्गिक शेतीचे अवलंब व त्यांच्या शेती उत्पन्न व राहणीमान यावर झालेला परिणाम " नुसार खालील महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

नैसर्गिक शेतीचे फायदे :-

१. पीक उत्पादन खर्च कमी .

२ रसायन मुक्त शेती

३. चवदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन

४ उत्पादनास ज्यादा दर

५ दुष्काळात सुद्धा शास्वत  उतपादन

६. मातीची गुणवत्ता सुधारते

७. किडींचा प्रादुर्भाव कमी होतो

८. कीटकनाशकांचा वापर नाही.

९. नैसर्गिक शेती हि हवामान बदलास लवचिक आहे.

१०. वाढत्या रासायनिक खतांची मागणी कमी करण्यास व त्यापोटी लागणाऱ्या अनुदानाची बचत होते.

देशातील नैसर्गिक शेती ची सद्य स्थिती :-

सध्या भारतात नैसर्गिक शेती खाली असणारे क्षेत्र आंध्र प्रदेश , मध्यप्रदेश, छत्तीसगढ, केरळ, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात विस्तारले आहे. मध्य प्रदेश मध्ये सुद्धा नैसर्गिक शेती अंतर्गत लक्षणीय क्षेत्र विकास होताना दिसतेय.

केंद्र सरकारच्या २०२२ च्या अर्थसंकल्पातही रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला (Chemical Free Natural Farming) देशभर प्रोत्साहन देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. तर नुकतेच नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल (Surat Model Of Natural Farming) देशासाठी आदर्श ठरेल, असे जाहीर करण्यात आले होते.

सुरत मॉडेलमध्ये एका ग्रामपंचायतीमधून ७५ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्यात आले असून, असे देशभरातील ग्रामपंचायतीमध्ये झाले पाहिजेत, असाअट्टहास आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज ) हैद्राबाद यांना नैसर्गिक शेतीचे उत्कृष्टता केंद्र व ज्ञान संग्रहस्थान( CENTRE OF EXCELLENCE KNOWLWDGE REPOSITARY) म्हणून केंद्र सरकारने नियुक्त केले आहे.  भारतात नैसर्गिक शेती बाबत सखोल संशोधन होण्या साठी गुजरात राज्यात कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

भविष्यातील संधी :-

‘पारंपारिक शेती विकास योजना’ आणि ‘भारतीय कृषी पद्धत’ या सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संसाधनं, सुविधा आणि मदत दिली जात आहे. या योजनेअंतर्गत देशात 30 हजार क्लस्टर बनवले गेले आहेत, लाखो शेतकरी याचा लाभ घेत आहेत. पारंपारिक शेती विकास योजने अंतर्गत देशात जवळपास 10 लाख हेक्टर जमीनीचा समावेश केला  जाणार आहे.

नैसर्गिक शेतीचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभाव बघून ही योजना नमामि गंगे प्रकल्पाशी जोडली आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आज देशात गंगेच्या काठांवर वेगळी मोहीम चालवली जाते आहे, मार्गिका बनविली जाते आहे. नैसर्गिक पिकांना बाजारपेठांत वेगळी मागणी असते, त्याला किंमत देखील जास्त देण्यास ग्राहक तयार आहे. सध्या नसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेती उत्पादनाना बाजार भाव मिळण्यासाठी वेगळी यंत्रणा प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विकसित होणे काळाची गरज आहे.

नैसर्गिक शेतीच्या उत्पादनाना प्रमाणित करण्यासाठी, कारण यात जे उत्पादन होईल त्याचे वैशिष्ट्य असायला हवे, त्याची ओळख असायला हवी, आणि यासाठी शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळायला हवेत, म्हणून ही उत्पादने प्रमाणित करण्याची व्यवस्था केली आहे.

त्या प्रमाणिकरणासाठी गुणवत्ता सुनिश्चित करणारी व्यवस्था देखील बनविली आहे. अशा प्रकारे प्रमाणित पिकं आपले शेतकरी चांगल्या किमतीला निर्यात करत आहेत. आज जगाच्या बाजारपेठेत रसायन मुक्त उत्पादने ही सर्वात मोठे आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. आपण याचा लाभ देशातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवला पाहिजे.

नैसर्गिक शेती मधील आव्हाने :-

१. संकरित पिकांच्या वानांचा वापर वाढल्यामुळे रासायनिक खतांचा भरमसाठ वापर वाढला, त्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आणि त्या मुळे रासायनिक कीटक नाशकांचा वापर वाढला त्यातून जमिनीतील भौतिक रासायनिक व जैविक घटकांचे संतुलन बिघडले. एक किलो तांदूळ उत्पादनासाठी ३५०० ते ४००० लिटर पाणी लागते.

ज्या भागात जास्त पाणी लागणारे पिके होतात त्या भागात भूजलस्तर लवकर खालावतो. डॉक्टर एम एस स्वामिनाथन यांनी पंजाब व हरियाणा या राज्यात असेच पीक पद्धती राहिली तर भविष्यात तिचे वाळवंट होईल असे भाकीत करून ठेवले आहे.

२.जमिनीत यांत्रीकीकरण मुळे कडक भूस्तराची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी मुरत नाही. ते न थांबता पळते. व कधी कधी पूर परिस्थिती निर्माण होते. या सगळ्यात जमिनीतून बाहेर काढलेले पाणी परत जमिनीत मुरणे आवश्यक असते त्याचे रिचार्जिंग होणे आवश्यक असते परंतु असे होत नाही. भविष्यात भू-गर्भातील पाणी पातळी अधिक खाली गेल्याने फारच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे दिसते. 

३.रासायनिक शेती मध्येकाही पिकांना अधिक पाणी व खतांची आवश्यकता असते त्यामुळे नैसर्गिक स्तोत्रांवर अधिक ताण येतो.

४. सुरुवातीला रासायनिक शेती कडून नैसर्गिक शेतीकडे वळल्यास निश्चितच काही अडचणी येणार आहेत. पण त्या कायम स्वरूपी नसणार आहेत. कारण या जमिनीतील सेंद्रीय कर्ब अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे जमिनी नापीक झाल्या आहेत. सुरुवातीला कीड रोगाचे प्रमाण जास्त राहणार. त्यासाठी निमास्त्र, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र इत्यादी नैसर्गिक घटकापासून तयार झालेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. बुरशीजन्य  रोगांसाठी जास्त आंबट ताक फवारावे. 

जसे  या जमिनीतील रासायनिक कीटक नाशके / खतांचा वापर कमी होईल व जैविक निविष्ठांचा वापर वाढेल तस तसे सेंद्रिय कर्ब् वाढेल जमिनीचे  भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात वाढ होईल. व हळू हळू उत्पादकता वाढेल. आणि मग शत प्रतिशत नैसर्गिक शेती प्रणाली विकसित होईल

नैसर्गिक शेती पद्धती एक परंतु फायदे अनेक :

१. रासायनिक व जैविक शेती ग्लोबल फार्मिंग ला जन्म देती परंतु नैसर्गिक शेती मध्ये  ग्लोबल फार्मिंग ला समाप्त करतेय. २. पाणी जवळपास ५० टक्क्यांनी कमी लागते.

३. पुढील पिढीला विष मुक्त भूगर्भातील पाणी मिळेल.

४. या पद्धितीत लागणाऱ्या निविष्ठा गाई पासून मिळतात देशी गाईं वर संशोधन करून त्यात सुधार झाला तर पर्यावर्णासाठी पूरक अशा निविष्ठाचा वापर वाढेल त्यातून जमिनीतील, भुगर्भातील होणारे प्रदूषण कमी होईल.

५. देशी गाई हि जिवाणूंची चालती  फिरती फॅक्टरी आहे. तिचे दूध अ-२ या प्रकारातील आहे ते मानवासाठी अत्यंत गुणकारी आहे. 

कोरोना महामारी आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे बदललेल्या जागतिक व्यापाराने संपूर्ण जगाला अन्नसुरक्षेची चिंता लागलेली आहे. त्यातच हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे.

पुढील काळात शेती मध्ये अजून काही आव्हाने समोर येतील त्या साठी आत्ताच नाही तर कधी नाही या तत्वाने शेती पद्धती मध्ये बदल करणे गरजेचे आहे.  नैसर्गिक शेती जनसामान्य लोकापर्यंत पोहोचविण्यास अजून काही गोष्टींचा अंतर्भाव होत राहील कि ज्या मुळे  हि पद्धती आत्मसात करण्यात अधिक सोपे होईल.

English Summary: Natural Farming: Concepts, Future Opportunities and Challenges
Published on: 06 December 2022, 02:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)