यामध्ये मुख्यतः तीन गोष्टी आहेत.
एक म्हणजे मातीतील जीवाणू आणि वनस्पतींमध्ये जे परस्परावलंबित्वाचे नाते आहे .त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर व्हायला हवा.
दुसरे म्हणजे हा फायदा फक्त आपण लावलेल्या पिकाला मिळायला हवा, त्याचा फायदा घेऊन आगंतुक तण वगैरे वाढता कामा नये.
तिसरे म्हणजे आपण लावलेल्या पिकातून मिळणारे उत्पादन आपल्याला मिळायला हवे, कीटक, पक्षी, वगैरे आयतोबांवर मात करता यायला हवी.
आपल्या परिसंस्थेतील सजीवांच्या अन्नसाखळीचा, त्यांच्या एकमेकांवर असलेल्या अवलंबित्वाचा या तीन दृष्टिकोनांतून विचार करत गेले, की आपल्या शेतीसाठी कोणती नैसर्गिक शेती पध्दती योग्य आहे, याचा आपला आपल्याला शोध लागत जातो. वरील तीन तत्वे डोळ्यापुढे ठेऊन आपल्या शेताच्या निरीक्षणातून प्रत्येक शेतकरी आपली-आपली पध्दत विकसित करू शकतो. पण ज्ञान मोकळेपणाने सर्वांना वाटण्याची आपली परंपरा नसल्यामुळे म्हणा, किंवा स्वतः अवलंबत असलेल्या पध्दती यशस्वी होण्याची नेमकी कारणे काय हे माहित नसल्यामुळे म्हणा, काही लोकांनी नैसर्गिक शेतीभोवती एक गूढतेचे वलय निर्माण केले आहे. स्वतःचे डोके वापरण्यापेक्षा एखाद्या गुरूला शरण जाणे सोपे असल्यामुळे शेतकरीही या सापळ्यात सापडत गेले आहेत. आपण वरील तिन्ही तत्वांची आणि त्याबाबत असणाऱ्या गैरसमजांची चर्चा करू या.
नमूद केल्याप्रमाणे जीवाणू जमिनीतील खनिज पोषणद्रव्ये पाण्यात विद्राव्य स्वरूपात उपलब्ध करून देतात, आणि वनस्पती जीवाणूंना कर्बयुक्त अन्न पुरवतात. रासायनिक तसेच सेंद्रीय शेतीतून हे दिसून आले आहे, की पाण्यात विद्राव्य स्वरूपातल्या पोषणद्रव्यांची जमिनीतील मात्रा वाढली, तर वनस्पतींची वाढ अधिक जोमाने होते, आणि त्या पिकाचे उत्पन्नही वाढते. याचाच अर्थ असा, की जमिनीतील जीवाणूंनी अधिक कार्यक्षमतेने आणि वेगाने अविद्राव्य खनिजांचे रूपांतर विद्राव्य पोषणद्रव्यांमध्ये केले, तरी बाहेरून खते घालण्याचा जो अनुकूल परिणाम होतो, तो खते न घालता साध्य होईल. मातीतील जीवाणूंची सुदृढता आणि संख्या वाढली, तर हे घडू शकते. मातीतील जीवाणूंची वाढ किती होणार ह्यामधला नियंत्रक घटक आहे, जीवाणूंना उपलब्ध असलेली कर्बोदके.
आज हे खाद्य कोणकोणत्या माध्यमातून जीवाणूंना मिळते आहे. संशोधनातून अनेक विस्मयकारक गोष्टी पुढे आल्या आहेत.
सर्व वृक्ष आपली पाने जमिनीवर टाकतात. ही पाने वाळलेल्या पाचोळ्याच्या रूपाने जमिनीवर पडतात आणि ती तिथेच कुजतात. वनस्पतिभक्षक वाळलेला पाचोळा खात नाहीत, कारण गळणा-या पानांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टॅनिन आणि तत्सम पदार्थ साठविलेले असतात की ही गळलेली पाने त्यांना पचवताच येत नाहीत. पानांप्रमाणेच वनस्पतींची फुले व पाकळ्याही जमिनीवर पडतात. वृक्षांखाली पडलेली फुले आपण पहातो. वाळलेली पाने आणि फुलांच्या पाकळ्या या दोन्ही पदार्थामधील सेल्युलोज या कर्बोदकाचा जीवाणूंना अन्न या नात्याने उपयोग होतो. मोहाच्या पाकळ्यांमध्ये तर शर्कराही असते. फुलांच्या पाकळ्या आणि वाळलेलला पाचोळा यांच्यात खनिज घटकांचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे या पदार्थांचा उपयोग केवळ कार्बनचा स्रोत म्हणूनच होतो, आपल्या वाढीसाठी लागणारे खनिज घटक जीवाणूंना मातीतूनच मिळवावे लागतात.
अनेक वनस्पतींच्या पानांमधून रात्रीच्या वेळी जमिनीवर पाणी ठिबकते आणि या पाण्यातही काही कर्बोदके विरघळलेली असतात. उदा. ज्वारीच्या पानांमधून ठिबकणा-या पाण्यात साखर विरघळलेलेली असते तर हरभ-याच्या पानांतून ठिबकणा-या पाण्यात मॅलिक आम्ल हे सेंद्रिय आम्ल असते. हे दोन्ही घटक या वनस्पतींनी प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वतः निर्माण केलेले असतात आणि पानांमधून ठिबकणारे पाणी त्यांनीच जमिनीतून कित्येक डेसिमीटर खोलीवरून खेचून वर आणलेले असते. त्यामुळे इतक्या परिश्रमांनी मिळविलेले हे घटक वनस्पती जमिनीवर का टाकतात हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला. त्या प्रयोगात प्रथम एक किलोग्रॅम माती घेऊन तिला निव्वळ पाणी दिले, आणि तिच्यात प्रति ग्रॅम किती जीवाणू आहेत ते पाहिले. मग थोड्याशा पाण्यात केवळ अर्धा ग्रॅम साखर विरघळवून ते पाणी या मातीत मिसळले आणि चोवीस तासांनी त्याच मातीतल्या जीवाणूंची गणना केली. या दुस-या गणनेत जीवाणूंची संख्या पाचशे पटींनी वाढलेली दिसली. या प्रयोगाने कर्बोदकांमुळे मातीतल्या जीवाणूंची वाढ होते हे तर सिद्ध झालेच, पण हे जीवाणू आपल्या वाढीसाठी लागणारे खनिजघटक मातीतून घेऊ शकतात याचाही या प्रयोगाद्वारे पुरावा मिळाला, कारण शुद्ध साखरेत कोणतेच खनिज घटक नसतात.
वनस्पतींनी निर्माण केलेली साखर मातीत मिसळण्यासाठी त्यांना मावा या कीटकाचीही मदत होते. मावा ही कीड लागवडीखालील सर्व वनस्पतींवर तर आढळतेच पण जंगलात वाढणा-या वनस्पतींवरही ती आढळते. अगदी सूचिपर्णी वृक्षांवरही मावा आढळतो. हा कीटक आपली सोंड वनस्पतीच्या अन्नवाहक नलिकेत खुपसून तिच्यातून अन्न शोषून घेतो. वनस्पतींवर आढळणारा मावा हा मादी कीटक असतो. ही मादी वनस्पतींवरच आपले प्रजनन करते. प्रजनन करणा-या सर्व मादी कीटकांना प्रथिनांची अधिक प्रमाणात गरज पडते. त्यानुसार ही मादी वनस्पतींमधून शोषून घेतलेल्या अन्नातून मुख्यतः प्रथिने आपल्या शरिरात ठेवून घेत अतिरिक्त शर्करा आपल्या शरिरातून बाहेर टाकते. ही शर्करा खालच्या पानांवर आणि जमिनीवरही पडते. शेतकरी या शर्करेला चिकटा असे संबोधतात. म्हणजे वनस्पतींवर येणारे सर्व कीटक उपद्रवीच असतात, असे नाही.
आपण जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंना संपूर्णपणे दुर्लक्षित करून शेतातल्या वनस्पतींना लागणारी खनिजद्रव्ये ही रासायनिक खते, कंपोस्ट खत, शेणखत किंवा गांडूळ खत या रूपात मोठ्या मात्रेने थेट जमिनीतच घालतो. ही पद्धती खर्चिक तर आहेच पण अनावश्यकही आहे. आपले शेत जर पाणथळ नसेल तर त्यातल्या मातीत नक्कीच कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजंतू वास करीत असणार. अशा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आपल्याला फक्त या जीवाणूंची संख्या वाढवावयाची आहे आणि त्यासाठी त्यांना उच्च पोषणमूल्य असलेल्या कार्बनयुक्त अन्नाचा पुरवठा करणे आवश्यक आहे. हे अन्न आपण अगदी सहज उपलब्ध असणा-या कर्बोदकांच्या स्वरुपात देऊ शकतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मिलिंद जि गोदे
Published on: 06 December 2021, 08:43 IST