ऊस हे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासामधील मुख्य घटक आहे परंतु दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ३ साच्या दर हेक्टरी उत्पादन क्षमतेत घट होत आहे. महाराष्ट्रामधील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पीकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या ऊसाइतकेच येऊ शकते. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त येऊ शकते.
खोडवा पिकापासून होणारे फायदे:
१. लागण ऊसाप्रमाणे खोडवा पिकासाठी पूर्वमशागत करावी लागत नसल्याने जमिनीतील पूर्व मशागतीवरील खर्च वाचतो.
२. पूर्व मशागतीवरील खर्चाबरोबरच शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते.
३. खोडवा घेतल्यामुळए ऊस लागवडीसाठी लागणारे ऊस बेणे, बीजप्रक्रिया व ऊस लागवड इत्यादीबाबतीत खर्चात बचत होते.
४. खोडवा पीक लागण पिकापेक्षा एक ते दीड महिना लवकर तयार होते.
५. खोडवा पिकास फुट होण्यासाठी जमिनीतील कांड्यावर भरपूर डोळे असतात. त्यामुळे ऊसांची संख्या लागणीच्या ऊसापेक्षा जास्त मिळते.
६. खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करते. त्यामुळे पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फारशी तफावत पडत नाही.
७. खोडवा पिकात पाचटाचा पूर्ण वापर करणे सहज शक्य होते. पाचटात आच्छादन म्हणूनही उपयोग होत असल्याने पाण्याची कमतरता असल्यास खोडवा पीक चांगले तग धरते.
खोडवा पीक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी:
१. ज्या ऊस लागणीच्या ऊसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन आणि ऊस संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे, अशा ऊसाचाच खोडवा ठेवावा.
२. ऊस पीक वीरळ झाल्यास नांग्या भरण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत तयार केलेली रोपे वापरावीत.
३. सर्व साधारणपणे १५ फेब्रुवारीनंतर खोडवा घेतल्यास खोड किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. खोड किडींच्या नियंत्रणासाठी ३५ टक्के एण्डोसल्फॉन प्रवाही ७०० मि. ली. ५०० लिटर पाण्यास मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. तसेच ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकाचा (२ लाख प्रति हेक्टरी) खोड किडींच्या नियंत्रणासाठी उपयोग करावा.
खोडवा ऊसात पाचटाचा वापर:
ऊसाच्या पाचटामध्ये ०.४२ ते ०.५० टक्के नत्र ०.१७ ते ०.२० टक्के स्फुरद, ०.९० ते १.०० टक्के पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रीय कर्ब असते. एक हेक्टर क्षेत्रामधून ७.५ ते १० टन पाचट मिळते आणि त्यापासून ३१.५ ते ५० किलो नत्र, १२.७५ ते ३० किलो स्फुरद, ५२.५० ते १०० किलो पालाश मिळते. आणि ३ ते ४ हजार किलो सेंद्रीय कर्ब जमिनीत घातले जाते. खोडव्यात पाचट, सुरवातीच्या कालावधीमध्ये आच्छादन म्हणून आणि नंतर याच पाचटाचे जागेवरच चांगले सेंद्रिय खत तयार करण्याचे नविन तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे ऊसाची पाचट न जाळता खोडव्यामध्ये ह्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुनश्चः वापर करून खोडवा व्यवस्थापन करावे. त्यामुळे खोडव्याचे उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय जमिनीची सर्व प्रकारची सुपिकता व उत्पादकता देखील वाढते.
ऊसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून ऊसाचे बुडखे मोकळे करावेत.ऊसाचे बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो. व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. जमिनीखीलील येणारे कोंब जोमदार असतात.बुडख्याच्या छाटणीनंतर ०.१ टक्के बाविस्टिन या बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे मातीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.पाचट शेतातच कुजून जावे म्हणून पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धन सम प्रमाणात पसरून टाकावेत.जमिन ओली असताना पाचटाचा मातीशी संपर्क येण्यासाठी सरीतील पाचट पायाने थोडे दाबून घ्यावे.
रासायनिक खतांचा वापर:
खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा पहारीच्या सहाय्याने द्यावी.खोडव्यासाठी रासायनिक खतांची मात्रा दोन समान हप्त्यात द्यावी. पहिली खत मात्रा खोडवा ठेवल्यानंतर १५ दिवसांच्या आतच पूर्ण करावी व दुसरी खतमात्रा १३५ दिवसांनी द्यावी.
खोडव्यासाठी पहारीने खते देताना बुडख्यापासून १० ते १५ सें. मी. अंतरावर, १० ते १५ सें. मी. खोल छिद्र घेवून सरीच्या एका बाजूला पहिली खत मात्रा द्यावी. दोन छिद्रामधील अंतर ३० सें. मी. ठेवावे. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १३५ दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
पहारीच्या साधनाने खते देण्याचे फायदे:
खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते. त्यामुळे ते पिकास त्वरीत उपलब्ध होते.दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेद्वारे फारच कमी प्रमाणात ऱ्हास होतो.खत खोलवर व झाकून दिल्यामुळे वाहून जात नाही. तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो. व जाास्तीत जास्त खत मुख्य पिकास उपयोगी पडते.रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळुहळू उपलब्धता होवून खतांची कार्यक्षमता वाढते व जोमदार वाढ होवून ऊसाचे भरघोस उत्पादन मिळते.
सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते. त्यामुळे सर्वत्र सारख्या उंचीचे व जाडीचे पीक आल्यामुळे ऊस उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते.
खोडवा पिकास द्यावयाच्या खतांच्या मात्रा (कि/हे.)
अ. नं. खत देण्याची वेळ नत्र स्फूरद पालाश
(युरिया) (सिंगल सुपर फॉस्फेट) (म्युरेट ऑफ पोटॅश)
१ १५ दिवसाच्या आत १२५ ५७ ५७
(२५७) (३५७) (९५)
२ १३५ दिवसांनी १२५ ५८ ५८
(२७५) (३६३) (९७)
एकूण २५० ११५ ११५
(५५०) (७२०) (१९२)
जमिनीमध्ये सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार हेक्टरी झिंक सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, मॅगनिज सल्फेट १० किलो व बोरॅक्स ५ किलो यांचा वापर करावा.
या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची गरज नाही पाचटाचे आच्छादन असल्यामुळे आणि खते पहारीच्या सहाय्याने दिली असल्यामुळे त्यामुळे खुरपणी करावी लागत नाही.खोडवा ऊसामध्ये पाचट ठेवल्यामुळे सर्वसाधारणपणे दोन पाण्याच्या पाळीतील अंतर नेहमीच्या पद्धतीपेक्षा दीडपटीने वाढवावे.
खोडवा पिकामध्ये पाचट ठेवून, पहारीने खते देवून, कमीत कमी मशागत करून खोडवा व्यवस्थापन केल्यास खर्चात तर बचत होतेच शिवाय जमिनीची सुपिकता टिकवून ऊस व साखर उत्पादन जादा मिळते. यासाठी महाराष्ट्रातील समस्त ऊस शेतकरी बंधूंनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे.आता ॲग्रोवर्ल्ड फार्मच्या ॲग्रोवर्ल्ड फार्म या प्रसिद्ध कृषी मासिकातर्फे शेतकरी बंधूंना शेतीविषयक तांत्रिक माहिती, शासकीय योजना, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, जगभरात सुरू असलेल्या शेतीविषयक विविध प्रयोगांसह शेतीविषयक इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व्हाटसअप ब्रॉड कास्ट ग्रुप तयार करण्यात येत आहे. आपल्या व्हाट्स अप मोबाईल नंबरवर ९१३००९१७४१ हा नंबर ॲग्रोवर्ल्ड फार्म नावाने सेव करून व्हाट्स अप नंबर वरूनच आपले नाव व गाव ९१३००९१७४१ नंबरवर पाठवावे. जेणेकरून तुमचा व्हाट्स अप नंबर आमच्या सिस्टिममध्ये सेव होईल व तुम्हाला वरीलप्रमाणे सर्व सेवांचा निशुल्क (मोफत) लाभ मिळेल. त्वरा करा.बदलत्या काळासोबत शेतीमध्ये होत असलेल्या बदलांचा, तंत्रज्ञानाचा व विविध घडामोडीच्या अचूक माहितीसाठी वरील मोफत सेवेचा लाभ घ्या
डॉ. प्रमोद चौधरी आणि डॉ. किरणकुमार ओबासे,
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा, ४१५ ५२१
टीम ॲग्रोवर्ल्ड
Website - www.eagroworld.in
Published on: 22 April 2022, 12:55 IST