Agripedia

भांडवलधारांना नफ्याचा हव्यास अमर्याद असतो. ते कुठलीही साधनसूचिता पाळत नाहीत.

Updated on 21 January, 2022 7:40 PM IST

भांडवलधारांना नफ्याचा हव्यास अमर्याद असतो. ते कुठलीही साधनसूचिता पाळत नाहीत. त्यांना जर असे दिसून आले, की विष पिऊन माणसे मरतात व त्याला मोठी मागणी आहे, तर ते बिनदिक्कत विषाचे उत्पादन करतील. कारण त्यांना नफ्याशीच मतलब असतो’’ असे थोर तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्‍स यांनी म्हटले आहे.

महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचिन संस्कृतीचा ऱ्हास हा कोणत्याही युद्ध किंवा आपत्तीमुळे होण्यापेक्षाही अधिक मातीची सुपीकता घटत गेल्यामुळे झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. मातीची सुपीकता घटून पिकांचे उत्पादन कमी झाल्याने अनेक प्राचीन संस्कृतीतील बहुसंख्य लोकांना स्थलांतर करावे लागले. मातीचे प्रदूषण हा आपल्या पर्यावरणाला सर्वांत मोठा धोका आहे. आपल्या अन्नाचा मुख्य स्रोत असलेली मातीच प्रदूषित झाल्याने मानवी व जनावरांच्या आरोग्यावरही त्याचे प्रतिकूल परिणाम जाणवू लागले असल्याचा गंभीर इशारा जागतिक अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) एका अहवालात दिला. त्यात तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज व्यक्ती केली आहे.  

हरित क्रांतीनंतर चांगली खते, बियाणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनदेखील उत्पादकता वाढली नाही. याला मुख्य म्हणजे जमीन सुपीकतेकडे झालेले दुर्लक्ष हेच आहे. पिकांना संतुलितपणे सतरा अन्नघटक मिळत नसल्यास कुठलेही खर्चिक उपाय केले, तरी उत्पादकता वाढणार नाही. हे सत्य आहे. शेतीमधील जैविक परिसंस्थेवर आघात झाल्यामुळे शेती संकटात सापडली आहे. देशाच्या शेतीमधील वाढत्या तंट्याचे अन्‌ उत्पादकता घटण्याचे मूळ मातीच्या बिघडलेल्या आरोग्यात आहे. हे जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत सात आंधळे अन्‌ एका हत्तीच्या गोष्टीसारखी झालेली आमची गत कमी होणार नाही.

    एकीकडे राष्ट्रीय पातळीवरून आम्ही उत्पादन दुप्पट करण्याचे शिवधनुष्य घेऊन मैदानात उतरलो आहोत; पण मूळ प्रश्‍नच न समजल्याने या विषयाचे हासू होताना दिसते आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १ टक्‍क्‍यापेक्षा जास्त हवे, त्यात आम्ही ०.२ टक्‍याच्या वर जाऊ शकलेलो नाही. सामू ८.५ च्या वर हवा तो ७.० च्या आसपास आहे. विद्युत वाहकता व मुक्त चुना अतिशय नगन्य आहे. त्यावरच जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता आणि स्वीकार्हता अवलंबून आहे. चुकीची खते व पाण्यामुळे क्षारपड व नापिकी क्षेत्र वाढते

जमिनीची भौतिक व जैविक सुधारणा करणेही तितकेच आवश्‍यक असताना गुणवत्ता व उत्पादकता या दोन्हीवरही मोठा परिणाम होतो आहे. जमिनीतील जे सत्त्व आहे ते पिकांना आणि पुढे मानवाला मिळते. साहजिकच रोगी हा शेतात तयार होतो, घरात नाही याचाही विचार करण्याची गरज आहे. 

 एकीकडे या बाबींकडे दुर्लक्ष होताना सध्या शेतीसाठी ज्या खतांच्या माध्यमातून निविष्ठा वापरल्या जाताहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होताहेत. निकृष्ट व कमी दर्जाची, सेंद्रियच्या नावाखाली बाजारात जी रासायनिक, जैविक व सेंद्रिय खते उपलब्ध आहेत, त्यातून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत निव्वळ धूळ फेक केली जाते आहे. साखर कारखान्याची बगॅस, थर्मलची राख, खाणीतील माती मिसळून अशी शेकडो ब्रॅंडची खते सर्रास हजार ते दीड हजार रुपयाला पन्नास किलो विकली चालली आहेत. सेंद्रिय डीएपीच्या नावाखाली किमान शंभर एक कंपन्या बोगस खतं पाच ते दहा पट भावाने खुलेआम विकताना दिसतात. त्याचे प्रयोगशाळेत परीक्षण केल्यास नत्र अन्‌ फॉस्फरसच्या मात्रा नगन्य आढळून आल्यात. त्यांचेवर कारवाई करायला संबंधित कृषी खाते डोळ्यावर कातडी ओढून गप्प आहे. यातून भरडला जातोय तो शेतकरी. एक तर निकृष्ट दर्जाची शंभर-दोनशे रुपयांची खते हजार बाराशेंना असाह्य शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. त्यामुळे जमिनीला पुरेसे अन्नघटक मिळणार तर नाहीतच; पण शेतकऱ्यांना लागणाऱ्या निविष्ठेवरचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे उत्पादकता तर वाढणार नाहीच, उलट अपुऱ्या अन्नघटकामुळे पिकांची रोगट वाढ होत आहे. त्यावर मारावी लागणारी कीडनाशकेही निकृष्ट दर्जाची येताहेत. विशेष म्हणजे त्यांच्या किमती दहा-वीस पट जास्तीने घेतल्याने सर्वच बाबतीत शेती अन्‌ शेतकरी खोलात जाताना आम्ही बघ्याची भूमिका घ्यायची का, हा मोठा प्रश्‍न आहे.

वाढत्या किमती, दर्जाहीन निविष्ठा, बाजारातले अन्नधान्याचे, तेलबियांचे सततचे पडलेले बाजारभाव, अपुरा अन्‌ हंगाम सोडून पडणारा पाऊस, वाढते तापमान यामुळे शेती क्षेत्रावर मोठे मळभ दाटलेले आज सर्वत्र दिसते. या सर्व दृष्टचक्रातच अनुदान, नुकसानभरपाई, पीकविम्याचा लाभ, शासकीय मदत यासाठी आशाळभूत शेतकरी गावात, शेतात कमी अन्‌ तालुक्‍याला, जिल्ह्याला काहीतरी मिळेल का म्हणून उपासपोटी दिवस काढताना दिसताहेत; पण पात्र असून नुकसान होऊनही पदरात काहीच पडत नसल्याने त्याचा राग वाढतो आहे. काही जण वाढलेला खर्च, न फिटणारे सावकाराचे कर्ज, समाजात खालवलेली पत यामुळे आत्महत्येसारख्या टोकाचा प्रयत्न करताना दिसतो.

हे बदलायचे असेल तर ज्यावर शेतीचा डोलारा उभा आहे, ती माती सुपीक केली पाहिजे. त्यासाठी पशूंची संख्या वाढवावी लागेल. शेण, मूत्रापासून दर्जेदार सेंद्रिय खते, गांडूळखते, स्लरी, जैविक खते शेतकऱ्यांनी घरीच बनवायला हवीत. पालापाचोळा, पिकांचे अवशेष जमिनीत कुजवावी लागतील. लागणाऱ्या रासायनिक निविष्ठा गुणवत्तापूर्ण व कमी किमतीला शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हव्या. तरच उत्पादन खर्च कमी होईल व मातीची सुपीकता वाढेल. मातीची सुपीकता वाढली म्हणजे उत्पादन वाढेल. उत्पादन वाढले म्हणजे शेतकऱ्यांचे विस्थापण थांबेल. उत्पादनाचा दर्जाही सुधारेल, सकस, पौष्टिक, विषमुक्त अन्न मिळेल, त्यातून सर्वांचे आरोग्य सुधारेल.

 

जैविक शेतकरी                              

श्री शरद केशवराव बोंडे ९४०४०७५६२८ bondes841@gmail.com

English Summary: Mixed components Farming loss
Published on: 21 January 2022, 07:40 IST