Agripedia

महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक जिल्ह्याचा बहुतांश पूर्वभागात बाजरी अधिक पेरली जाते. अहमदनगर जिल्ह्यामध्येही उन्हाळ्यात बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

Updated on 24 September, 2020 7:08 PM IST


महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक जिल्ह्याचा बहुतांश पूर्वभागात बाजरी अधिक पेरली जाते.  अहमदनगर जिल्ह्यामध्येही उन्हाळ्यात बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते, त्यामुळे कमीत-कमी पाण्यावर येणारे हे पीक म्हणून ओळखले जाते. कमी पाण्यात बाजरीचे उत्पादन होत असल्याने बाजरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त असतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या पिकांतून दुभत्या जनावरांसाठीही चाऱ्याचा प्रश्‍न सोडवला जातो. बाजरी पीक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठीक आहे.

पोषणमूल्यांचा जर विचार केला तर ३६० किलो कॅलरी प्रति १०० ग्रॅम धने एवढी ऊर्जा देणारे एकमेव धान्य म्हणजे बाजरी आहे. बाजरीमध्ये प्रथिने १०.६ ग्रॅम टक्के., तसेच इस्टमन पदार्थ  ७१.६ टक्के असते. तसेच कॅल्शिअम, पोटॅशियम,, मॅग्नेशियम, लोहसारखे खनिजद्रव्ये आढळतात. त्यामुळे उपयुक्त, अशा या बाजरीची लागवड कशी करावी व बाजरीच्या सुधारित तंत्रज्ञानाविषयी या लेखात माहिती घेऊ.

बाजरी पिकासाठी लागणारी जमीन

 उन्हाळी बाजरी लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असणे आवश्यक असते.

पूर्वमशागत

बाजरी लागवडीपूर्वी जमीन लोखंडी नांगराने १५ सेंटिमीटरपर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन चांगल्याप्रकारे भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकांचे अवशेष वेचून जमीन स्वच्छ करावी. शेवटच्या कुळवणीच्या आधी हेक्‍टरी १२ ते १५ बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरून टाकावे. म्हणजे ते जमिनीत समप्रमाणात मिसळले जाते.

 


बाजरी पिकासाठीचे हवामान

 बाजरी पिकासाठी साधारणतः उष्ण व कोरडे हवामान मानवते. साधारणपणे हवामान १० ते ४५ सेंटीग्रेडच्या दरम्यान असल्यास चांगले असते. बाजरी पिके पाण्याचा ताण सहन करू शकणारे पीक असल्यामुळे उन्हाळ्यात चांगले उत्पन्न देऊ शकते. उन्हाळ्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत उगवण फुटवे येण्याच्या वेळात तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळूहळू होते. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त कालावधी लागतो. उन्हाळी बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या तारखेपर्यंत करणे कधीही फायद्याचे असते, कारण जानेवारी महिन्यात तापमान १० अंश सेंटिग्रेडपेक्षा खाली गेलेली असल्यास बाजरी उगवणीवर त्याचा अनिष्ट परिणाम जाणवतो. त्यामुळे थंडी कमी झाल्यानंतर पेरणी करणे फायदेशीर असते. महत्वाचे म्हणजे १५ फेब्रुवारीनंतर बाजरीची पेरणी करू नये. कारण पुढील उष्ण हवामान सापडण्याची शक्यता असल्याने कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. उत्पादनात कमालीची घट होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते.

पेरणीपूर्वी  बीजप्रक्रिया

 बाजरीचे पेरणी करताना हेक्‍टरी साडेतीन ते चार किलो बी लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास ६ ग्रॅम मेटॅलॅक्सएल एम झेड ७२ प्रति किलो बियाण्यास चोळावे व नंतर पेरणी करावी. अझोस्पिरिलम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केलेले चांगले असते.  २५ ग्रॅम ऍझोस्पिरीलम प्रतिकिलो बियाण्याची चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खत बचत होऊन उत्पादन जवळपास १० टक्के वाढ होते.

 बाजरीचे सुधारित वाण

 प्रो ऍग्रो ९४ ४४, ८६ एम ६४, नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या भागांमध्ये महोदयासारखे बियाणे चांगले येते. सुधारित वाणांमध्ये धनशक्ती व आयसीएमव्ही २२१ या वाणांची लागवड करणे फायद्याचे असते.

 बाजरीची पेरणी कशी करावी

 पेरणीपूर्वी शेत पूर्ण ओलित करून घ्यावे. तसेच चांगल्या प्रकारचा वापसा आल्‍यानंतर पेरणी करावी. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ सेंटीमीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर उंचीचे सपाट वाफे तयार करावेत. पेरणी दोन चाड्याच्या  पाभरीने करावी त्यामुळे बियाणे आणि खते एकाच वेळी पेरता येतात. पेरणी ३ ते ४ सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर करू नये. पेरणी करताना पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंटिमीटर व दोन रोपांतील अंतर १० सेंटिमीटर ठेवावे.

 


रासायनिक खतांची मात्रा

 साधारणतः हेक्‍टरी ४५ किलो नत्र, ४५ किलो स्फुरद, ४५  किलो पालाश म्हणजेच हेक्‍टरी ३०० किलो सुफला १५ १५ पेरणीच्या वेळी द्यावे तसेच पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्‍टरी ४५ किलो नत्र द्यावे.

विरळणी

 बाजरी पिकाची रोपांची संख्या योग्य प्रमाणात असण्यासाठी रोपांची विरळणी पेरणीनंतर १० दिवसांनी करावी. दुसरी विरळणी साधारण २० ते २५ दिवसांनी करावी. आंतरमशागत करुन तणांचा बंदोबस्त करावा. तणांचा बंदोबस्त करण्यासाठी दोनवेळा कोळपणी आणि गरजेनुसार १ ते दोनवेळा खुरपणी करावी.

 पाण्याचे व्यवस्थापन

 उन्हाळी हंगामात बाजरी पिकाचे एकूण ३५ ते ४०  सेंटीमीटर पाण्याची गरज असते. पेरणी केल्यानंतर साधारणतः ४ ते  ५ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेमध्ये पाणी कमी पडू देता कामा नये. साधारणतः पिकाला फुटण्याच्या काळात आणि पीक पोटरीत असताना आणि दाणे भरण्याच्या कालावधीत पाणी कमी पडू देऊ नये, पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून पाणी द्यावे.

बाजरीवरील रोग

केवडा- या रोगाचा प्रादुर्भाव उगवणीपासून ते दाणे भरेपर्यंत दिसून येतो. हा रोग झाल्यानंतर बाजरीचे लहान रोपे पिवळे पडतात. त्याच्या खालील बाजूस पांढऱ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे लहान रोपांवर चट्टे पडतात किंवा त्यांची मर होते. कणसातील फुलांचे रूपांतर पर्ण पत्रात होऊन कणसात दाणे भरत नाहीत. कणीस विस्कटलेली दिसते. या रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम रोगट झाडे उपटून जाळून काढावेत. पेरणीनंतर २० दिवसांनी पिकावर ०.४ टक्के मेटॅलीक्सिम एम झेड ७२ पाण्यात मिसळून फवारणी करावी. बाजरी पीक जेव्हा फुलोऱ्यात येते, तेव्हा हिरवट सोनेरी रंगाचा सोंड असलेला एक कीडा फुलोऱ्यात हमखास दिसून येतो. तो कळसावरील फुलोरा पूर्णपणे खाऊन टाकतो. त्यामुळे कणसात दाणे भरण्याची क्रिया थांबते. याच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस १.५ भुकटी हेक्‍टरी २० किलो या प्रमाणात टाकावी.

 


बाजरीचे उत्पादन

उन्हाळी बाजरीचे पीक ओलिताखाली असल्यामुळे त्याचा हवामान कोरडे असल्यामुळे बाजरीचे हेक्‍टरी ४० ते ४५  क्विंटल उत्पादन येते. तसेच बाजरीपासून ७ ते ८ टन चारा मिळू शकतो. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी बाजरीची लागवड करायची असेल त्यांनी असे सुधारित तंत्रज्ञान वापरले तर उत्पादन चांगल्याप्रकारे होऊन उत्पन्न चांगले होईल.

English Summary: Millet sowing in summer and pest management on the crop
Published on: 24 September 2020, 07:01 IST