सिताफळावरील पिठ्या ढेकणाची ओळख व जीवनचक्र :
सीताफळ पिकावरील पिठ्या ढेकूण (मिलीबग) ही कीड आकाराने लहान नाजूक शरीराची असून पूर्णता पांढऱ्या कापसासारख्या स्वतः शरीरातून सोडलेल्या मेनकट पदार्थाने आच्छादलेली असते. एकाच ठिकाणी बरीच पिल्ले किंवा प्रौढ एकाच आच्छादनाखाली असतात. त्यांचा रंग लाल तपकिरी असतो. प्रौढ माद्यांना पंख नसतात. या किडीचे वास्तव्य विशेषता फळाच्या कवड्याच्या खोलगट भागात किंवा फळांच्या देठाजवळ दिसून येते.
सिताफळा वरील मिलीबगच्या मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असते. शरीराचा रंग लालसर असतो. डोके, वक्षस्थळ आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात. या किडीच्या प्रौढ माद्या झाडावरून खाली उतरून जमिनीत जातात तेथे त्या शरीरातून फेसाळ पदार्थ बाहेर टाकून त्याच्या साह्याने मातीचा घरटेवजा कप्पा तयार करून त्यात अंडी घालतात. एक मादी साधारणत 400 ते 500 अंडी एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान सैलसर कापसासारख्या पुंजक्यात अंडी घालते. या पुंजक्याला अंडी थैली असेसुद्धा म्हणतात. अगोदर सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारच्या अंड्याच्या थैल्या जमिनीत खोडाभोवती दिसून येतात
याशिवाय अशा प्रकारच्या अंड्याच्या थैल्या वाढत्या शेंड्यावर फळावर सालीच्या खाली सुद्धा आढळून येतात. या किडीची अंडी गोलाकार नारंगी रंगाची आणि उघड्या डोळ्यांनी दिसणारी असतात. बऱ्याच वेळा जमिनीत घातलेली अंडी पुढे पावसाळा व कधी कधी हिवाळा येईपर्यंत सुप्तावस्थेत जातात. या अंड्यातून नंतर संथपणे सरपटणारे नारंगी व विटकरी लाल तपकिरी रंगाची पिल्ले बाहेर पडतात. नंतर हि पिल्ले जमिनीतून झाडावर चढतात आणि ठराविक जागा निवडून रस शोषण करतात. सर्व साधारणपणे या किडीची पिल्ले तीन अवस्था पार करून सर्वसाधारणपणे 60 ते 70 दिवसात प्रौढ अवस्थेत जातात.
सिताफळा वरील पिठ्या ढेकणाचा( मिलीबगचा) नुकसानीचा प्रकार :
सिताफळा वरील पिठ्या ढेकूण म्हणजे मिलीबग या किडीचा प्रादुर्भाव जून ते ऑगस्ट या पावसाळी आणि नोव्हेंबर ते मार्च या पावसाळ्यानंतरच्या काळात जास्त प्रमाणात आढळतो. या किडीची पिल्ले व प्रौढ पाने, कोवळ्या फांद्या कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषण करते त्यामुळे पानाचा फळाचा आकार वेडावाकडा होतो व झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ फळातून, देठापासून अगर नाजुक फांदीच्या मुळापासून एकत्रितपणे रस शोषण केल्यामुळे लहान नाजूक फांद्या तिरकस आणि विकृत होतात व फळांची प्रत खालावते. अशी फळे खाण्यासाठी योग्य राहत नाही व त्यामुळे अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो.
ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकते व या चिकट पदार्थावर नंतर काळी बुरशी वाढते व त्यामुळे पाने आणि फळे काळपट पडतात व अशा फळांना बाजारभाव मिळत नाही.
सिताफळा वरील पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडी करिता एकात्मिक व्यवस्थापन उपायोजना :
सिताफळा वरील पिठ्या ढेकूण या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापना करिता खालील उपाययोजनेचा अंगीकार करावा.
१) शेतकरी बंधूंनो वर निर्देशित जीवनचक्रात एक बाब आपण पाहिली ती म्हणजे या किडीची मादी एप्रिल-मे महिन्यात साधारण चारशे ते पाचशे अंडी जमिनीत खोडा बाजूने घालते व बऱ्याच वेळा ही अंडी पुढे जून ऑगस्ट पर्यंत सुप्त अवस्थेत राहतात म्हणजे उन्हाळ्यात खोल नागरणी केल्यास व जमीन चांगली तापू दिली तर जमिनीतील या किडीने अंडी देण्यासाठी तयार केलेले कप्पे आणि त्यातील अंडी नष्ट होतील किंवा पक्षी यांना भक्ष बनवतील किंवा उन्हाच्या सपाट्यात येऊन त्यांचा नाश होईल व पुढे या किडीचा बऱ्याच अंशी प्रतिबंध मिळेल.
(२) सिताफळ बागेत जून जुलै महिन्यामध्ये 15 ते 20 सेंटिमीटर रुंदीची प्लास्टिक पट्टीवर ग्रीस लावून खोडावर बांधावी त्यामुळे मिलीबग जमिनीवरून झाडावर चढताना चिकटून मृत्युमुखी पडतील व व्यवस्थापन मिळेल.
(३) सीताफळ बागेत पानगळ झाल्यावर उन्हाळ्यात बागेत पडलेली पाने,रोगट फळे तसेच झाडावर लटकणारी काळी फळे व वाळलेल्या फांद्या काढून त्यांची विल्हेवाट लावावी म्हणजे सुप्त अवस्थेत असणाऱ्या कीड आणि रोगांच्या विविध अवस्थेचा नाश होऊन पुढे कीड व रोगाचा प्रतिबंध मिळेल.
(३) सीताफळाची बाग व सीताफळाच्या बागेचे भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा विशेषता सीताफळ बागेतील तण बांधावरील गवत आणि लहान झुडपे उदाहरणार्थ जास्वंद चिंच यासारख्या पिठ्या ढेकूण या किडीच्या पर्याय खाद्याचा नाश करावा. सीताफळ बागेभोवती भेंडी आणि कपाशी सारखी पिके घेणे टाळावे कारण या पिकावर सुद्धा पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येतो म्हणून प्रतिबंधात्मक बाब म्हणून सीताफळ बागेभोवती भेंडी आणि कपाशी सारखी पीक घेणे टाळावे.
(४) मिलीबग या किडीला भक्षण करणारे परभक्षी मित्र कीटक क्रिप्टोलिमस मॉन्टेझरी यांची उपलब्धता झाल्यास प्रति एकरी 600 मित्रकीटक या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा सीताफळ बागेत झाडावर सायंकाळच्या वेळेस सोडावे. हे मित्रकीटक सोडण्यापूर्वी योग्य निदान करून पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही उपाय योजना अंगीकार करावी.
(५) रासायनिक कीटकनाशके वापरतांना लेबल क्लेम शिफारशीही शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच प्रत्यक्ष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरणे केव्हाही हितावह असते.
राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
Published on: 03 March 2022, 07:22 IST