उन्हाळी भुईमूगाची लागवड अनेक ठिकाणी केली जाते. या भुईमच्या पिकाकरिता नत्र स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याच्या खालोखाल कॅल्शियम आणि गंधकाची आवश्यकता असते. याशिवाय उन्हाळी भुईमुगाच्या अधिक उत्पादनाकरिता लोह मॅग्नेशियम झिंक आणि बोरॉन ही अन्नद्रव्ये सुद्धा लागतात.
सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये ही अन्नद्रव्य कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध असतात, परंतु माती परीक्षणाच्या आधारावर या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी भुईमूग पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन गरजेनुसार करणे आवश्यक असते. म्हणून सर्वप्रथम माती परीक्षणाच्या अहवालात कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता आहे किंवा कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरता जाणवत आहेत, त्यानुसार प्रत्यक्ष तज्ञांशी सल्ला घेऊन कमतरतेनुसार उन्हाळी भुईमूग पिकात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. सर्वसाधारणपणे उन्हाळी भुईमूग पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन न करता काय करू शकतो याची मूलभूत माहिती व्हावी, या अनुषंगाने खालील बाबी आपणापर्यंत पोहोचाव्यात या अनुषंगाने दिले आहेत कृपया तज्ञांचा सल्ला घेऊनच सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
हेही वाचा : उन्हाळ्यात भुईमुगचे पीक घेताय का? या किडींचा होऊ शक्यतो प्रादुर्भाव
कॅल्शियम : उन्हाळी भुईमूग पिकात कॅल्शियम या अन्नद्रव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर जमिनीमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा चांगल्या भरत नाही, शेंगा पोचट राहतात, या शेंगावर काळा अंकुर पडतो, मुळाची वाढ चांगली होत नाही, झाडांची वाढ खुंटते. उन्हाळी भुईमुगाच्या नवीन पानावर खालच्या बाजूने करड्या रंगाचे ठिपके दिसतात. उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा आणि आर्या जमिनीतून कॅल्शिअम ओढत असतात.
गंधक (सल्फर) : गंधकाच्या कमतरतेमुळे उन्हाळी भुईमूग पिकातील दाण्यातील तेलाचे प्रमाण कमी होते. गंधकाच्या कमतरतेमुळे उन्हाळी भुईमुगाच्या शेंड्यावरील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व मुळे खुरटतात आणि त्यामुळे झाडाची वाढ चांगली नव्हता शेंगा कमी लागतात.
उन्हाळी भुईमूग पिकात कॅल्शियम व सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्याची व्यवस्थापन कसे करावे?
सर्वप्रथम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी भुईमूग पिकात कॅल्शियम व गंधक या अन्नद्रव्याची कमतरता आहे याचे योग्य निदान करून गरजेनुसार प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन कॅल्शियम व गंधक उन्हाळी भुईमूग पिकाला पुरवठा करण्याकरता उन्हाळी भुईमूग पीक ५०% फुलोरा अवस्थेत असताना म्हणजे साधारणता पीक फुलावर आल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी प्रती एकर २०० किलो जिप्सम हे उन्हाळी भुईमुगाच्या झाडाच्या दोन्ही बाजूला सरळ ओळीमध्ये टाकून नंतर अंतर मशागततिने किंवा पाण्याच्या पाळीनेभुईमुगाच्या शेंगाच्या किंवा आर्याच्या संपर्कात येईल आणि शेंगा पोहोचण्याकरता त्याची मदत होईल याची काळजी घेऊन जमिनीत टाकावे. जिप्सम मध्ये २४ टक्के कॅल्शियम आणि १८ टक्के गंधक असते याशिवाय जिप्सम मुळे चोपण जमिनीचा पोत सुद्धा सुधारतो आणि जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक कमी सुद्धा होतो त्यामुळे आवश्यकतेनुसार माती परीक्षणाच्या अहवालानुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जिप्समचा योग्यवेळी उन्हाळी भुईमूग पिकात गरजेनुसार वापर करावा.
लोह (Iron) : शेतकरी बंधूंनो बऱ्याच वेळा जमीन अतिरिक्त पाणी साठवून ठेवणारी असेल तर लोह हे अन्नद्रव्य उन्हाळी भुईमूग पिकाला उपलब्ध होत नाही व त्यामुळे उन्हाळी भुईमुगाचे पीक पिवळसर पडल्यासारखे दिसते तसेच नवीन पानावर शिरांची जाळी उमटल्या सारखी दिसते शिरा हिरव्या दिसतात व त्यामधील भाग पांढरा दिसतो. पानाच्या कडा थोड्या आकसल्या सारख्या दिसतात. बऱ्याच वेळा पाण्याचा निचरा झाल्यानंतर व दौऱ्याचा चा फेर बसल्यानंतर पिकास लोह पुन्हा उपलब्ध होतो व पिकाचा पिवळसरपणा कमी होतो. परंतु माती परीक्षणाच्या अहवालानुसार लोहाची कमतरता जाणवल्यास तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊन गरजेनुसार लोहाची कमतरता असेल तर ५० ग्रॅम फेरस सल्फेट अधिक ५० ग्रॅम चुना अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन उन्हाळी भुईमुगाचे पीक पेरणीनंतर ३० ते ४० दिवसाचे झाल्यावर गरज असेल तरच व योग्य निदान करून फवारणी करावी.
झिंक : शेतकरी बंधूंनो झिंक या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास उन्हाळी भुईमुगाच्या झाडाच्या जुन्या पानावर लाल डाग पडतात आणि नवीन पाने पिवळी पडण्यापूर्वी पानांच्या शिरांमधील भागपिवळा पडतो. झिंक च्या कमतरतेमुळे उन्हाळी भुईमुगाची झाडे खुरटतात. शेतकरी बंधूंनो झिंक या अन्नद्रव्याची कमतरता माती परीक्षणाच्या अहवालात आढळल्यास पेरणीपूर्वी प्रति एकर चार ते सहा किलो झिंक सल्फेट शेणखत मिश्रण करून जमिनीत देणे केव्हाही योग्य किंवा उन्हाळी भुईमुगाचे पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यानंतर झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निदान करून ५० ग्रॅम झिंक सल्फेट अधिक ५० ग्रॅम चुना अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी.
मॅग्नेशियम : शेतकरी बंधूंनो मॅग्नेशियम च्या कमतरतेमुळे उन्हाळी भुईमुगाच्या पानांच्या शिरांमधील भाग पांढरा हिरवा झालेला दिसतो आणि नंतर पाने पूर्ण पिवळी पडून त्यावर जळाल्या सारखे ठिपके पडतात आणि अशी पाने कालांतराने झडून जातात.सर्वप्रथम माती परीक्षणाच्या अहवालात मॅग्नेशियमची कमतरता जाणवते का याची शहानिशा करून गरजेनुसार मॅग्नेशिअमची कमतरता असेल तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ५० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट अधिक ५० ग्रॅम चुना अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.
बोरॉन : बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास उन्हाळी भुईमुगाचे दाणे ठसठशीत भरत नाहीत व हे दाणे आतून पोकळ राहतात तसेच झाडाची पाणे जास्त हिरवी झाल्यासारखी वाटतात , लहान राहतात व वाकडी तिकडी होतात. झाडाची वाढ खुंटते फुलाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे शेंगा सुद्धा कमी लागू शकतात. अतिशय हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता जाणवू शकते. सर्वप्रथम माती परीक्षण करून घेऊन बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते का याची शहानिशा करून घ्या व ज्या जमिनीत बोरांची कमतरता जाणवते अशा जमिनीत उन्हाळी भुईमूग पेरणीपूर्वी तीन वर्षातून एकदा एकरी एक ते दोन किलो बोरॅक्स पेरणीपूर्वी जमिनीतून द्यावे.
उभ्या उन्हाळी भुईमूग पिकात बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता जाणवल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निदान करून व माती परीक्षण अहवालाच्या आधारावर गरजेनुसार १० ग्रॅम बोरॅक्स अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन उन्हाळी भुईमूग पिकात पस्तीस आणि पन्नास दिवसांनी फवारणी करावी. यांची फवारणी करण्यापूर्वी माती परीक्षण अहवालात कमतरता जाणवते का तसेच प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यकता असेल तरच बोरॉनची फवारणी करावी जमिनी मध्ये बोरॉन चे प्रमाण जास्त असल्यास व माती परीक्षण अहवालात त्याची कमतरता जाणवत नसल्यास बोरॉनची फवारणी टाळावी.
अधिक उत्पादन घेण्याकरिता उन्हाळी भुईमूग पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करताना घ्यावयाची काळजी
(१) उन्हाळी भुईमूग पिकात माती परीक्षणाच्या आधारावर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करूनच सूक्ष्म अन्नद्रव्याचे व खताचे व्यवस्थापन करावे.
(२) असंतुलित अविवेकी व अतिरेकी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर वापर टाळावा.
(३) आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन , माती परीक्षण अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तरच शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा योग्य सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतातून शिफारशीप्रमाणे योग्य वेळी योग्य प्रमाणात प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच द्यावी.
(४) सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची फवारणी करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे तसेच फवारणी निर्देशित प्रमाणात योग्य शिफारशीत वेळी प्रत्यक्ष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
Published on: 28 February 2021, 08:16 IST